Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ४

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदत्तात्रेय प्रसन्न ॥

राजा विनवी दीनवदने ॥ आता कृपा कीजे समर्थाने । ऐकोनि त्याची करुणावचने । ऋषी मनी विचार करी ॥१॥

ऋषी म्हणे राजा ऐक । आहेत येथे उपाय अनेक । करिता न घडे त्यातील एक । अलोलिक एक असे ॥२॥

दुरित रोगी रसायण । गणेशपुराण निरूपण । करितो ते करी श्रवण । उद्धारण होईल ते ॥३॥

ऐसे वदूनि महामुनी । गणेशनामाष्टके मंत्रुनी । शरीरी प्रोक्षितांच पाणी । नवल जनी वर्तले ॥४॥

नाशिकरंध्रांतूनि भूपतीचे । सूक्ष्म शरीर जयाचे । कृष्णवर्ण पुरुष निघता त्याचे । शरीर स्थूळ वाढले ॥५॥

सप्ततालसदृश उंच थोर । जैसा कज्जलाचा डोंगर । विक्राळ दाढा भयंकर । कुंकुमाकार नयन ज्याचे ॥६॥

मुख बाहेर विक्राळ । जिव्हा कृष्णवर्ण विशाळ । आरक्त दिसे नेत्रबुबुळ । अग्निज्वाळा मुखे वमी ॥७॥

पूय शोणीत मांसभार । वमून दाढा करकर । वाजवी तेणे दिशा थोर । नादे समग्र कोंदल्या ॥८॥

डोळे विशाळ वटारी । क्षणात करी अंधापरी । भयंकर मुखे गर्जना करी । अट्टहास्ये करी महानाद ॥९॥

ऐसा अवलोकिता क्रूर । आश्रमवासी स्त्रिया नर । भये पळती निशाचर । अवलोकने ज्याचिया ॥१०॥

सुधर्मा होवोनि भयविव्हळ । नेत्र झाकोनि पडे वेल्हाळ । ऐसा अवलोकूनि पुरुषप्रबळ । भृगु पुसे तयाशी ॥११॥

कवण तू क्रूरकर्मा । सांग माते आपले नामा । तो म्हणे पुरुषोत्तमा । पापपुरुषनामा मी असे ॥१२॥

सकल प्राणिमात्र शरीरी । मीच वसे दुराचारी । त्वन्मंत्रित पावता वारी । शरीराबाहेरी पडिलोंची ॥१३॥

जाहलो अत्यंत क्षुधातुर । भक्षीन आता ही सुंदर । भक्षीन सोमकांताचे शरीर । जन समग्र खाईन मी ॥१४॥

ऋषि म्हणे तयालागुन । गलितपत्रवृक्ष याचे भक्षण । कर माझे आज्ञेकरून । नातरी भस्म करीन तुझे ॥१५॥

मग शुष्क वृक्ष न लगता क्षण । केला तयाने भक्षण । भस्म जाहला आम्र संपूर्ण । पुरुष दारुण कांपतसे ॥१६॥

ऋषिशापभये पापपुरुष । त्या भस्मी प्रवेशला निःशेष । सोमकांत पाऊन तोष । ऋषीसि रक्ष म्हणतसे ॥१७॥

रायासि म्हणे तपोधन । गणेशपुराण करी श्रवण । तेणे जाऊन पाप दारुण । मग कल्याण होय तुझे ॥१८॥

जो भस्म जाहला आम्रद्रुम । तो टवटवोनि पुन्हा उत्तम । होईल तेव्हा पापकर्म । संपूर्ण तुझे नासेल पै ॥१९॥

वृत्ति करोनिया स्थिर । श्रवणी असावे सादर । तेणे तुष्टोनि लंबोदर । करील उद्धार जगद्‌गुरु ॥२०॥

राजा म्हणे महामुनी । गणेशपुराण हे जनी । ऐकिले नाही अद्याप कानी । तुज कोठोनि लाधले ॥२१॥

ऋषि म्हणे सोमकांताते । ब्रह्मदेवे कथिले व्यासाते । तेणे कथिले जे माते । तेचि तूते सांगतो ॥२२॥

आता करी तीर्थी स्नान । श्रवणार्थ संकल्प करून । व्रतस्थ राहून अनुदिन । सप्रेम श्रवण करावे ॥२३॥

करूनि स्नान भृगुतीर्थी । संकल्प करिता श्रवणार्थी । निष्पाप होताच चक्रवर्ती । शरीरआर्ति मावळली ॥२४॥

क्रिमीकुष्ठरहित साचार । तत्काळ जाहले दिव्य शरीर । आनंदोनिया नरवीर । मुनिवरा नमी सदा ॥२५॥

हर्ष न माये पोटी । आनंदे कोंदली सकल सृष्टी । प्रसन्न वदने सुधर्मा गोरटी । ऋषिपदी मिठी घालितसे ॥२६॥

राजा म्हणे उत्तमपुरुषा । संकल्प करिता माझे दोषा । नाश जाहला तेणे हर्षा । पावोनि निरामय जाहलो ॥२७॥

श्रवणी उल्हास वाटे परम । ते पुराण सांगे अति उत्तम । जेणे पुरतील सकल काम । आनंदधाम दुःखितांशी ॥२८॥

ऋषी म्हणे पुरुष पंचानना । लघुशुष्कार्द्रस्थूल पापरचना । नासोनि छेदी भवबंधना । ऐसा महिमा पुराणाचा ॥२९॥

यज्ञविध्वंसशोकार्तदक्षनृपे । मुद्गलऋषीपासोन साक्षेपे । श्रवण केले जे ते त्वा निष्पापे । श्रवण करणे सादर ॥३०॥

कलियुगी जन समस्त । वेदार्थज्ञान आचाररहित । त्यांचे उद्धरणार्थ सत्यवतीसुत । पुराणे बहूत बोलिला ॥३१॥

स्वविद्यागर्व धरोनि जाण । आरंभी न करीच मंगलाचरण । स्तविला नाहीच गजवदन । तेणे विघ्न पावला ॥३२॥

चित्ती जाहली बहुत भ्रांती । नित्य नैमित्तिक कर्माचरणगती । वेदशास्त्रपुराणे नाठवती । ह्रदयी खंती करितसे ॥३३॥

विस्मित होवोनि मनात । सत्यलोकी गेला त्वरित । वंदोनिया विष्णुसुत । स्तवन करीत भ्रांत मने ॥३४॥

नेत्री आणोनिया पाणी । लोटांगण घाली चरणी । म्हणे भ्रांत झालो अंतःकरणी । तुझे चरणी शरण आलो ॥३५॥

विधिनिषेध धर्माचार । मजपासोनि सकळ नर । श्रवण करोनि सविस्तर । तदनुसार राहटती ॥३६॥

परि माझेच ठाई जाहली भ्रांती । मी शरण जावे कवणाप्रती । तूच सर्वज्ञ ज्ञानमूर्ती । निवारी भ्रांति येवढी पै ॥३७॥

ऐसे व्हावया काय कारण । नाही आचरलो पापाचरण । असोनि भगवत्परायण । अंतःकरण संतप्त सदा ॥३८॥

ऐकोनि त्याचे करुणावचन । कृपेने द्रवला कमलासन । विचार करून बोले वचन । व्यासालागून तेधवा ॥३९॥

कार्यारंभी विचार सूक्ष्म । न करोनि करिती सदा कर्म । ते पावती विघ्न परम । तुज ऐसेच सर्वदा ॥४०॥

विद्यामदे अति गर्वित । स्वकार्या वर्तती निश्चित । ते ऐसेच होती भ्रांत । जन निश्चित सत्वरी ॥४१॥

अनादिनिधन जो जगत्कर्ता । जगन्मय जो जगध्याता । आनंदकंद जो जगद्भर्ता । विघ्नहर्ता जगद्‌गुरू ॥४२॥

इंद्रादिक सकल निर्जर । सूर्य चंद्र विष्णु शंकर । ज्याची आज्ञा करोनि पुरःसर । सुर साचार वागती ॥४३॥

मीहि ज्याचे सत्तामात्रे । उभवितो ब्रह्मांडयंत्रे । पुनीत होवोनि ज्याच्या मंत्रे । विश्वविचित्रे करीतसे ॥४४॥

तुवा पुराणेकरिता पाही । आरंभी त्याते स्तविले नाही । विद्यामदे वर्तताही । विक्षिप्त तेणे जाहलाशी ॥४५॥

वेदशास्त्रार्थ तत्वज्ञ । ब्रह्म जाते बोलती प्राज्ञ । त्याशी शरण जाता धन्य । मति सूज्ञ होईल तुझी ॥४६॥

सांडोनि विद्यामदासी । शरण रिघे गजाननासी । ऐसे ऐकता विरंचीसी । व्यास वेगेशी पुसतसे ॥४७॥

ऐसा विश्वनियंता गणपती । कैसी त्याची स्वरूपस्थिती । अवतार त्याचे आहेत किती । सांगा मजप्रति विस्तारे ॥४८॥

पूर्वी कोणी अर्चिजेला । तेणे प्रसाद कवणाशी केला । कैसी त्याची अघटित लीळा । सांगे मजला विस्तारे ॥४९॥

भृगु म्हणे गा भूपती । व्यासवाणी ऐकोनि चिती । संतोष पावोनि सावित्रीपती । लीला कथी गणेशाची ॥५०॥

धाता म्हणे श्रवणपात्रा । ऐके सादर गणेशचरित्रा । गणती नाही ज्याचे मंत्रा । सत्यवतीपुत्रा साच पै ॥५१॥

सप्तकोटि मंत्रविधाना । आगमी कथिले पराशरनंदना । त्यातील घेवोनि उपासना । शुचिर्भूतमना मी जाहलो ॥५२॥

शिवे मज उपदेशिले । त्यामाजी श्रेष्ठ मी साधिले । षडक्षर एकाक्षर भले । तेआतुले सांगेन तुज ॥५३॥

ज्याच्या स्मरणमात्रे महाबुद्धी । अग्री तिष्ठती सकळसिद्धी । सकळ सुखाचा सुखनिधी । दुःख कधी पावेना ॥५४॥

मंत्रोपासक जे नर । ते ज्ञानियांमाजी अग्रसर । नानाविद्या कौशल्यचतुर । पूजापरते पावती ॥५५॥

स्वइच्छे त्यांचा विहार । सर्वज्ञ ते नानारूपधर । जे गणेशपदारविंदभ्रमर । तेचि थोर जगामाजी ॥५६॥

गणेशभक्ती नसे ज्यासी । माय व्यर्थ प्रसवली त्यासी । न पाहावे त्याचे मुखासी । जनासि विघ्ने त्याचेनी ॥५७॥

नसे भक्तिजिव्हाळा ज्याचे ह्रदी । तो शून्यबुद्धीचा आदी । त्या नराचे पदोपदी । अवनीह्रदयी दुःख पावे ॥५८॥

जे मंत्रोपासक मानव । त्यांचे दर्शनमात्रे वैभव । पावती गा सकल देव । नमिती सर्व तयासी ॥५९॥

मंत्रोपासक जे नर । तेच जीवन्मुक्त साचार । भाग्य भोगोनिया थोर । संसारसार तयांचा ॥६०॥

यालागी सत्यवतीनंदना । ऐके एकाक्षर उपासना । अनुष्ठानमात्रे तुझिया मना । भ्रांतिकल्पना न शिवे पै ॥६१॥

करूनिया प्रातःस्नान । करावे धौतवस्त्र परिधान । कुशमृगाजिन । त्यांचे आसन घालावे ॥६२॥

करूनि मग आसनविधी । वरि बसोनि साधक सुबुद्धी । प्राणायाम भूतशुद्धी । न्यासविधी करावा ॥६३॥

नित्यकर्म करोनि पवित्र । आगमोक्तमंत्र संध्यातंत्र । करोनि होइजे शुद्धपात्र । न्यासमंत्र अनुव्यापके ॥६४॥

चरणापासूनि मुगुटवरी । ध्यानी कल्पावी मूर्ति गोजिरी । मग पूजावी मानसोपचारी । एकाग्रचित्ते करोनिया ॥६५॥

निश्चळ राखावे अंतःकरण । मग करावे पुरश्चरण । तेणे संतोषे शूर्पकर्ण । कामना पूर्ण करीतसे ॥६६॥

जव होय साक्षात्कार जाण । तव करावे पुरश्चरण । कामक्रोधादि शत्रुदमन । करिता गजकर्ण संतोषे ॥६७॥

ऐसे विधान सांगोनि समस्त । मग पाहून सुमुहूर्त । एकाक्षर मंत्र अद्‌भुत । कर्णरंध्रे परिसवी ॥६८॥

होता ह्रदयी पुनीतमती । निरसोनि गेली ह्रदयभ्रांति । त्रिकालज्ञाने स्वस्थचित्ती । सुरपतिशी वंदी तदा ॥६९॥

व्यास म्हणे प्रजापती । गेली मम ह्रदयभ्रांति । अनुष्ठान करीन आता सुमती । एकाग्रवृत्ति करोनिया ॥७०॥

संतोषोनि म्हणे कमळासन । एकांती करावे अनुष्ठान । न सांगावे शठलागोन । नास्तिक दुर्जन शरण जरी ॥७१॥

जे का वेदशास्त्री विनीत । दृढश्रद्धाभक्तियुक्त । त्यांशि मंत्रोपदेश त्वरित । करोनि मुक्त करावे ॥७२॥

दशपूर्व दशपर । त्याचे वंशज जे का नर । ते पावतील निरयघोर । कुपात्री मंत्र उपदेशिता ॥७३॥

भक्तियुक्त सदाचारी । तोच या मंत्रासी अधिकारी । जो भावे अनुष्ठान करी । तोच संसारी धन्य पै ॥७४॥

पुत्रपौत्रधनसंपदा । तो भोग भोगोनिया सदा । अंती विभागी गणेशपदा । जन्मापदा न भोगी कधी ॥७५॥

एकदंत महाप्रसादे । जीवन्मुक्त देहीच नांदे । त्याची वंदावी पदारविंदे । महानंदे करोनिया ॥७६॥

व्यास म्हणे सुरनायक । कवणाशि तुष्टला गणनायक । ही कथा जी अलोलिक । मजलागी कथिजे का ॥७७॥

ऐकोनि तयाचे श्रद्धावचन । ब्रह्मा म्हणे धन्यधन्य । ज्याचे गाठी अगाध पुण्य । तोचि मान्य श्रवणासी ॥७८॥

आता होवोनि सादर । कथा ऐके मनोहर । ॐकाररूपी लंबोदर । विघ्नहर पूज्य सदा ॥७९॥

सदसद्‌ व्यक्ताव्यक्त व्यापक । सर्व पाहे विनायक । सुरासुर गंधर्व गुह्यक । उपासक सर्व त्याचे ॥८०॥

दैवयोगे प्रलयकाळी । सृष्टी अवघी लयास गेली । माया अवघी निरसली । लीन झाली स्वरुपी ॥८१॥

अणूहुन अणुतर । परब्रह्म जे निर्विकार । पुन्हा पावले आकार । चराचर मायामय ॥८२॥

तयापासूनि गुणाकार । ब्रह्मा विष्णु आणि शंकर । उत्पन्न करी लंबोदर । परमात्मा जगद्‌गुरू ॥८३॥

सृष्टिडंबर मायामय । उत्पन्न करी महाकाय । मायेने भ्रमोनि देवत्रय । त्याचे पाय स्मरती सदा ॥८४॥

तुझी माया नकळे अनंता । आम्ही कार्य काय करावे आता । तुजवाचोनि बुद्धिदाता । आता आम्हा कोण असे ॥८५॥

स्वजनावलोकनकाम । दवदवोनि फिरती देवोत्तम । मुखे उच्चारिती मंगल नाम । मन विश्राम जयाचे ॥८६॥

धुंडोनिया अवनीतळ । मग शोधिती स्वर्गपाताळ । परि न भेटे दीनदयाळ । श्रम केवळ पावले ते ॥८७॥

शैलशिखरी गिरिकंदरी । सरित्सरोवरी सागरी । धुंडिता भ्रमले अंतरी । चराचरी शोधिती ते ॥८८॥

तव पुन्हा रमणीक । जलाशय पाहिला सन्मुख । हंस कारंड चक्रवाक । पक्षी अनेक त्याभोवती ॥८९॥

पुंडरीको भोज कल्हार । जळचरे तळपती मत्स्यभार । नाना जाति तरुवर । वेष्टित सरोवर देखिले ॥९०॥

तेथे करोनिया स्नान । क्षणेक विश्रांति घेवून । मग धरिले त्याणं ध्यान । चंचलमन आकळोनिया ॥९१॥

स्तवन करिती दीनवदने । नेत्री लोटली दुःखजीवने । म्हणती उपेक्षिले गजानने । व्यर्थ जिणे जगोनिया ॥९२॥

न देखता गणेशचरण । व्यर्थ गेले झालेपण । आम्हा नये का मरण । व्यर्थ जिणे संसारी ॥९३॥

आहाहा गा पुरुषोत्तमा । व्यर्थ नमिले तुवा आम्हा । त्वद्दर्शनावीण पावतो श्रमा । मनविश्रामा सुखाब्धे ॥९४॥

आम्ही पतित तू पावन । आमचे अन्याय क्षमा करून । करी आमचे समाधान । देऊन दर्शन येधवा ॥९५॥

न दाखविशी जरी चरण । उभेच सांडू आता प्राण । दीनानाथ तूच एक पूर्ण । काय निर्वाण पाहसी ॥९६॥

ऐसी जाणोनि त्याची ग्लानी । कृपेने द्रवला विश्वयोनी । निजस्वरुपे प्रगटोनी । अभयवचनी गौरवी तया ॥९७॥

साकारली दिव्य मूर्ती । मुकुटतेजे कोटिगभस्ती । खद्योतप्राय झाकोळती । अंगकांति अरुणरंग ॥९८॥

खङ्गखेटकधनुःशर । तेणे मंडित तिन्ही कर । वरदपाणी अभयंकर । उभारोनि धावला ॥९९॥

जैसा ज्याचे ह्रदयी भाव । तयासि भेटे तैसा देव । दीनदयाळ आपुले नाव । घेऊनि धाव साच करी ॥१००॥

कटिसूत्राची पावोनि प्रभा । हेमाद्री पावला दिव्य शोभा । अंगरागे रंग नभा । प्रभातकाळी संचरला ॥१॥

ज्याचे मुखेंद्रूची एक कला । पावोनि पूर्ण चंद्र जाहला । ऐसा महाराज प्रगटला । अवलोकिला देवत्रयी ॥२॥

गणेशकृपाकटाक्षलब्धी । होता होऊन प्रसन्नबुद्धी । स्तवने मागती सकल सिद्धी । चातुर्यनिधि तेधवा ॥३॥

कमलासन विष्णु शंकर । जोडोनिया दोन्ही कर । स्तवने तोषविती लंबोदर । अति सुंदर भक्तिभावे ॥४॥

ॐनमोजी निर्विकारा । निर्विशेषा निराकारा । निरालंबा निराधारा । तुझिया पारा कोण जाणे ॥५॥

चिदाभासा चिदानंदा । चित्स्वरूपा आनंदकंदा । निजजनह्रदयमिलिंदा । निर्मलपदा गणेशा ॥६॥

रजोयोगे तू कमलासन । सत्वयोगे जनार्दन । तमोगुणे पंचानन । तेजोनिधान सूर्य तू ॥७॥

अमृतमया पूर्णशशांका । सुधाभुगाश्रया सुनाका । नभाश्रया भीमजनका । निजजनरक्षका सुखाब्धे ॥८॥

तू जगाचा आदिकारण । विश्वी विश्वाचा तूचि प्राण । तुझे करिता नामस्मरण । जन्ममरण मग कैचे ॥९॥

तुझी उघडता पूर्ण दृष्टी । नांदो लागेल सकल सृष्टी । तू उपेक्षिलियापाठी । संसारी कष्टी मग आम्ही ॥११०॥

ऐकोनि स्तवन गजानन । मग होवोनि प्रसन्न । देता जाहला वरदान । प्रसन्नमन जगदात्मा ॥११॥

म्हणे तुम्ही भाविक भले । स्तवने मज तोषविले । वांछितार्थ सर्व पुरले । नाही उरले विघ्न तुम्हा ॥१२॥

अव्याभिचारिणी भक्तीसी । पावाल तुम्ही आहिर्निशी । न गुंतोनि मायापाशी । मत्पदासि पावाल हो ॥१३॥

मग म्हणती देवत्रय । प्रसन्न जरी तू महाकाय । तरि सांगे काहि कार्य । शिक्षाचार्य तू आम्हा ॥१४॥

गणेश म्हणे कमलासना । त्वा करावी सृष्टिरचना । सत्वसंश्रया जनार्दना । तिची पालना तू करी ॥१५॥

अंती सकलहि संहार । तू करी का पिनाकधर । ऐसे सांगोनि अंकुशकर । मस्तकी कर ठेवी त्याचे ॥१६॥

सृष्टिसामर्घ्य वेदशास्त्रासी । गणेशे दिधले विरंचीशी । योगस्वच्छंद सामर्थ्यतेशी । देत विष्णुसी गणपती ॥१७॥

एकाक्षरादि मंत्रागम । तंत्रविद्या सकळोत्तम । यंत्रविद्याहि परम । सर्वोत्तम देव शिवा ॥१८॥

ऐकोनि सृष्टिरचनाकार्य । ब्रह्मा बोले धरोनि पाय । करावी सृष्टी कशी काय । येव्हडी सोय दाखवी मज ॥१९॥

ऐकोनि मग गणेश हासे । म्हणे उदरी माझे विलसे । सृष्टीचे आहेत अनेक ठसे । तैसेच तुवा करावे ॥१२०॥

नासाद्वारे आकळिला । नेवोनि ह्रदयी सोडिला । ब्रह्मा तेथे सृष्टिकुटाला । पाहता भुलला बहुसाल ॥२१॥

औदुंबरफळे जेवि वृक्षी । तैसी ब्रह्मांडे भरली कुक्षी । ब्रह्मा पाहे अष्टाक्षी । संख्या लक्षी धरवेना ॥२२॥

उदधीमाजी जैसा तरणी । वाहती तैशा विश्वश्रेणी । सप्तपाताल स्वर्गक्षोणी । नवल करणी तयाची ॥२३॥

अनेक हरिहर ब्रह्मदेव । अप्सरा यक्षगण गंधर्व । सूर्य चंद्र इंद्र समुदाव । पाहून खेद पावला ॥२४॥

मग म्हणे महाकाया । न कळे तुझी महामाया । आता दाखवी आपले पाया । गर्व वाया न करू कदा ॥२५॥

कोटि वर्षावरी शोधिता । तुझा पार न कळे अनंता । भक्तपालका एकदंता । तुझी अवस्था अगम्य ॥२६॥

मग तो कृपेने द्रवला । ब्रह्मा बाहेर काढिला । खिन्नमने चरणी लागला । स्तवू लागला चतुर्मुखे ॥२७॥

त्याचे मस्तकी हस्त ठेऊन । गणेश पावला अंतर्धान । श्रोते असावे सावधान । अवधान धरा पुढे ॥२८॥

जयजयाजी मंगलमूर्ती । तुझी न जाणे अद्‍भुत कीर्ती । मी एकवदने वर्णू किती । अल्पमती करूनिया ॥२९॥

जरी तुझी कृपा असेल आता । तरीहि पूर्ण घडवटेल कथा । कर्ता तूचि एकदंता । तुझे माथा हा भार ॥१३०॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंडअद्‍भुत । चतुर्थोध्याय गोड हा ॥ अध्याय ४ ॥ ओव्या १३१ ॥

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४