नवीन अनुभव 1
मुंबईस एक खादीप्रदर्शन व्हायचें होतें. रंगाला निरनिराळे अनुभव घ्यायची हौस. त्या प्रदर्शनांस आपल्याला कांही काम करतां आलें तर किती चांगलें असें त्याच्या मनांत आलें. त्यानें ग्रामीण जीवनचे कांही फलक तयार केले. खादी गरीब मायबहिणींना कसा आधार देत आहे तें त्यानें कांही चित्रांतून दाखविलें. तें पहा एक चित्र त्यानें चितारलें आहे. तो आंधळा आहे. परंतु चरख्यावर तो सूत काततो. भीक मागण्याऐंवजीं स्वाभिमानपूर्वक भाकरी मिळवितो. ती एक मुसलमान अम्मा; ती जुन्या खानदान घराण्यांतील. परंतु घराला अवकळा आलेली. कामाला तर रुढीमुळें बाहेर जातां येत नाहीं. शेतांत मजुरी करतां येत नाहीं, कारखान्यांत जातां येत नाहीं. परंतु तिच्या घरांत चरखा आला. ती शिकली, तिच्या मुली शिकल्या. घरांत चार पैसे येऊं लागले. रंगा अनेक चित्रें रंगवीत होता. त्यानें ग्राम-गोकुळ म्हणून कांही चित्र-फलक तयार केले. एका चित्रांत गांवांतील सारे लोक एकत्र जमले आहेत, मुलें मुली ऐक्याचा गोप विणीत आहेत असें दाखविलें. दुसर्या एका चित्रांत रानांत एकीकडे गुरें चरत आहेत तर दुसरीकडे गुराखी वर्तमानपत्र वाचित आहेत असें त्यानें दाखविलें. रात्रीच्या शाळेंत निरक्षर शिकत आहेत असें तिसरें चित्र होतें. एका चित्रांत सारा गांव स्वच्छतेच्या माहिमेवर निघाला आहे असें होतें. चौथ्या एका चित्रांत महात्माजी मुरली वाजवीत आहेत आणि त्यांच्या पाठीमागून लहानथोर जात आहेत, नवयुग निर्मू बघत आहेत असें होतें. रंगा ध्येयसृष्टींत रमला होता. त्याला भान नव्हतें. तो दिवसरात्र तीं ग्रामोद्योगी ग्रामीण दृश्यें रंगवित बसे. देशबंधु दासांनी एका व्याख्यानांत फारच सुंदर असें चित्र उभें केलें होतें. ''तीं पहा आपलीं गजबजलेलीं जुनीं गांवे. पहांटे बाया दळीत आहेत. गोड गीतें कानांवा येत आहेत. गांवांत दूधतूप भरपूर आहे. गायींची धष्टपुष्ट खिल्लारें आहेत. लोहाराचा भाता चालू आहे, हातमाग सटक सटक करित आहे. पंतोजी वडाच्या पारावर शिकवित आहे. रात्रीं रामायण वाचलें जात आहे. सभोंतीं ऐकायला लोक जमले आहेत. ती रामनवमी आली, गोकुळ अष्टमी आली. ते पहा रामलीलेचे नि कृष्णलीलेचे खेळ आणि त्या पहा कुस्त्या. तो दांडपट्टा फिरवित आहे, तो लाठी खेळत आहे, तो मलखांबावर उड्या मारित आहे. आणि नागपंचमी आज. झाडाला दोर बांधून बायकाहि उंच झोंके घेत आहेत, गाणीं म्हणत आहेत. आनंद, मौज.''
रंगासमोर तें व्याख्यान होतें. वासुकाकांनी त्याला तें एकदां वाचून दाखविलें होतें. रंगा ग्रामीण जीवनांत नवीन रंग भरीत होता. तेथील अस्पृश्यता गेली आहे, भाऊबंदकी कमी झाली आहे, निरक्षरता जात आहे, नवे सुधारलेले ग्रामोद्योग येत आहेत, राष्ट्रीय भावना वाढत आहे, असें जीवन तो रंगवित होता.