बाल्य 2
''काशी, पुरे आतां. तूं दमून गेलीस हो. ये घरीं '' आई म्हणाली. काशी घरीं आली. अंघोळ करुन, पातळ बदलून ती पडून राहिली. तिचा डोळा लागला. परंतु पोट दुखायला लागलें. ती उठली. अधिकच कळा येऊं लागल्या. सुईण आली. तयारी झाली. आणि दिवे लागतांना काशी नीटपणें बाळंत झाली. मुलगा झाला. घरांत आनंद आला. प्रकाश आला. पेढे वाटण्यांत आले. मुलीची बर्फी, मुलाचे पेढे !
बारशाचा समारंभ झाला. बाळाचें नांव श्रीरंग ठेवण्यांत आले. रंगपंचमीला झाला म्हणून श्रीरंग. महिना दोनमहिने हां हां म्हणतां गेले. काशी बाळाला घेऊन आतां सासरीं जाणार होती. आईबापांना जड वाटत होतें. काशीनाथ पुण्याला होता. आतां काशीहि जाणार. तीं दोन पिकलीं पानें मात्र तेथें राहणार !
वसंतॠतूचा बहर होता. झाडांना नवीन पल्लव फुटले होते. पळस फुलून लाल झाले होते. पानांच्या आधीं त्यांना फुले आलीं होती. आणि आंबे, फणस, काजू, करवंदें, जांभळें, कोकंब सर्व फळांना जसा ऊत आला होता. सृष्टीचें रंगवैभव जिकडेतिकडे दिसून येत होतें. मध्येंच ती कोकिळा कूऊ कूऊ करी. आणि लाजून झाडांच्या पानांत लपे.
गांवाबाहेर नदीकांठी ग्रामदेवतेचें देऊळ होते. जगदंबेची खणानारळानीं ओटी भरायला आज काशी गेली होती. जवळ बाळ होतें. दोन महिन्यांचे बाळ. त्याला सुंदर झबलें घातलेलें होतें. गळ्यांत ताईत होता. किती सुंदर दिसत होता रंगा ! नांव श्रीरंग होतें. परंतु रंगा, रंगा असेंच सारीं म्हणत. देवीची ओटी भरण्यांत आली. तिच्या पायांवर बाळ घालण्यांत आलें. नारळ फोडून सर्वांना प्रसाद देण्यांत आला. मंडळी परत निघाली.
''बाबा, नदीकांठी जरा बसूंया'' काशी म्हणाली.
''तिन्ही सांजांची वेळ. वाराहि गार आहे. आतां घरीं जाऊं'' आई म्हणाली.
''आई, आकाशांतल्या रंगांकडे बाळ बघतो आहे बघ ! काय रे लबाडा तुला कळतें? ते लाल रंग तुला आवडतात ? आई, बघ बघ. हंसला बघ. जरा बसूं ये आई.''
आणि तेथें बाळाला मांडीवर घेऊन काशी बसली. आकाशांत रंगपंचमी होती. ढगांवर रंग पडून अनेक रमणीय प्रकार तेथें दिसत होते, नदीचें पाणीहि लालसर पिंवळसर दिसत होतें. तो लहानगा रंगा वरच्या रंगसृष्टीकडे टपोर्या काळ्या भोर डोळ्यांनी पहात होता.