नंदलालांच्याजवळ 3
आजच्या संशोधनाचा, आजच्या साधनांचा, विवेकानें उपयोग जर आपण केला तर कामाचे तास कमी करतां येतील आणि श्रमणारी जनता अधिक विश्रांति मिळून त्या विश्रांतीच्या वेळाचा उपयोग करुन नव संस्कृति निर्माण करण्यांत भाग घेईल. तिच्यांतून कवि, चित्रकार, संगीततज्ञ, शास्त्रज्ञ निघतील. अलौकिक देणगी ही एखाद्यालाच असते. परंतु आजूबाजूला सारें वातावरणच संस्कृतिनिर्मितीचें असले म्हणजे त्यातूनच अलौकिक सर्जनकार निर्माण होतात.''
रंगा नंदलालांच्या मुखाकडे बघत होता.
''जा आतां नंदा. तुमच्या खान्देशाचीं केळीं खा. आणि मला काय आणणार ?''
''चिनी बदाम !''
''अरे लबाडा, चिनी बदाम आमचा बंगाली शब्द घेतलास. शेंगा म्हणना. शेंगा भाजून आण. बंगालमध्यें शेंगा नाहींत. तुमचा हा खान्देशी मेवा आहे.''
''बंगालमध्यें कमळें आहेत, विशाल नद्या आहेत. आणि तुम्ही आहांत, गुरुदेव आहेत.''
''रंगा तूं चित्रकार आहेस. कविहि आहेस.''
''दोघांची वृत्ति एकच नसते का ? एक मुकें चित्र काढतो, एक बोलकें. तुमच्या वंगभूमीचें गाणें म्हणूं ?
नमो वंगभूमि ॥
श्यामांगीनि युगे युगे । जननी वो कापालीनी
नमो वंगभूमि ॥
''रंगा, प्रियतम वंगभूमीचें स्मरण होतांच माझें हृदय उचंबळतें. परंतु आतां सार्या भारताचा मी होत आहें. येथीलहि सृष्टिसौंदर्य पाहून मी आनंदित होतों. ज्या खान्देशनें अजिंठा दिला, ज्या महाराष्ट्रानें वेरुळ, कार्ला, घारापुरी हीं अमर लेणीं दिलीं, त्या महाराष्ट्राला प्रणाम. रंगा, आपण सारे भारताचे. सारे प्रान्त जणूं भाऊ भाऊ. आपण एकमेकांचे घेऊं, आनंद निर्मू. आपलें हृदय एकच आहे. तोच अव्दैताचा घोष सार्या भारतवर्षाच्या जीवनांत आहे, साहित्यांत आहे. रंगा, जा ना रे. शेंगा आण भाजून. मला भूक लागली.''
''मला तुमच्या शब्दांची भूक आहे. असें उपनिषद् कधीं कोणत्या झाडाखालीं पुन्हां ऐकूं ?''