मित्राचें पत्र 4
रंगा, खरा परीस जगांत एकच आहे. चांगल्या दृष्टीनें पाहिलें तर सारें सोनेंच सोनें. सूर्याचे किरण ढगांवर पडतात. सारे सुवर्णमय दिसतात. आपल्या जीवनांतील सहानुभूति, प्रकाश, सेवा, आनंद यांचे अखंड किरण सर्वत्र विखुरित जावें. आतां हा अफगाणच बघ. आपण पठाण अफगाण म्हणजे दुष्ट समजतों. परंतु भावना, हृदय, प्रेमळपणा सर्वत्र आहे. दुष्टता नाहीं कोठें ? एक सुरा भोंसकून पटकन् मारील, एक रक्तशोषण करित राहील. एकाची स्थूल हिंसा दिसते, एकाची सूक्ष्म परंतु अहोरात्र चाललेली दिसत नाहीं. रंगा, त्या दिवशीं तो अफगाण गेला. दोनचार दिवस तो आला नाहीं. मी त्याला भेटायला अधीर असें. मला मातृप्रेम, पितृप्रेम मिळालें नव्हतें. तो अफगाण तें मला देत होता. आणि एके दिवशीं तो आला. तो कांही तरी घेऊन आला.
''बच्चा, हम यहांसे जानेवाले हैं. दूर बेलगांवके तरफ हमको भेजनेवाले है. तुमारा मुल्क वहांहि है न ? मै देखूंगा. आज लो ये अंगूर. खा बेटा. और यह सुंदर छोटासा गालीचा तुमारे वास्ते. और यह तेल तुमारे माथेपर मै आज डालूंगा. तू मेरा बच्चा है न.''
त्यानें माझ्या डोक्यात सुगंधी तेल ओतलें. तो म्हणाला, ही बाटली तूं घेऊन जा. त्याच्या डोळ्यांत पाणी आलें.
''बजाव तेरी बांसरी''
मी बांसरी वाजवली. भैरवी शेवटीं आळवली. मोटारीचें शिंग वाजलें. तो उठला.
''हमारा कैदखाना मोततक है. क्या करना. यहां कोई रिस्तेदार नहीं. सगा साथी नहीं. सबसे दूर दूर. ठीक. खुदा की मर्जी. हमारा किस्मतहि बुरा होगा. बच्चा, याद रखोगे ना ? भूलो मत. अफगाणभी अच्छे होते हैं ऐसे तुमारे लोगोंको कहा जाना. हम सब बूरे नहीं. भलाईबुराई से बिनी गयी है यह दुनिया. अच्छा बेटा. अल्ला तेरा भला करे.''
त्यानें मला हृदयाशीं धरलें. तो गेला. तो धिप्पाड पहाड पाझरला होता. त्याच्या तुरळक रुपेरी दाढीवर अश्रु मोत्याप्रमाणें चमकत होते. त्याची मोटार गेली. पुन्हां त्याचें दर्शन नाहीं. बेळगांवला नेलें का नागपूरला नेलें प्रभूला ठाऊक. कारण सांगत नसतात खरें.
रंगा, म्हणून जगांत कोठेंहि जा, तुम्हांला माणुसकी आढळेल. विश्वचि माझें घर. मी तर अनिकेत आहें. घरदारविहीन आहें. परंतु मला जाईन तेथें घर मिळत आहे.
जगांत युध्द पेटेल असें म्हणतात. आमची काय शाश्वती ? वेळ आली तर कारकुनांनाहि सैनिक व्हावें लागेल. मी सर्व गोष्टींना सिध्द आहें. कशाची आसक्ति, कशाची भीति ? कोठेंहि गेलों तरी भारतमातेचें चित्र खिशांत असतें, हृदयांत असतें.