Get it on Google Play
Download on the App Store

क्रीडाखंड अध्याय १२

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

ॐ नमोजी वेदसारा । अघहारका परात्परा । विकटा रे सुंदरा । अगोचरा सुखाब्धे ॥१॥

तुझे करितांचि स्मरण । होय तत्काळ संकटहरण । निजानंद परिपूर्ण । होवोनि तिष्ठे तवपदी ॥२॥

श्रोते परिसा पूर्वानुसंधान । गजानने कीर्तीनंदन । देवोन तीते दर्शन । सुखसंपन्न केले तीते ॥३॥

ऐसे ऐकता सत्यवती कुमर । विधीस विनवी जोडोनि कर । गणेशलोक कोठे सुंदर । तो साचार सांगे मज ॥४॥

धाता म्हणे गा पराशरसुता । ऐक पूर्वील त्याची कथा । मुद्गले काशीपतीस तत्वता । गणेशलोक कथियेला ॥५॥

विनायक काशीपतीचे गृही । लीला दाऊनि विचित्र पाही । नरांतकदेवांतक असुर तेही । वधिले तेणे कौतुके ॥६॥

करूनि भूभारहरण । स्वधामी गेला गजकर्ण । रायासि लागले तेचि ध्यान । संसारी मन निवेना ॥७॥

अशनीशयनी विहारजनी । सदा आठवे कैवल्यदानी । राजा बैसोनि एकांतस्थानी । करी मनी ध्यान त्याचे ॥८॥

बालोन्मत पिशाचवत । राजा वर्ते अपरिमित । हे पाहोनि चिंताक्रांत । होते अमात्य तेधवा ॥९॥

हे जरी शत्रुस कळेल । तरी हे राज्य हरतील । इतक्यात ऋषि मुद्गल । येता जाहला राजाश्रमी ॥१०॥

येता देखिला मुद्गलमुनी । राजा सत्वर कर जोडुनी । पदी दंडवत तेव्हा घालुनी । जाहला स्तवनी सादर ॥११॥

त्याची पाहोनि भावभक्ती । मुद्गले केली परमप्रीती । म्हणे तुजवरी गणपती । सदा तुष्ट असे गा ॥१२॥

जो वेदांस अगोचर । तो होवोनि तुज गोचर । तुझे घरी लंबोदर । क्रीडत होता कौतुके ॥१३॥

राजा म्हणे गा विप्रोत्तमा । माझी एक आवड आहे उत्तमा । ती घडेल तरी भाग्य महिमा । वर्णवेना सहस्त्रमुखे ॥१४॥

या चर्मदेहा समवेत । सदा सेवीन एकदंत । असे पुण्य कोणते अद्भुत । मज सांग कृपार्णवा ॥१५॥

मुनि म्हणे गा सुमती । तुझे भाग्य वर्णु किती । सर्वाभूती गणपती । होता स्थिती घडेल हे ॥१६॥

राजा त्याचे लागोनि चरणी । म्हणे संशय एक अंतःकरणी । ती सांडवावा कृपा करुनी । तरीच जनी धन्य मी ॥१७॥

विनायकाचा लोक कोण । हे सांगावे मजलागुन । मुद्गल बोले सुहास्यवदन । कपिला पासोनि ऐकिले जे ॥१८॥

इक्षुसमुद्राचे आत । एक बेट लखलखीत । तेथे परमात्मा वास करीत । सिद्धिबुद्धीसमवेत पै ॥१९॥

ज्या स्थानी तरु सारे । कल्पित ते पुरविणारे । पाषाण मणी सर्वत्रे । कांचनमय घरे पै ॥२०॥

स्वयं प्रकाश गणेशगण । च्यारी मुक्ती भक्त पाउन । पुण्यवंती सेविले स्थान । कदा निधन असेना ॥२१॥

आधिव्याधी जरादैन्य । कवणासि नसे दैव शून्य । गणेश तेथे वेदमान्य । करी धन्य निजभक्ता ॥२२॥

सिद्धिबुद्धीचे प्राणजीवन । स्वस्वरूपी करी शयन । दो पदांचे संवाहन । दोन युवती करिती सद ॥२३॥

ज्याचा न कळे वेदा पार । निर्गुण आनंदमय साचार । भक्तांवरी दया थोर । यदर्थ साकार मिरवे सदा ॥२४॥

बालभावे गजवदन । सुंदर शोभे हास्यवदन । पादांगुष्ठी कोटिमदन । ओवाळावे क्षणोक्षणी ॥२५॥

चरणतळवे आरक्त दोन । तो नभी रंग भासमान । ध्वजपताका वज्रचिन्ह । तळी शोभती सामुद्रिके ॥२६॥

आरक्त शोभे बालशशी । नखे शोभती पदी तैशी । चरणी नूपरे झणत्कारेशी । गजर करिती असुरांवरी ॥२७॥

जंघावर्तुळ सोज्ज्वळ । सूर्यापरी उरु तेजाळ । कटिपश्चाद्भाग वर्तुळ । उदर लांबट साजिरे ॥२८॥

विशाळ शोभे वक्षस्थल । नवरत्नमाळा अति तेजाळ । कर्णी कुंडले रत्नमयसळ । सदा वाहती शशिसूर्यी ॥२९॥

बाहुदंड वर्तुळ सुलक्षण । गंडस्थळी आमोदघन । भ्रमर करिती वरी भ्रमण । सदा दान सेविती ॥३०॥

त्यावरी मुगुट नवरत्नमय । भक्ताभिमानी गणराय । जे सेविती त्याचे पाय । नाही भय त्यास कधी ॥३१॥

क्षीरसागरी नारायण । तैसा इक्षुसागरी गजकर्ण । पाचामध्ये भेद जाण । नाही नाही सत्य हे ॥३२॥

मुद्गल ऐसे सांगून । पावता जाहला अंतर्धान । काशीपतीची भक्ती पूर्ण । जाहले ज्ञान तयास पै ॥३३॥

विनायकप्रीत्युद्देशे । दाने अपार केली नराधीशे । तपे अनुष्ठाने महाक्लेशे । करिता जाहला काशीपती ॥३४॥

पाहोनि त्याची विनयभक्ती । प्रसन्न जाहले गणपती । विमान तेव्हा पाठविती । काशीपतीसि आणावया ॥३५॥

रवीची स्पर्धा करी विमान । खाली उतरता देखती जन । किंवा रविबिंब खचोन । येते वाटे भूतळी ॥३६॥

घंटा वाजती सुस्वरा । नृत्य करिती अप्सरा । गणपति सदृश गण सत्वरा । खाली उतरले भूतळी ॥३७॥

राजा पाहता नमून चरणी । सिंहासनी त्यास बैसउनी । सादर जाहला तेव्हा पूजनी । जो सज्जनी मान्य सदा ॥३८॥

पाहोनि त्याची विनयभक्ती । प्रसन्नमने दूत बोलिता । तुज पाचारितो भक्तपती । चर्मदेहा समवेत ॥३९॥

ऐकोन त्याचे ऐसे वचन । राजा उठला आनंदोन । त्यास म्हणे मी धन्य धन्य । पितर माझे धन्य हो ॥४०॥

तप करिता वर्ष कोटी । ज्याची कदा नोहे भेटी । तेणे मज नेण्यासाठी । पाठविले विमान पै ॥४१॥

आनंदाश्रू नयनी लोटले । राये अमात्य पाचारिले । पुत्रास त्याचे हाती दीधले । तयासि केले पदाधिकारी ॥४२॥

विमानासि करोनि प्रदक्षिणा । करी नमन क्षणक्षणा । विप्रांसि देऊनि अनंत दक्षिणा । मग बैसला विमानी ॥४३॥

धन्य राजा भाग्यवंत । चर्मदेहे विमानी बैसत । मार्गी जाता लोक पाहत । अनेक तेव्हा काशीपती ॥४४॥

जावोनिया इक्षुसागरी । भावे वंदिला भक्तकैवारी । तयासि बोले दनुजारी । गजानन स्वानंदे ॥४५॥

तुजवाचोनि भक्तटिळका । मज न वाटे कदा हरिखा । आता सप्रेम नरनायका । माझे निकटी असावे ॥४६॥

ऐसी ऐकता मधुरोक्ती । आनंदमय काशीपती । वारंवार चरणाप्रती । अति प्रीती नमन करी ॥४७॥

श्रोत्यांस विनवी वक्ता । मागील अनुसंधान ऐक आता । विनायक घरोघरी जेविता । जाहला तेव्हा नगरा पै ॥४८॥

माध्यान्ह समयी काशीपती । भोजनासि पाचारी विनायकाप्रती । तव तो गेला भोजनाप्रती । तयाप्रति नेऊ पातला ॥४९॥

बैसवोनिया शिबिकासनी । गजरे नेतसे स्वकीय सदनी । तव मार्गी दूत दोनी । देवांतकाचे पातले ॥५०॥

धरोनिया बालवेष । सन्निध वागती सावकाश । करावया विनायकाचा नाश । पाहती अवकाश पापात्मे ॥५१॥

एकाएकी विद्युद्वशे प्रकाशघन । वरी कोसळले कडकडोन । तेव्हा पळाले सुधापान । धापानी दाटोनिया ॥५२॥

सहस्त्र विजांचा कडकडाट । तैसे गर्जती घनदाट । काशीपतीचे सर्व भट । पळोनि गेले दशदिशा ॥५३॥

शिबिकावाहकी टाकोन यान । पळते जाहले प्राण भयान । ते दूत स्ववेष धरून । उभे राहिले सन्मुख ॥५४॥

विनायक एकला अनंतशक्ती । त्याते धरोन उभय हाती । गरगरा भोवंडी तयाप्रती । असुर वमिती शोणिताते ॥५५॥

भ्रमित जाहले अंतःकरण तयाचे । कृपेने द्रवले मन विनायकाचे । प्राण रक्षोनिया तयाचे । भूमीवरी टाकिले ॥५६॥

क्षणे होवोनिया सावधान । मनी पाहती विचारुन । म्हणते हा होय भगवान । नव्हे हा मानव कदा ॥५७॥

होवोनि अष्टभावे सद्गदित । दंडवत पडले ते दूत । म्हणती तू सनातन भगवंत । शक्तीस नाही अंत तुझे ॥५८॥

तू सर्वज्ञ पूर्णपुराण । करावया भूभार हरण । जाहलासि कश्यपनंदन । हे पुरे कळले आम्हासी ॥५९॥

विनायक म्हणे तुम्ही कोण । ते सांगा मजलागुन । दूत म्हणती तू सर्वज्ञ । जाणताहेस पुरुषोत्तमा ॥६०॥

देवांतकाचे आम्ही दूत । तूते विघ्न करावया येथ । आम्ही पातलो गणनाथ । परी रक्षिले कृपार्णवा तु ॥६१॥

अन्नदाता भयत्राता । जो रोगापासोनि जाहला रक्षिता । तो मानावा आपला पिता । जगन्नाथा निर्धारे ॥६२॥

विनायक म्हणे तयांप्रती । तुम्ही सांगा दैत्यास निश्चिती । येथोनि वर्तावे धरोनि स्थिती । तरीच नांदाल सुखरूप ॥६३॥

मग तयास करूनि नमन । जाते जाहले तेथुन । देवांतकासि वर्तमान । निवेदिते जाहले ॥६४॥

पाहोनि विनायकाचे बळ । नागरिक आश्चर्य करिती सकळ । येऊनि वंदिती पादकमळ । विनायकाचे तेधवा ॥६५॥

येऊनिया काशीपती । घेऊनि गेला मंदिराप्रती । तयासि करी विनंती । होऊनिया सद्गद ॥६६॥

राजा म्हणे विनायका । मज टाकोनि जेविलास बालका । तो म्हणे नरनायका । प्रतिग्रही होतासि तू ॥६७॥

नागरिकजन म्हणती रायाशी । तू आमचे गृही जेविलाशी । राजा आश्चर्य करी मानसी । विनायकाशी वंदोनिया ॥६८॥

जयजयाजी गजवदना । भक्तपालका निरंजना । जैसे येईल तुझिया मना । तैशी रचना करी पुढे ॥६९॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत । क्रीडाखंड रसभरित । द्वादशोध्याय गोड हा ॥७०॥ अध्याय १२॥ ओव्या ७०॥

अध्याय बारावा समाप्त

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४