Get it on Google Play
Download on the App Store

क्रीडाखंड अध्याय २७

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी विश्वभूषणा । हेरंबा रे गजकर्णा ।

सिद्धिबुद्धीचे रमणा । करवी रचना आतां पुढें ॥१॥

सव्विसावे अध्यायाचे अंतीं । कलविकल गेले मृत्युपंथीं ।

ऐकतां रडे दानवपती । करी खंती तयांची ॥२॥

चिंताग्नीनें शरीर करपलें । वदन त्याचें काळें पडलें ।

डोळ्यांवाटे पाणि गळे । मनीं तळमळे दानवेश ॥३॥

ऐसें पाहतां त्याचे कुमर । धर्माधर्म वीर दुर्धर ।

रायापुढें जोडोनि कर । वचन दुर्धर बोलती ॥४॥

तुवां इंद्रादिकां विभांडिलें । त्रिभुवन वश ठेविलें ।

आतां चिंतेनें कांहो भुललें। मन आपलें दानवेशा ॥५॥

चिंता किमपि करु नका । पाहा आतां आमचा आवांका ।

सिंधू त्याचा शब्द निका । ऐकतां तोषला बहुसाल ॥६॥

आलिंगोनी ते दोघे सुत । सेनानिकांस पाचारित ।

दशकोटी सेना देत । मग गौरविला आशीर्वादें ॥७॥

रणीं चालिले दोघे कुमर । भेरी गर्जती अपार ।

नादे अवनी कांपे थरथर । हाका थोर वीर मारिती ॥८॥

पुढें चालिलें पायदळ । मागें गज जैसें अद्रीसबळ ।

त्यामागें हिंसत अश्व तुंबळ । रथ पुष्कळ त्यांमागें ॥९॥

महावीरांचे चालले थाट । सिंहनादें गर्जती भट ।

हें जाणोनि गण बळकट । शस्त्रें तिखट सांवरिती ॥१०॥

करुन मयूरेशासि नमन । निघते जाहले हर्षितमन ।

वीरभद्र षडानन । रक्तलोचन नंदी पैं ॥११॥

तयांस चढला रणमद । शिवगणाचे चालले वृंद ।

करीत उठले परचमूभेद । सिंहनाद करिती मुखें ॥१२॥

उल्हाटयंत्रांचे भडमार । शक्तीगदाकुंततोमर ।

भिंडिमाळा वर्षती शर । लक्षोनि परस्परें ॥१३॥

आपुले स्वामीकार्यासाठीं । वीर भिडती जगजेठी ।

वीरवीरांस दाविती पाठी । घालिती मिठी परस्परें ॥१४॥

संग्राम मांडला घोरांदर । गगनीं दाटले निबिड शर ।

तेणें पडला अंधकार । परस्परें नोळखती ॥१५॥

वीर भेदले अपार । कोणाचे तुटले चरणकर ।

कितीकांचें शरीर । भेदिलें शिर शरघायें ॥१६॥

पडलीं गजाश्व कलेवरें । वीर घायाळ जाहले घाबरे ।

कितीक मरोन जाहले पुरे । छत्रें चामरें पडियेलीं ॥१७॥

मुगुटकुंडलांसहित । शिरें पडलीं अपरिमित ।

चूर जाहले मोडोन रथ । जाहले विरथ महावीर ॥१८॥

वाहे शोणितनदी तुंबळ । दानव सेनेचें अद्भुत बळ ।

माघारलें मयूरेश दळ । त्याहीं पळ काढिला पै ॥१९॥

सैन्य आपले फुटलें । ऐसें गांगेयें अवलोकिलें ।

त्याचें चित्त खवळिलें । वाहन लोटलें तयानें ॥२०॥

द्वादशकरीं शस्त्रधनु । शर वर्षे शंकरसूनु ।

शरें आच्छादिला तेणें भानु । खालीं उष्ण पडो नेदी ॥२१॥

अद्भुत कार्तिकेय शरमार । असुरांचा जाहला संहार ।

पळती दशदिशा निशाचर । रणचतुर पराक्रमी ॥२२॥

दैत्यदळीं हाहाःकार । पाहोनि धांवले सिंधूकुमर ।

चापीं लावोनियां शर । षण्मुखासमोर लोटले ॥२३॥

शरजाळें मयूरेशपृतना । जर्जर करोनि करिती गर्जना ।

हें पाहतां षडानना । न साहे पराक्रम शत्रूंचा ॥२४॥

हाक देवोनियां षडानन । दोघांसि पाडी आसुडोन ।

त्याच्या शिखा कवळुन । आपटोन मारी तयां ॥२५॥

सिंधुकुमराचे घेऊनि प्राण । विजयी जाहला षडानन ।

जयवाद्यें वाजऊन । आले परतोन गुणेशापासीं ॥२६॥

मयूरेश सकळ सेनेसहित । येउनी पितरांस नमीत ।

त्यांहीं आलिंगोनि दोन्ही सूत । वीरभद्रासि आलिंगिलें ॥२७॥

गुणेश सांगे पितरांस । षडाननें मारिलें सिधुपुत्रांस ।

साधू साधू म्हणती त्यास । हर्ष मायेस न समाये ॥२८॥

ऐकोन पुत्रांचें निधन । सिंधू करी तेव्हां रुदन ।

शोकें पडला मूर्च्छा येऊन । धरिती सांवरुन सेवक ते ॥२९॥

सख्या सांगती दुर्गेसी । तुझें पुत्र पावले निधनासी ।

ऐकतां फोडी कपाळासी । हस्तें हृदयासि ताडण करी ॥३०॥

आक्रोशें रडे सुंदरी । लज्जा टांकोन ये सभांतरीं ।

मुक्तपृष्टी वरी कबरी । अंग अवनीवरी टांकीतसे ॥३१॥

मिळाले सुहृद नागरिक । दांपत्यांचा पाहोन शोक ।

जन रडती सकळिक । हाक एक गाजली ॥३२॥

मिळालिया नगरनारी । त्याहीं रडती ते अवसरीं ।

बिल्वचारुकुचा सुंदरी । उर्वीवरी लोळतसे ॥३३॥

व्यस्त जाहले तिचे चीर । माथ्यावरील ढळला पदर ।

मोकळा दिसे तिचा ऊर । सांवरिती पदर सख्या तिच्या ॥३४॥

कोणी सात्विक नागरिकजन । त्यास म्हणती ऐका वचन ।

या ब्रह्मांडीं अविनाश कोण । पाहा विचारुन निजदृष्टीं ॥३५॥

विधीलागीं नाश असे । त्याणें केलें देह ठसे ।

ते होतील शाश्वत कैसे । हें मानसें विचार करा ॥३६॥

जें दिसे तें मायिक । जाणा जैसें स्वप्नकौतुक ।

देहाभिमानी मूर्ख । बळेंच दुःख भोगीतसे ॥३७॥

रज्जूवरी सर्पाकार । तैसा जाणावा हा संसार ।

देहबुद्धीनें त्याचा पार । कधीं नर न पावे ॥३८॥

प्राणिमात्रीं ईश्वरसत्ता । तो तयासि होय फिरविता ।

तेणें संयोगविगता । ती काय दुःखासि कारण असे ॥३९॥

अस्तमानी पाक्षगणि । एके वृक्षीं बैसती येऊन ।

उदयकाळीं जाती निघोन । तैसा संबंध हाही असे ॥४०॥

किंवा आपगापुरीं वाहती । काष्ठें एका जागीं जमती ।

जलोर्मीनें पुन्हा मागुती । विघडोन होती एकीकडे ॥४१॥

कर्मयोगें तैसे प्राणी । एक होती अनुदिनीं ।

दैवयोग त्या सत्तेनी । आणिके पंथें लावीतसे ॥४२॥

राजकुळाचा हाच धर्म । पुरुषें करावें वीर कर्म ।

रणी मरोनि उत्तमधाम । शेवटीं तेणें वसवावें ॥४३॥

ऐसें प्राज्ञजनीं बोधितां । सावध जाहली सिंधुवनिता ।

तीतें अंतःपुरामाजी तत्वता । नेता जाहला सखीजन ॥४४॥

उठोनियां सिंधुदानव । वीर धिःकारिले तेणें सर्व ।

अश्वावरी बैसला राव । घेतली धांव तयानें ॥४५॥

तंव त्याचा पिता चक्रपाणी । नेत्रीं आणोनियां पाणी ।

उपदेशार्थ बोले वाणी । दृष्टीस नाणी कुपुत्र तो ॥४६॥

त्याचा करोनि धिःकार । युद्धास निघाला सत्वर ।

त्याच्या सैन्यास नाहीं पार । वाद्यें अपार वाजताती ॥४७॥

पुढें चाललें पायदळ । अग्नियंत्रांचे वीर तुंबळ ।

करीं वोडणें करिती झळाळ । कुंजरपाळ तयामागें ॥४८॥

पर्वताऐसे मदोन्मत्त । शुभ्र झळकती त्यांचे दंत ।

ऐरावताहूनि बळ अद्भुत । फोडिती पर्वत करदंडें ॥४९॥

लक्षानुलक्ष गजांचे थाट । घंटा वाजती अतिसुभट ।

वरी बैसले दानवभट । शस्त्रें चोखट घेऊनियां ॥५०॥

त्याचेमागें तुरंगम । रवितुरगापरी उत्तम ।

अनेकगतीचीं दाविती कर्म । जाणती वर्म शालिहोत्री ॥५१॥

खुराघातें वन्ही उसळे । वरी महावीर बैसले ।

तयांमागें रथ लोटले । आरुढले असुर वर ॥५२॥

मस्तकीं झळके दिव्यमुगुट । नवरत्‍नमाळा कंठीं अचाट ।

पुष्पमाळा ल्याले भट । कर्णीं कुंडलें तळपताती ॥५३॥

विद्युत्प्राय शस्त्रें झळकती । मुखें विक्राळ गर्जना करिती ।

सिंधु पातला समीरगती । येऊनि सांगती शिवदूत ॥५४॥

वीरभद्र आणि षडानन । घाबरें मयूरेशास येऊन ।

सांगती सकळ वर्तमान । शिवनंदन आनंदला ॥५५॥

विरश्री चढली गुणेशाशी । गर्जना करुन बोले त्याशी ।

आतां जिंकीन मी सिंधूशी । चिंता कायसी वाटे तुह्मा ॥५६॥

भवानीशिवासि नमस्कार । करुन हाकारिलें मोर ।

वरी बैसला सर्वेश्वर । वेदांस पार न कळे ज्याचा ॥५७॥

स्वयें चालला जगज्जीवन । हें पाहून बोले षडानन ।

आह्मी असतां काय म्हणून । स्वयें आपण पुढें जाशी ॥५८॥

राहूनि तयापुढें आपण । करीं घेऊनि धनुष्यबाण ।

गांगेय माजवी तेव्हां रण । हाक दारुण मारीतसे ॥५९॥

अद्भुत षडाननाचा मार । बाणें असुर करी जर्जर ।

गजसमूहीं वीर भद्रवीर । करीत संहार उठावला ॥६०॥

गदाघायें गंडस्थळें । फोडितां उसळती मुक्ताफळें ।

सिंहापरी गजीं खंदळे । वीर खेळे वीरभद्रा ॥६१॥

पळतां गजपायीं धरुन । गजावरी मारी आपटुन ।

लक्षावधी गजकंदन । शिवनंदन करीतसे ॥६२॥

फुटला करींचा तेव्हां थाट । सहस्त्रशः मारिले वरील भट ।

वीरभद्र योद्धा सुभट । पाडी दाट गजप्रेतें ॥६३॥

गज पळती रानोरान । मग तुरुंगामध्यें शिरोन ।

करीत उठला अश्वकंदन । दाविलें निधन महावीरां ॥६४॥

वीर वर्षती शस्त्रभार । त्यांसि न गणोनि वीरभद्र वीर ।

करीत चालला अश्वसंहार । प्रेतें अपार पाडियेलीं ॥६५॥

सिंह होवोनि पुष्पदंत । गजयुद्धांचा संहार करित ।

राक्षस सेनेत आकांत । अत्यद्भुत प्रगटला ॥६६॥

हिरण्यगर्भ भूतराज । त्याहीं मारिले रथिसमाज ।

षडानन तेजःपुंज । न पाहवे दानवाशी ॥६७॥

दानवांचे मुख्यवीर । त्यांचा रणीं जाहला संहार ।

दानव करिती हाहाःकार । पळूं लागले दशदिशां ॥६८॥

पडले प्रेतांचे पर्वत । शोणितनदी वाहे अद्भुत ।

हें पाहोनि चक्रपाणीसुत । काय करीत तेधवां ॥६९॥

करुनि स्ववीरांचा धिःकार । चापीं लाविला तेणें शर ।

आकर्ण वोढी ओढी सत्वर । मंत्रोच्चार करोनियां ॥७०॥

मुखें करी सिंधु गर्जना । तेणें कांपे देवपृतना ।

सिंधूनें सोडोनियां बाणा । काळपुरुषास उत्पन्न करी ॥७१॥

महाविक्राळ भ्यासुरवदन । त्याचे मुखापासूनि अग्निदारुण ।

जाळूं लागला मयूरेशगण । सोडूनि रण पळती ते ॥७२॥

देवसेनेमाजी धडकला । अनळ जाळी महावीराला ।

शिवगणीं प्रळय वर्तला । पळ सुटला दशदिशां ॥७३॥

षडाननादि गुणेशवीर । मुखें करिती हाहाःकार ।

गुणेशापासीं येऊनि सत्वर । त्राही त्राहीं ह्मणती ते ॥७४॥

अद्भुतकर्म पाहोनि सिंधूचें । मन खिन्न जाहलें गुणेशाचें ।

मग स्मरण करोनियां शिवाचें । सामर्थ्य परशूचें प्रगट करी ॥७५॥

मंत्रोनियां परशू जेव्हां । असुरावरी टांकी तेव्हां ।

सहस्त्र चपळाचा करीत रावा । असुरसेनेवरी चालतसे ॥७६॥

परशु वेगाच्या कडकडाटें । नक्षत्रें खचती अधोवाटें ।

शेष शिरें सांवरुनियां नेटें । धरी महितें सांवरोनी ॥७७॥

परशू गेला प्रळय करित । त्यापासोन एक पुरुष होत ।

महावन्ही प्रज्वाळित । तो जाळित शत्रुसेना ॥७८॥

पुरुषानें भक्षिला दानवपुरुष । परश्वाग्नीनें भक्षिला वन्ही निःशेष ।

पुरुषास येवोन अतिरोष । असुरसेना भक्षीतसे ॥७९॥

करुन सकलसेनेचा संहार । गुप्त जाहला पुरुष वैश्वानर ।

रणीं एकला चक्रपाणी कुमर । सोडीत शर अपार पैं ॥८०॥

मयूरेश घालितां बाणजाळ । सिंधू भुलोन जाहला विव्हळ ।

मनीं विचारी तेव्हां खळ । उपाय सबळ काय करुं ॥८१॥

उपाय दैत्याचा खुटला । नगरासीं पळोन गेला ।

रात्रीं निजमंदिरीं प्रवेशला । लज्जित मुखाला न दाखवी ॥८२॥

विजयी जाहला गौरीनंदन । जयवाद्यें वाजऊन ।

पावतां जाहला निकेतन । आनंदें करुन तेधवां ॥८३॥

करोन शिवासि नमन । आनंदें कथिती वर्तमान ।

पार्वती पुत्रांस आलिंगुनः । ह्मणे श्रमोन आलेती॥८४॥

कोमलांगा माझे कुमरा । कैसें जिंकिलें दानवक्रूरा ।

लिंबलोण उतरी शिवदारा । अंकीं लंबोदरा घेऊनियां ॥८५॥

नारद म्हणे शिवा ऐक । येथें गुदरले दिवस अनेक ।

रागें भरेल माझा जनक । चतुर्मुख मजलागीं ॥८६॥

मी येतों पुन्हा जाउनी । गिरिजेस म्हणे नारदमुनी ।

ऐक वचन माझें भवानी । करी मनीं विचार त्याचा ॥८७॥

गुणेश वधील सिंधूप्रती । हे कान माझे न ऐकती ।

ऐकोन षडाननादि वीर बोलती । यथामती करोनियां ॥८८॥

काय मुनी तुह्मी बोलता । तुह्मी न जाणा गौरीसुता ।

जो अनंत ब्रह्मांडांचा निर्मिता । पितामाता जगताचा ॥८९॥

काय सिंधूचा पाड याशी । ऐकतां नारद म्हणे त्याशी ।

ही गोष्ट खरी न वाटे मजशीं । प्रत्यक्ष नयनी पाहिल्यावीण ॥९०॥

ऐसें ऐकतां नारदवचन । गुणेश बोले तेव्हां गर्जुन ।

काय ह्मणावें तुह्मालागुन । ब्रह्मज्ञानी आपण आहा ॥९१॥

आतां मारीन सिंधूदानव । कौतुक दावीन तुला अभिन्नव ।

ऐसें बोलोन देवाधिदेव । सांगे गणासि तेधवां ॥९२॥

तुह्मी जाऊनियां आतां । बाहेर काढा चक्रपाणीसुता ।

त्याचें वचन ऐसें ऐकतां । वीर चारी निघाले ॥९३॥

नंदीभृंगीभूपती । वीरभद्र निघाला सुमती ।

चौघे वीर गंडकीप्रती । शीघ्रगती पावले ॥९४॥

येऊनियां मंडपाभीतरी । भृंगी उड्डाण वरी करी ।

शतखणी मंडप ते अवसरीं । उर्वीवरी पाडीतसे ॥९५॥

ऐसें पाहून कर्म त्याचें । सैन्य धांवलें दानवेंद्राचें ।

तेथें युद्ध जाहलें त्यांचें । अत्युद्भुत तेधवां ॥९६॥

शतकोटी असुरगण । त्यांचें चौघानी करुन कंदन ।

मग प्रवेशले सिंधुभुवन । चौघे जाण तेधवां ॥९७॥

दुत सांगती सिंधुरायास । काय येथें तूं निजलास ।

शत्रुनें मारिलें सेनेस । राजमंडपास विध्वंसिलें ॥९८॥

ऐकोन दूतमुखाची गोष्टी । सिंधु जाहला तेव्हां कष्टी ।

त्यास बोले दुर्गा गोरटी । आतां संकटीं पडलास रे ॥९९॥

मी पूर्वीं उपदेशिलें । तूं तेव्हां नाहीं ऐकिलें ।

त्याचें फळ आतां पावले । दुःख देखिलें प्राणेश्वरा ॥१००॥

ऐसें तिजजवळ बोलत । तंव चारी वीर आले आंत ।

सिंधूस केश धरुनी वोढित । वीरभद्र तेधवां ॥१॥

सिंधू घेऊनियां धनुष्यातें । सोडी तेव्हां उरगास्त्रातें ।

भृंगी गरुडास्त्र सोडोनि निरुतें । पन्नागाशि वारीतसे ॥२॥

सिंधू अग्‍न्यस्त्रास सोडित । पर्जन्यास्त्र भृंगी मोकलित ।

पर्वतास्त्र दैत्यनाथ । तेव्हां टांकित लगबगां ॥३॥

भृंगी योजी वज्रास्त्राशी । ते निवारी पर्वताशी ।

मग मिसळले मल्लयुद्धाशी । वीर प्राणासि घेऊं पाहती ॥४॥

नंदीनें हाणोनि शृंग तिखट । सिंधू मस्तकींचा पाडिला मुगुट ।

लाता मारी भृंगीभट । सिंधुलागीं तेधवां ॥५॥

वीरभद्र तेथें सिंधू देखतां । केशीं धरोन त्याची कांता ।

वस्त्र आसुडी तेव्हां तत्वता । करी आकांता दुर्गासती ॥६॥

झांकोनियां दोन्ही डोळे । सिंधुवनिता तेथून पळे ।

पाहतां सिंधू तेव्हां खळवळे । भृंगी करतळें मारी तयास ॥७॥

सिंधू क्रोधें प्रज्वाळला । षडाननाचे पायीं झोंबला ।

मुष्टीप्रहार मारी नंदीला । भृंगीस पाडी शिखा धरुनी ॥८॥

मग मुगुट मस्तकीं घालुन । अश्वावरी तेव्हां बैसून ।

सवें तेव्हां वीर घेऊन । अंबानंदना मारीन म्हणे ॥९॥

सिंधु तेव्हां करीत गर्जना । वेगीं आला रणांगना ।

आल्हाद जाहला गौरीनंदना । त्याच्या कंदना करीन म्हणे ॥११०॥

मयूरावरी गुणेश बैसला । सिंहनादें गर्जु लागला ।

तंव तेथें सिंधू पातला । वर्षु लागला सायकांशी ॥११॥

सिंधू जें जें अस्त्र सोडी । तें तें गुणेश परशूनें तोडी ।

दोघे भिडती पडींपाडीं । देव पाहती कौतुक ॥१२॥

रावण आणि राघव । किंवा त्रिपुरासुरशिव ।

तैसें युद्धाचें महालाघव । दाविती तेव्हां परस्परें ॥१३॥

सिंधू सोडीं अनलास्त्र । वन्ही प्रगटतां गौरीकुमर ।

पर्जन्यास्त्र घालोनि सत्वर । वैश्वानर शांत करी ॥१४॥

वर्षती पर्जन्याच्या धारा । दैत्य प्रेरी तेव्हां भूधरा ।

दैत्य मोकली पवन बरा । प्रेरी भूधरा मयूरेश ॥१५॥

वज्रास्त्र सोडी सिंधू त्यावर । गुणेश वज्रास सोडी सत्वर ।

तेणें नादें भरलें अंबर । भांडती परस्पर दोन अस्त्रें ॥१६॥

तेव्हां कडकडाट मोठा जाहला । प्राणियांसि प्रळय वाटला ।

वन्ही त्यापासुनी पडूं लागला । भिडतां गुप्त जाहलीं अस्त्रें ॥१७॥

दानवेश प्रळय करी । वर्षूं लागला अस्त्रें सारीं ।

गुणेश परशूनें निवारी । किंशुकापरी दिसती दोघें ॥१८॥

सिंधुनें घेतली धांव । मारावया धांवे सगर्व ।

हें पाहोन देवाधिदेव । विराटस्वरुपा धारण करी ॥१९॥

किरीट विलसती सहस्त्रमुखें । सहस्त्रबाहू चरण तितुके ।

हें पाहतां सिंधु दुःखें । मूर्च्छित पडला भूमीवरी ॥१२०॥

मग सावध सिंधु होउनी । नेत्रीं ठेवोन हस्त दोन्ही ।

रविवर तो स्मरे मनी । म्हणे गोक्षदानी हा असे ॥२१॥

याचे हातें पावतां मरण । पावेन त्याचें पद निर्वाण ।

मग उघडूनि पाहे नयन । गौरीनंदन पुढें उभा ॥२२॥

षड्‌भुज सुंदर मयुरावरी । आयुधें शोभिता चार करी ।

त्याचें हृदयीं ध्यान करी । सिंधु धरी आयुधातें ॥२३॥

गुणेशें परशू अभिमंत्रिला । जेव्हां सिंधुवरी भिरकाविला ।

सहस्त्र विजांपरी कडाडिला । तेणें तडकला भूगोळ ॥२४॥

भूतमात्र पावलीं त्रास । शेष सांवरी कुंभिनीस ।

पात घडला नक्षत्रांस । भय देवांस वाटलें पैं ॥२५॥

प्रळय करित परशू चाले । सिंधूनें हातीं चक्र घेतलें ।

तंव परशूनें हृदय भेदिलें । बाहेर पाडिलें अमृतासी ॥२६॥

हृदयपासोनि निघालें अमृत । सिंधू पडला जैसा पर्वत ।

मुखें भडभडां वमी शोणित । प्राण सोडित तेधवां ॥२७॥

मयुरेशाचें प्रसादेंकरुन । सिंधू गेला मुक्त होऊन ।

धर्म जाहला प्रसन्नवदन । अधर्म मुळींहून पळाला ॥२८॥

प्रसन्न जाहल्या दशदिशा । सुरांची जाहली पूर्ण आशा ।

स्तविते जाहले जगदीशा । महोत्साहें करुनियां ॥२९॥

देव वर्षती पुष्पसंभार । अप्सरा नृत्य करिती सुंदर ।

षडाननादि सकल वीर । जयजयकार करिताती ॥३०॥

सिंधु दैत्येंद्र पावतां मरण । सेवक करीत गेले रुदन ।

दुर्गा ऐकतां सिंधूचें निधन । करी पतन धरणीवरी ॥३१॥

अट्टाहास्यें करी शोक । अवनीवरी फोडी मस्तक ।

निजकरें फोडोन मुख । गडबडां लोळे भूमीवरी ॥३२॥

काढोनि टांकी अलंकार । मस्तकीचे तोडी चुकूर ।

म्हणे माझा प्राणेश्वर । मज टांकूनि गेला कैसा ॥३३॥

ऐकतां पुत्राचे निधन । सदार तत्पिता करी रुदन ।

भोंवती मिळाले आप्तजन । तेही रडती दीनस्वरें ॥३४॥

एकचि जाहला हलकल्लोळ । शोकीं बुडाले जन सकळ ।

ऐसा शोक ऐकोनि तुंबळ । वयोवृद्ध तपोवृद्ध पातले ॥३५॥

त्याहीं करितांचि बोध । चक्रपाणी जाहला सावध ।

रणभूमीसि येऊनि प्रबुद्ध । करी संस्कार पुत्राचा ॥३६॥

दुर्गा असुरेंद्राची ललना । तिणें केलें सहगमना ।

संतोष वाटोन चक्रपाणीमना । शिवनंदना विनवीतसे ॥३७॥

तूं अनादिनिधन जगन्निवास । आतां चाले मढ्‌गृहास ।

अंगिकारोनि माझे पूजनास । दे आम्हास सद्गती ॥३८॥

त्याचा भाव पाहता संतोषला । मयूरेश शिखीवरी आरुढला ।

शिव नंदीवरी तेव्हां बैसला । हिमनगबाला अग्रीं घेतली ॥३९॥

वीरभद्र षडानन । संपूर्ण निघाले शिवगण ।

समारंभें पार्वतीनंदन । निघता जाहला तेधवां ॥४०॥

गंडकीपुरींत प्रवेशतां देव । नागरिक धांवती तेव्हां सर्व ।

गुणेशमूर्ती पाहतां अभिन्नव । आनंदवैभव पातलें ॥४१॥

गोपुरीं चढोनि नायका । सद्भभावें पाहती विनायका ।

म्हणती हा मन्मथाहूनि निका । नयनसुखा देतसे ॥४२॥

याचें पाहतां कमनीय वदन । आमचें जन्म जाहलें पावन ।

कोण वरील यास अंगनारत्‍न । तेच धन्य संसारीं ॥४३॥

पुढें चाले चातुरंगसेना । बाळें आळविती अंबानंदना ।

आरत्या वोवाळिती नागरिकांगना । लाजा वोपिती सप्रेम ॥४४॥

ऐसा समारंभें मोक्षदानी । प्रवेशला राजसदनीं ।

चक्रपाणी कर जोडुनी । विनवोनि आसनीं बैसवी तयां ॥४५॥

तेथें होते सकळ देव । त्यांत सुस्मितवदन माधव ।

मयूरेशाचा करी स्तव । सुर सर्व करिती स्तुती ॥४६॥

पूजा साहित्य सिद्ध करुन । मांडोनियां सिंहासन ।

वरी बैसवोनि आर्यानंदन । करी पूजन भूपती ॥४७॥

मंदाकिनीचें आणोनि उदक । तेणें करी अभिषेक ।

पयस्विनीचें पयें अलोलिक । घाली स्नान भूपती ॥४८॥

मुलें करिती जयजयकार । जय मयूरेश्वर मयूरेश्वर ।

वाद्यें वाजती सुस्वर । आनंद थोर बळावला ॥४९॥

षोडशोपचारें करी पूजन । राजा करी गुणेशस्तवन ।

तंव इंद्रासि मायावर्ण पडुन । बोले धिःकारुन राजयाशी ॥१५०॥

म्हणे मूर्खा काय केलें । वृद्धें देव टांकोनि तुं बळें ।

आधीं हे बाळ कैसें पूजिलें । यश बुडविलें आपुलें तुवां ॥५१॥

त्रैलोकेश मधुसूदन । परमात्मा पार्वतीरंजन ।

जगज्जननी अंबा टांकुन । अग्निनंदन पुजशी तूं ॥५२॥

ऐसी ऐकतां शक्रवाणी । तयासि वदे चक्रपाणी ।

मी एक पाहिली त्याची करणी । इतर काहणी न कळे मज ॥५३॥

तुजसहित सारे देव । बंदीस घालितां सिंधू दानव ।

येणे वधोन हे वासव । मुक्त केलें तुम्हातें ॥५४॥

यावरुन मला असें भासले । आधीं पूजितां यासि भलें ।

ते जरीं तूतें नाही मानवलें । तरीं राहिलें आमचेपासीं ॥५५॥

ऐसें राजा अनुवादें । तव ब्रह्मांड भरलें महानांदे ।

मूर्च्छित पडलीं देववृंदें । अवनी कांपे थरथरां ॥५६॥

वाटे ब्रह्मांडगोळ तडके । तंव आपुलें स्वरुप विश्वनायकें ।

प्रगटितां नेत्र झांकिले अंकें । भक्तकौतुकें पाहती ॥५७॥

दशबाहू आयुधें हातीं । गजमुख शोभे गणपती ।

सिद्धिबुद्धी दोन्ही युवती । चामरें ढाळिती कौतुकें ॥५८॥

सावध होऊनि इंद्रादिदेव । पाहते जाहले देवाधिदेव ।

तंव तो भासे क्षणांत माधव । सूर्य शिवशक्तीरुपें ॥५९॥

आणखी पाहती जव न्याहळून । तों पुन्हां दिसे भक्तप गजानन ।

तंव आकाशवाणी वदे गर्जुन । हो सावधान पुलोमजेशा ॥१६०॥

हा त्रिभुवन नायक अंबात्मज । अनेक ब्रह्मांडें करी सहज ।

त्यास आधीं पूजावा तेणें काज । कोणतेंही सुफल घडे ॥६१॥

पंचतत्वांतून एकाचें करितां पूजन । पांचाचेंही घडे अर्चन ।

भेद मानी तयास नरक दारुण । घडेल भोगणें यमलोकीं ॥६२॥

हा परमपुरुष नगजासुत । ऐसी नभोवाणी ऐकून पुरुहुत ।

जाहला मनीं चिंताक्रांत । म्हणे भक्तनाथ रुष्टविला ॥६३॥

मग जोडोनियां दोन्ही कर । नमन करी वारंवार ।

गुणेशास म्हणे क्षमा कर । अपराध थोर मी केला ॥६४॥

इंद्र आणोनि पूजाभार । पुजिला भावें शिवकुमर ।

त्यामागें संपूर्ण अमर । पूजिते जाहले गुणेशातें ॥६५॥

देशोदेशींचे भूपती । तेही गुणेशाची पूजा करिती ।

बालवृद्धकुमारयुवती । तेही पूजिती भावबळें ॥६६॥

तेथें वर्तला ब्रह्मानंद । गायन करी प्रेमें नारद ।

जयजयकारें गाणपत्यवृंद । रंगमंडपीं गर्जताती ॥६७॥

वक्ता म्हणे श्रोतयांशी । पुढें द्या अवधान कथेशी ।

ब्रह्मा करील कन्यादानाशी । त्या कथेसि कथीन पुढें ॥६८॥

जयजयाजी मनमोहना । सर्व माया निरंजना ।

संकटहरणा भवभंजना । अंबानंदना परेशा ॥६९॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।

क्रीडाखंड रसभरित । सप्तविंशोध्याय गोड हा ॥१७०॥अध्याय॥२७॥ओव्या॥१७०॥

अध्याय सत्ताविसावा समाप्त

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४