सुनंदाची तपश्चर्या 5
''काय सांगूं बाळ ?''
''आई, तूं येथें पुन्हां एकटी. परंतु कष्ट नको करुं. मी तुला पैसे पाठवित जाईन. रंगासाठीं जग. दूध पीत जा. थोडें तूप खात जा. कबूल कर. हो म्हण.''
''तूं सांगशील तशी वागेन. परंतु तुझ्या गुणांचे चीज होवो. तुझे गुण शेवटीं फुकट का जाणार ? भारताची कीर्ति वाढवणारा तूं होशील असें ते म्हणत.''
''आई, धडपड करीत रहायचें. प्रभूची मर्जी असेल तर माझ्या हातून अमर कलाकृति कदाचित् निर्माण होतील. जीवनाच्या धडपडींतून जाणार्या कलावंताच्या कलेंत गंभीरता येते, करुणा येते, खोलपणा येतो. हे अनुभव आई फुकट नाहीं जायचे. उथळपणा, उल्लूपणा जातो आणि मनुष्य वेदनांतून गेल्यानें निराळा बनतो. मी मुंबईत गेलों तरी ध्येय नाहीं विसरणार. आणि तेथें नवीन नवीन पहायला सांपडेल, ऐकायला सांपडेल. हें लहानसें दूधगांव ! येथें मीच तज्ज्ञ, मला अधिक येथें कोण शिकवणार ? मुंबईत बापूसाहेब आहेत. कोठेंतरी खोली मिळेल. तूं चिंता नको करुं. तूं नीट रहायचें. तुझा आशीर्वाद मला नेहमीं हवा. त्यांत माझी सारी शक्ति. तुझा प्रेमळ आशीर्वाद म्हणजे माझा आधार.
''रंगा, ध्येयासाठी कोठेंहि जा. मी तुझे पंख बांधणार नाहीं. माझ्या मनांत येतें हें घर विकावें नि तुला परदेशांत पाठवावें. चिनी जपानी कला बघून ये. डचांची चित्रकला, फ्रेंचांची पाहून ये. जगांतील उत्कृष्ट चित्रसंग्रह पाहून ये. कशाला हें घर ठेवायचें ? तें ध्येयासाठी होमूं दे.''
''नको आई. हें घर नाहीं विकायचें. हा आधार आहे. डोकें ठेवायला मठी असूं दे. परदेशांत नाहीं जातां आलें तरी नमुने येथेंहि पहायला मिळतील. बडोद्याला मोठा चित्रसंग्रह आहे. लाखलाख रुपयांचीं तेथें चित्रें आहेत.''
''रंगा, भारतांतील चित्रकारांची लाखलाख रुपयांची चित्रें युरोप अमेरिकेंतील संग्रहालयांत केव्हां टांगलीं जातील ?''
''तुझ्या रंगाचीं टांगलीं जातील. तुझा आशीर्वाद दे, माते, आशीर्वाद दे.''
रंगानें सुनंदाच्या चरणांवर मस्तक ठेवलें. तिनें आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला. मोठें पावन असें तें दृश्य होतें !