निष्ठुर दैव 3
''असा कसा तुमचा तो देव ?''
''तो देव तुझा नाहीं का ? अरे आपण मानव स्वत:ला फार मोठें समजतों. आणि मानवाचें मरण म्हणजे गंभीर घटना समजतों. परंतु तुम्हां आम्हांला पायाखालीं मुंग्या चिरडल्या जातात, त्याचें कांही वाटतें ? केरसुणी घेतों. झुरळें, मुंग्या, ढेंकूण, मुंगळे सारें झटकतों, झाडतों. आपल्याला त्याचें कांही वाटत नाहीं. तुम्ही आम्ही जीवजंतूला महत्व देतों त्यापेक्षां अधिक महत्व देवानें तुम्हां आम्हांस का बरें द्यावें ? या विराट् विश्वाकडे पाहिलें म्हणजे मुंगी इतकें तरी महत्व आहे का आपल्याला ? देव माना किंवा मानूं नका. परंतु मरणाला इतकें महत्व देऊं नये. कर्तव्य करावें. निघून जावें वेळ येईल तेव्हां. बाळ, तुझ्याबद्दलच्या माझ्या केवढाल्या आशा ! परंतु आतां कोण मदत करील ? विश्वभारतींत कसा जाशील ? हिचेंच पालनपोषण आतां तुला करावें लागेल.''
''तुम्ही चिंता नका करुं. रंगाच्या बोटांतील कला जोंवर आहे तोंवर ददात नाहीं पडणार.'' वासुकाका थकले. त्यांना बोलवेना. डोळेहि नीट उघडत ना. सुनंदा व रंगा जवळ बसून होतीं. इतरहि मित्र, विद्यार्थी येत जात. परंतु वांचण्याचें चिन्हच नव्हतें. रंगाला विश्वभारतींत पाठवूं म्हणणारे वासुकाका विश्वंभरांत विलीन झाले.
कांही दिवस गेले. तें लहानसें घर वासुकाकांनी विकत घेतलें होते. दुधगांव त्यांना आवडलें होतें. त्यांच्याजवळ जी जुनी पुंजी होती. तिनें ते घर त्यांनी घेतलें. परंतु आतां रंगाला पैसे कोठले ?
''रंगा हें घर आपण विकून टाकूं. ते पैसे तुला होतील. विश्वभारतींत जा. मी येथें एखादी लहानशी खोली भाड्यानें घेऊन राहीन.''
''आई, हें घर विकायचें नाहीं. घर असूं दे. काकांनी किती आवडीनें हें घर घेतलें. तें का विकायचें ? मी नाहीं विश्वभारतीत जात. या शाळेंतच मला नोकरी देणार आहेत. मी येथला विद्यार्थी. काकांविषयीं शाळेंत आदर आहे.''
''परंतु तुझी कला ? तुला अजून शिक्षण घ्यायचें आहे. खरें ना ? एव्हांपासून नोकरी कशाला ? एकदां मनुष्य नोकरींत गुंतला म्हणजे निर्जीव होतो, यंत्रवत् होतो. तूं घर वीक. माझे ऐंक. नाहींतर कोणाकडे गहाण ठेवूं हें घर नि त्यावर पैसे मागूं. तूं पुढें मोठा हो. पैसे मिळव. घर सोडव. दुसरें काय करायचें बाळ ? दागदागिना असता तर मोडला असता. येऊन जाऊन हीं कुडीं आहेत. परंतु तीं कितीं पुरणार ? यांना दागदागिने आवडत नसत. म्हणत सद्गुण हेच अलंकार. मी आरंभीं रागवत असें. परंतु पुढें मलाहि तें पटलें. दागदागिने म्हणजे रानटीपणा वाटूं लागला. लहान मुलांना घालावे दोन दागिने. परंतु मोठ्या बायकांना काय करायचे ? अरे इथल्या मुलींच्या शाळेंत एक पोक्त बाई आहेत. त्या अजून कानांत एरिंग घालतात !''