Get it on Google Play
Download on the App Store

क्रीडाखंड अध्याय ६

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

श्रीसिद्धिबुद्धीचे नाथा । गोड तुझ्या पीयूषतुल्य कथा । श्रवणे पुरविती मनोरथा । करिती अनाथा सनाथ त्या ॥१॥

तुझे स्मरण करिता नेटे । विघ्ने पळती बारावाटे । सकल मायाजाळ तुटे । मन विटे या प्रपंची ॥२॥

तुझी नामे मुखी गाती । त्यांची पातके न उरती । संपूर्ण कामना पूर्ण होती । अंती पावती त्वत्पदी ॥३॥

सकल कल्याणाचे कल्याण । हेचि तुझे नामस्मरण । करिता खंडेल जन्ममरण । म्हणोनि शरण तुजलागी ॥४॥

पंचमाध्यायाचे अंती । काशिराजगृही भक्तपती । स्वरूपशयनी निद्रा करिती । पुन्हा उठविती प्रभातसमयी ॥५॥

करोनिया नित्यकर्म । बालभावे क्रीडाधर्म । खेळ खेळे न कळे वर्म । मायाभ्रम जननेत्री ॥६॥

कश्यपाचा परममित्र । धर्मदत्तनामे ऋषि पवित्र । स्वधर्मनिष्ठ पुण्यपात्र । त्याची कीर्ति ऐकिली ॥७॥

काशिराजगृही जगन्निवास । बालभावे करी विलास । ऐकोनि धावला पाहावयास । पाहता रायास आल्हाद पै ॥८॥

करोनिया पूजन । राजा उभा कर जोडुन । म्हणे स्वामी किमर्थागमन । होऊनि धन्य मज केले ॥९॥

येरू म्हणे गा भूपती । तुझे मंदिरी क्रीडतो विश्वपती । ही ऐकोनिया कीर्ती । पाहावया प्रचीती पातलो ॥१०॥

ऐकोनि बोले नरनाथ । क्रीडतो या बाळासहित । मग त्याते पाचारित । ये धावत महोत्कट ॥११॥

पाहोनि विनायकमूर्ती । हर्षे तन्मय जाहला चित्ती । मग धावोनिया तयाप्रती । धरोनि हाती बैसविले ॥१२॥

धर्मदत्त म्हणे तयालागुन । तू परमात्मा आनंदघन । माझे मित्राचा होऊनि नंदन । कुल धन्य केले तुवा ॥१३॥

तूते न्यावया निजमंदिरी । मी पातलो वीरजारी । येरू म्हणे वडिली भारी । किमर्थ श्रम केले हे ॥१४॥

मज येते पाचारण । तरी मी येतो धाऊन । रायास म्हणे ब्राह्मण । यास पाठवी माझे घरी ॥१५॥

भूप म्हणे धर्मदत्ता । यासि अरिष्टे येती तत्वता । कोण याते होय रक्षिता । विश्वकर्ता होय हा ॥१६॥

लीलावतारी बालभावे । नेसी परी यासि रक्षावे । येरू म्हणे स्वस्थ असावे । न भ्यावे तू अवनीपती ॥१७॥

हा आदिपुरुष विश्वनथ । स्वकृपेने रक्षी अनाथ । त्याचे रक्षण करणार नाथ । कोण आहे सांग पा ॥१८॥

मग घेऊनि विनायकाशी । रथारूढ निघे वेगेशी । मार्गी जाता राक्षसाशी । संधी फावली तेधवा ॥१९॥

काम आणि क्रोधनामे । दोघे राक्षस क्रूर कर्मे । मानवरूपे कलहकर्मे । अकस्मात पातले ॥२०॥

कलह करीत दोघे आले । विनायकावरी कोसळले । जैसे दीपकावरी झेपावले । पतंग निमाले क्षणमात्रे ॥२१॥

विनायके ते चरणी धरिले । गरगरा फिरवोनि आपटिले । गतप्राण होवोनिया पडले । कापू लागले विश्व तेव्हा ॥२२॥

ऐसा प्रभाव अवलोकुनी । लोकवार्ता विश्वासि मने । म्हणे हा प्रत्यक्ष कैवल्यदानी । प्रसिद्ध जनी विलसतो ॥२३॥

देऊनि त्यास आलिंगन । पुढे केले हर्षे गमन । स्वपुरी प्रवेशले दोघेजण । तो पुढे वारण देखिला ॥२४॥

महाबलाढ्य उन्मत्तवारण । चौताळला फिरे जाण । त्याचे पदी रगडोनि मरण । पावले तेथे अनेक प्राणी ॥२५॥

जेव्हा गज मारी थडका । प्रासाद मंदिरे पाडी नरनायका । तो पाहूनि विनायका । चौताळला तयावरी ॥२६॥

मेघा ऐसा शब्द करी । तेणे थरारे धरित्री । गज येता अंगावरी । मग काय करी महोत्कट ॥२७॥

अंकुश घाये हाणोनि सबळ । विदारण केले गंडस्थळ । शोणीत वाहे प्रबळ । तेणे विकळ गज जाहला ॥२८॥

पुन्हा लोटला तो करींद्र । त्यासि अंकुश हाणी मुनींद्र । कंठ फोडोनि केला सछिद्र । प्राण शरीरी विकळ जाहले ॥२९॥

तेव्हा गजाने महानाद केला । गतप्राण तेथे तो पडला । पडिली गृहे अश्वशाला । भूगोळ कापला तयेवेळी ॥३०॥

धुरळा जावोनि पडला प्रकाश । सुर वर्षती पुष्पे विशेष । लपोनि पाहती गजकलेवरास । मग होती निर्भय जन ॥३१॥

जन म्हणती हा दिसे बाळक । पराक्रम तेजे जैसा अर्क । हा साक्षात गणनायक । जगन्नायक अवतरला ॥३२॥

असुर खल दुष्टांचे निर्दळण । गोब्राह्मण साधूरक्षण । करावया धूम्रवर्ण । जगती मंडण जाहला ॥३३॥

धर्मदत्त होऊनि हर्षभरित । हाती धरूनि कश्यपसुत । प्रवेशला निजमंदिरात । मग पूजित राजोपचारे ॥३४॥

सिद्धिबुद्धी उपवरकन्या । चिच्छक्ती त्रिभुवनमान्या । लावण्यलहरी त्रिभुवनधन्या । त्या दीधल्या विनायकाशी ॥३५॥

रमा अवनीसहित हरी । की गंगापार्वतीसह मदनारी । तैसा विराजे विरजारी । दोही नारी समवेत ॥३६॥

धर्मदत्त म्हणे मी धन्य एक । मजवरी तुष्टला जगन्नायक । जो जगत्साक्षी जगपालक । तो हा बालक अदितीचा ॥३७॥

माझे वचनासि देऊनि मान । गृह केले येणे विमान । माझे उद्धरले पूर्वज जन । कश्यपनंदन प्रसादे ॥३८॥

धर्मदत्तमंदिरी अदितीसुत । सिद्धिबुद्धिसह क्रीडत । तव कपट वेष अद्भुत । अरिष्ट तेथे उद्भवले ॥३९॥

धूम्राक्ष राक्षसाची कांता । जृंभानामे असुरी तत्वता । ती होवूनि लावण्यवनिता । ये अवचिता चमकत ॥४०॥

सवे होत्या निशाचरी । त्याही जाहल्या दिव्यनारी । मध्ये जृंभा ती सुंदरी । विद्युत्परी चमकतसे ॥४१॥

सुहास्यवदना पंकजनेत्रा । शिरीषपुष्प कोमलगात्रा । शरच्चंद्रतुल्य वत्क्रा । मानवकलत्रा लाजवी ॥४२॥

रत्नाभरणे अलंकृत । गजगती चाले सख्यांसहित । तिणे पाहून अदितीसुत । करी दंडवत आवडीने ॥४३॥

जृंभा म्हणे निजसख्यांशी । धन्य प्रसवली माय याशी । स्वरूपे उणा मन्मथ याशी । काय स्वरूपासि वर्णावे ॥४४॥

याची पाहता रूपप्रभा । कोटि मदनाचा गाभा । याचे मुखी चंद्रप्रभा । हीन जाहल्या वाटती ॥४५॥

अवनीवरी हे निधान । स्वये पाहता माझे नयन । तृप्त जाहले धन्य दिन । अवलोकिता वदन जाहला ॥४६॥

यास अरिष्टे येती गहन । परि निवारण करी भगवान । कोण करवील मातेवाचुन । अभ्यंगोद्वर्तन ययाशी ॥४७॥

जृंभा म्हणे गा राजसा । घालीन अभ्यंग मी डोळसा । कोमलकरे चारुविलासा । तुज न्हाणीन कौतुके ॥४८॥

रत्नजडित मांडोनि चौरंग । वरी बैसविला सिद्धिबुद्धीरंग । जो जगदानंद कोमलांग । करी अभ्यंग जाणोनिया ॥४९॥

सुगंध तैल उद्धर्तन । जृंभा हर्षे करी मर्दन । कपटे विषे प्याले भरून । करी घर्षण संधिसंधी ॥५०॥

कालकूट मर्दन करिता । दाह जाहला तत्वता । हे जाणोनिया अवचिता । काय करिता जाहला ॥५१॥

मस्तकी मारिता मुष्टिघात । जैसा वज्रे चूर्ण होय पर्वत । तैसी पृथ्वीवरी अकस्मात । गतप्राण पडियेली ॥५२॥

दोन योजने भयंकर । तिचे पडले विस्तीर्ण शरीर । पाहोनि आश्चर्य करिती नर । पुष्पे सुरवर वोपिती ॥५३॥

येवोनिया धर्मदत्त । विनायकासि आलिंगत । म्हणे तुझी लीला अद्भुत । कोण समर्थ जाणावया ॥५४॥

मग करविले भोजन । पुष्पशयनी करविले शयन । तव काशिराजा रथ घेऊन । न्यावयासि पातला ॥५५॥

घेऊनिया विनायकाशी । काशिराजा पातला नगराशी । मग सभेत बैसोनि एके दिवसी । प्रधानासि निरोपित ॥५६॥

विवाहसिद्धी करणे । मज आहे कश्यपासि आणणे । यासि रक्षा सावकाशपणे । अरिष्टगण यासि येती ॥५७॥

जो येईन मी माघारा । तो रक्षा या सुकुमारा । येणे राक्षसांचा केला चुरा । महाअसुरा निर्दाळिले ॥५८॥

धूम्राक्ष मनु जघन । सहस्त्रार्थ राक्षसांचे निधन । करिता जाहला कश्यपनंदन । मनमोहन विश्वात्मा ॥५९॥

अमात्य म्हणे नरकेसरी । बालक येथे आहे जोवरी । तो शोभन कार्यसिद्धी बरी । नव्हे खरी निश्चये ॥६०॥

मासपक्ष गेलियावर । कार्य करावे सत्वर । ऐसा ऐकता विचार । दे रुकार अवनीपती ॥६१॥

बाळकांचे समूहमेळी । खेळे खेळे मुक्तमाळी । तयास पाचारोनि तयेवेळी । दे भोजन यथारुची ॥६२॥

निशाकाळी घालोनि मंचक । सुमन शेजेवरी भक्तपालक । शयन करोनि जगद्‌व्यापक । दावी कतुक निजभक्ता ॥६३॥

काशिराजा समवेत । सर्व जन जाहले निद्रिस्थ । तव अरिष्ट उठले अद्भुत । दानवत्रय पातले ॥६४॥

व्याघ्रमुख ज्वाळामुख । तिसरा दारुण असुर देख । दानववधाचे स्मरोनि दुःख । जाहले सन्मुख स्वमरणाशी ॥६५॥

येवोनिया नगरासन्निध । ज्वालामुख जाहला अग्नीप्रबुद्ध । जाहला दारुण वायूसिद्ध । वन्ही अगाध धडकला ॥६६॥

व्याघ्रमुख दुराचारी । एक ओष्ठ ठेऊनि उर्वीवरी । दुजा आकाशी पसरी । विवरापरी जाभाडा ॥६७॥

नगरासि धडकला वैश्वानर । निद्राभरे व्याप्त नर । घाबरे उठोन हाहाःकार । करित सत्वर पळती पै ॥६८॥

क्रीडासक्त मंदोद्धत युवती । नग्नप्रियांसी निर्भय रमती । तव वन्हिज्वाळा धडकती । मग पळती नग्न तैशा ॥६९॥

कोण्ही वेढूनि पतीचे वसना । तैसीच पळे एक ललना । बाळके घेवोनिया अंगना । करीत रुदना पळताती ॥७०॥

प्रळयाग्नी धडकला दुर्धर । जाळीत चालला नगर । वायू सुटला घोरांदर । प्रळय थोर वर्तला ॥७१॥

आराम वनोपवने घरे । हर्म्यप्रासाद जळाली मंदिरे । गोगजाश्व एकसरे । पळती त्वरे आक्रंदत ॥७२॥

ऐसा जाहला आकांत । कोल्हाळ शब्द जाहला बहुत । काशिराजा आक्रंदत । म्हणे मूर्खत्व म्या केले ॥७३॥

कश्यपे मज पूर्वी कथिले । परि मी त्याचे न ऐकिले । विनायकासि येथे आणिले । तेणे घडले अपाय बहू ॥७४॥

जी जी अरिष्टे उद्भवली । ती ती येणे निर्दाळिली । आता काळकलना मांडली । प्रीती टाकिली आमुची येणे ॥७५॥

येव्हडा नगरी प्रळय वर्तला । परी का हा उगीच बैसला । आता आमचा अंत पुरला । मृत्यु आला सकळाशि ॥७६॥

अग्नि धडकला राजमंदिरी । लज्जा टाकोनि ते अवसरी । पळो लागल्या राज सुंदरी। नगराबाहेरी उघड्याची ॥७७॥

राजा आणि प्रजालोक । पळाले तेव्हा एकाएक । त्यात पळाला विनायक । भक्तरक्षक कृपाळू ॥७८॥

व्याघ्रे विशाळमुख पसरिले । जनालागी विवर भासले । त्यामाजी अवघे शिरले । प्रजापशू समवेत ॥७९॥

राजा धुंडी महोत्कटाशी । महोत्कट धुंडी रायाशी । तो भास्कर आला उदयाशी । जो नयनासि प्रकाशकू ॥८०॥

विवर नव्हे हे व्याघ्रवदन । पाहोनि करिती लोक रुदन । व्याघ्रे जाभाडा मिटोन । भक्षू पाहे सकलांसी ॥८१॥

एकचि जाहला गदारोळ । तो ऐकोनिया दीनदयाळ । उंच वाढला अदितीचा बाळ । जाहला काय व्याघ्रमुखी ॥८२॥

टाकिला उभाच असुर चिरोनी । एक शकल उसळले गगनी । ते वायुमंडळी भ्रमोनी । दूरदेशी पडियेले ॥८३॥

मुख पसरोनि करुणाघन । प्रळयाग्नी टाकी गिळोन । आपले योगमाये करून । मृत जन जीवविले ॥८४॥

जैसे होते पूर्वी नगर । तैसेच संचले पुन्हा सुंदर । पाहता राजा आनंदला थोर । सुखासि पार नाही त्याच्या ॥८५॥

धरोनिया विनायकाचे चरण । वारंवार घाली लोटांगण । म्हणे तूचि या जगाचा प्राण । परिपूर्ण सर्वेशा ॥८६॥

तू अज्ञानतमाचा चंडकिरण । प्रपंचवारण पंचानन । भवत्रस्तपतितपावन । आनंदघन परमात्मा ॥८७॥

तू चराचरी अवघा व्याप्त । असोनिया नव्हेसि लिप्त । निजभक्तांचा परम आप्त । नाहीस सुप्त कदा काळी ॥८८॥

तू धरोनिया अवतार । करिसी दुष्टांचा संहार । निजभक्तांचे मनी सादर । निरंतर तूचि अससी ॥८९॥

तूचि विश्वासे विश्वकर्ता । तूचि आहेस विश्वहर्ता । तूचि पुढे संहारिता । तूचि अनंता कर्मसाक्षी ॥९०॥

सूक्ष्माहूनि सूक्ष्मसाचार । बृहदाहूनि तू बृहत्तर । विश्वसाक्षी लंबोदर । जाहलासि कुमर अदितीचा ॥९१॥

काय आमचे सुकृतोत्तम । तेणे तुजशी समागम । आम्हालागी अतिसत्तम । अत्युत्तम जाहलाशी ॥९२॥

सकळी करोनि जयजयकार । घालोनिया नमस्कार । आपआपले वहनावर । बैसोन नर निघाले ॥९३॥

करोनिया वाद्यगजर । अग्रयानी कश्यपकुमर । बैसवोनिया नरवीर । निजनगर प्रवेशला ॥९४॥

प्रजा होवोनिया निर्भय । नगरी राहिले आनंदमय । जरी तुष्टेल महाकाय । साकडे काय उरेल पै ॥९५॥

ज्याचे मुखी नाम घेता । मग उरेना संसारव्यथा । त्यासि जरी शरण रिघता । मग दुश्चित्तता कायसी ॥९६॥

जयजयाजी पुराणपुरुषा । अप्रमेया बालवेषा । सकलहर्षाचिया वर्षा । मज संतोषा पाववी ॥९७॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथा । श्रीगणेशपुराण संमत । क्रीडाखंड रसभरित । षष्ठोध्याय गोड हा ॥९८॥

श्रीगणेशार्पणमस्तु ॥ अध्याय ॥६॥ ओव्या ॥९८॥

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४