मुंबईला 4
त्या दिवशीं रंगा मोठ्या पहाटे उठला. त्यानें पुरण शिजत ठेवलें. मित्र म्हणाले ''रंगा, आज काय आहे ?''
रंगा म्हणाला, मागून कळेल. मित्र आपापल्या वर्गाना निघून गेले. लिलीचे वडील कामाला गेले. रंगा पुरणपोळ्या करुं लागला. लिलीच्या आईनें येऊन पाहिलें.
''भाऊ, तुला सारें येतें.''
''आईची कृपा.''
''भाऊ, दे ना रे पोळी. मला लागली भूक.''
''लिले, घरीं चल. भाऊकडे मागून पोळी खा.''
''मागून नको; आधी खाईन.''
''लिले, तुलां नैवेद्य दाखवूं ?''
''देवासारखा ? आई नैवेद्य दाखवते नि स्वत:च दूध पिते.''
''लिले, तूं जवळ असलीस तर तुला नाहीं का देत ?''
''परंतु देवाला नाहींच ना ? आई, देव आतां म्हातारा झाला असेल नाहीं ? त्याला भूक नसेल लागत.''
''लिले, हा घे नैवेद्या. लाग खायला.''
पोळी खाऊन लिली गेली. रंगा स्टेशनवर गेला. आपल्या मित्राला घेऊन येणार्या गाडीची तो वाट पहात होता. एकदांची गाडी आली. मित्र भेटले. गाडी करुन दोघे घरीं आले, खोलीवर आले. पंढरीनें स्नान केलें. दोघे मित्र जेवायला बसले.
''रंगा, आतां आपण परत कधीं भेटूं ?''
''पत्रानें वरचेवर भेटूं. तूं तिकडची वार्ता कळव, वर्णनें लिही. उंच पर्वत, बर्फाळ चमकदार शिखरें, द्राक्षांच्या बागा. आपला देश किती सुंदर, किती समृध्द. या पेशावर भागांतच पूर्वी प्राचीन काळीं दोन अडीच हजार वर्षांपूर्वी मोठें विद्यापीठ होतें. भगवान् पाणिनि तेथें शिकवित. शिकवतां शिकवतां वाघानें त्यांना खाल्लें. पंढरी, मी तो प्रसंग चितारला आहे. आमच्या मुख्य अध्यापकांना तें चित्र फार आवडलें. तूं मला तिकडचीं वर्णनें लिहून पाठव. मी चित्रें काढीन नि तुला पाठवीन.''