Get it on Google Play
Download on the App Store

क्रीडाखंड अध्याय ९

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।

श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

ॐ नमोजी शतपत्रनेत्रा । सिद्धिबुद्धिपते कोमलगात्रा । संसारातप्तमानवछत्रा । परमपवित्रा गणपते ॥१॥

तुझे करिताचि रे स्मरण । होय त्याचे संकटहरण । ऐसे ऐकिले वेदवचन । म्हणोन तल्लीन तवपदी ॥२॥

हेचि महतांचे वचन । लवकर दावी सत्य करून । तेणे करूनि माझे मन । धरील अनुसंधान स्वरूपी ॥३॥

हे बोलणे तुझी सत्ता । पुढे तूचि सत्य कर्ता । आता बोलवी आपली कथा । मागणे समर्था हेचि माझे ॥४॥

व्यासास म्हणे कमलासन । ऐक शमीचे महिमान । शमी अर्पण व्यास जाण । उद्धरोनि गेला पै ॥५॥

पुढे प्रियव्रताची कथा । सांगतो मुने तूते आता । जीचे श्रवणमात्रे धन्यता । प्राप्त जगता होतसे ॥६॥

प्रियव्रत राजा सुमती । ब्रह्मांड भरी त्याची ख्याती । दोन तयासि होत्या युवती । नामे कीर्ति प्रभा त्यांची ॥७॥

धाकटी प्रभानामे कांता । रायाच्या चित्ती प्रीतिपात्र वनिता । नावडत्या कीर्तीशी अप्रियता । सदा दावी मनोभावे ॥८॥

रूपगुणसत्वसंपन्न । गुणज्ञ चातुर्यखाणी निधान । ऐसी किर्ती अंगनारत्न । त्यागोन रमला प्रभेशी ॥९॥

अशनीशयनी जनीविजनी । सदा संनिध प्रभा मानिनी । रायासि वियोग निशिदिनी । कदा मनी न साहवे ॥१०॥

कीर्ती वयसा तारुण्ययोगे । तळमळे चित्ती राजवियोगे । शरीर जळे अनंगयोगे । सदा विरागे साजिरी ॥११॥

स्त्रियांचे चित्ती सवतिमत्सर । आधीच वसे निरंतर । त्यात रायासि अप्रियकर । दुःख थोर कीर्तीशी ॥१२॥

केश मुक्त न घाली वेणी । भूपा विरहित राहे तरुणी । रुचि न लागे अशनीपानी । कदा शयनी निद्रा न ये ॥१३॥

राजवियोगे कीर्ती सती । उभी सुकली जैसी मालती । मान सोडोनि पतिव्रता ती । रायाप्रती भेटो आली ॥१४॥

प्रिय प्रभा समवेत तल्पकी । राजा आनंदे रमला की । तेथे कीर्ती जावोनि नेटकी । बैसली तेव्हा पलंगावरी ॥१५॥

रायाचा चरण कोमल करी । धरोनिया जेव्हा चुरी । सपत्‍नी प्रभा खोचली अंतरी । लत्ता उरी हाणे तिच्या ॥१६॥

प्रभेच्या पादघाते किर्ती उलथली । तैसीच तल्पकाखाली पडली । तेणे ह्रदयी दुखावली । रडत आली निजगृही ॥१७॥

तीस तेव्हा कैसे वाटले । की मी भवजळ डोही बुडाले । किंवा अंगावरी कोसळले । कडकडोनि पर्वत कडे ॥१८॥

स्फुंदस्फुंदोनि रडे कीर्ती । तीस दाहीदिशा शून्य वाटते । पाचारोनिया सख्यायुवती । म्हणे मजप्रति विष द्या गे ॥१९॥

जिवलगा वाचोनिया । तारुण्य जाते माझे वाया । व्यर्थ काय ही वाचोनि काया । जाईन विलया हेचि समयी ॥२०॥

काय पाप जन्मांतरी केले । त्याचे फळ हे पुढे वोढवले । किंवा साधुसंत अवमानिले । नाही पूजिले हरीते ॥२१॥

म्हणोनि पावले संसारी कष्ट । तेणे सपत्नी जाहली वरिष्ठ । माझे पापी गे अदृष्ट । आहे नष्ट जन्मवरी ॥२२॥

ऐसी विलपे करोनि आकांत । तव ऋषि देवल पातला त्वरित । त्याते पाहोनि कीर्ती धावत । पदी घालीत दंडवते ॥२३॥

ऋषि म्हणे काय झाले । तिणे सकल दुःख निवेदिले । परदुःखे दुखावले । ह्रदय भले साधूचे ॥२४॥

मग म्हणे गे गजगामिनी । विश्वास ठेवी माझे वचनी । तुवा अर्चावा कैवल्यदानी । भक्ताभिमानी जगदात्मा ॥२५॥

जो सिद्धिबुद्धीचा प्राणनाथ । संकटहरणी तो समर्थ । सदा रक्षोनिया अनाथ । करी सनाथ दयाळू ॥२६॥

मग तीते ऋषिदेवले । व्रतविधान अवघे कथिले । तुज पुत्र होईल वो बाले । वंशी मोक्षध्वजपणे ॥२७॥

तो पावेल गे कीर्ती मरण । त्यासि जिववील गजकर्ण । प्रसन्न असता धूम्रवर्ण । विघ्नगण नाश पावे ॥२८॥

मग ती रमणी व्रत करी । दुर्वा वाहे नेमे सुंदरी । ग्रीष्मऋतूते अवसरी । दूर्वा न मिळती तयेते ॥२९॥

दूर्वाभावी शमीपर्णे । न कळोनि वाहता गजकर्णे । संतोषोनिया तिशी देणे । स्वप्नी दीधले वरदान ॥३०॥

तुते होईल वश पती । आता कष्ट नको गे युवती । ऐसे स्वप्न पाहोनिया सती । जागृतस्थिती पावली ॥३१॥

आनंदे वोसंडोनि पोटी । सख्यास सांगे स्वप्न गोरटी । त्या म्हणती तुज जगजेठी । पावला संकटी चपलपणे ॥३२॥

मग पाचारोनि पुरोहित । सांग संपादिले तिणे व्रत । दाने भोजने गौरवित । असंख्यात विप्र तेव्हा ॥३३॥

तेणे तोषला विनायक । प्रभेसि लंपट नरनायक । तव तिची कर्मगती एकाएक । दुःख देख उद्भवले ॥३४॥

कर्मयोग आणि ईश्वरसत्ता । तेणे नासली प्रभाकांता । रक्तपिती जाहली अवचिता । राजा पाहता खिन्न जाहला ॥३५॥

तेणे उपाय बहुत केले । परी तिचे कर्म नाही खंडले । म्हणोनि रायाचे मन विटले । दैव उदेले किर्तीचे ॥३६॥

राजा आला तिचे घरी । तव गणेशभजनी रत सुंदरी । तीते राये धरोनि करी । नेत तल्पकावरी रमावया ॥३७॥

बहुत दिवसांचा वियोग । अधीरपणे सुरतरंग । प्राप्त होता तिशी अनंग । सुख सांग अर्पीतसे ॥३८॥

राया वाचोनिया मदन । करित होता देह दहन । तोच तीते सुखद जाण । जाहला गजानन प्रसादे ॥३९॥

प्रसन्न अंकुशपाणी । मग कायसी दुःखाची शिराणी । अहोरात्र ती कीर्ती रमणी । रमो लागली रायासी ॥४०॥

हरपली दुःखाची वार्ता । कीर्ती गर्भिणी जाहली अवचिता । तो नवमास पूर्ण भरता । जाहली प्रसूत तेधवा ॥४१॥

पुत्र प्रसवली ते अंगना । प्रमोद न साहे राजमना । राजा करोनि मंगलस्नाना । दाने नाना देतसे ॥४२॥

जात कर्मादि संस्कार । करोनि फोडिले भांडार । सुखी केले याचक नर । कीर्तीसि थोर आल्हाद पै ॥४३॥

चार वर्षांचा जाहला कुमर । प्रभेसि न साहे सवतीमत्सर । तिणे तयासि विष दुर्धर । होवोनि क्रूर प्राशविले ॥४४॥

तेणे येवोनिया लहरी । निचेष्टित पडला उर्वीवरी । पाहता किर्ती रुदन करी । वक्ष चुरी मुष्ठिघाते ॥४५॥

कीर्तीने मांडला महदाकांत । राजा पातला तेथे धावत । प्रभेची निर्भत्सना करित । म्हणे घात केला तुवा ॥४६॥

येऊनिया वैद्यराय । करू लागले विषोपाय । परी न होय विषनिर्भय । बालकापाय टळेना ॥४७॥

कीर्ती घेऊनि बालकाशी । वेगे पातली वनाशी । गृत्समद तेथे तेजोराशी । येवोनि तिशी अवलोकित ॥४८॥

पाहता किर्ती पायी लागली । तेणे करुणा ऋषीसि आली । अभय देऊनिया स्वस्थ केली । तिची खंडली कर्मदशा ॥४९॥

ऋषि बोले सुहास्यवदन । न कळोनि शमीपत्रे पूजन । केलेस तेणे गजानन । आहे प्रसन्न तुजलागी ॥५०॥

शमीपत्र पूजनाचे सुकृत । देता उठेल तुझा सुत । ऐकोन ती अर्पण करीत । पुण्य अद्भुत त्याचे मुखी ॥५१॥

हडबडोनि उठे निजेला । तैसा सुत उठोनि बैसला । तीते परमानंद जाहला । तो वर्णिता न वर्णवे ॥५२॥

मग धरोनिया ऋषीचे चरण । कीर्ती पुसे तयालागुन । मज सांगावे कृपा करून । महिमान शमीचे ॥५३॥

मुनि म्हणे ऐक कांते । शमी प्रिय का गणरायाते । ते आख्यान सांगतो तूते । जे पापाते नाश करी ॥५४॥

धौम्यपुत्र सुलक्षण । शौनकाचा शिष्य जाण । वेदशास्त्रार्थ विद्यानिपुण । पुण्यपरायण मांदार तो ॥५५॥

और्वनामे ऋषि पवित्र । सुमेधानामे त्याचे कलत्र । कन्या प्रसवली कोमलगात्र । प्रीतिपात्र उभयतांसी ॥५६॥

लावण्यराशी सुमध्यमा । उपमेस साजे उमारमा । शमीनामे अतिउत्तमा । गुणाची सीमा न वर्णवे ॥५७॥

ती दीधली धौम्यसुता । सप्तवर्षी जाण तत्वता । टाकोनिया कौमारावस्था । वाहे तारुण्यता स्वभावे ॥५८॥

ऋतू प्राप्त होता तिशी । घरी पाचारोनिया जामाताशी । मानोपचारे गौरवोनि त्याशी । हाती शमीसी अर्पिले ॥५९॥

मांदारासि विनवी सुमेधा सती । माझी कन्या आहे गुणवती । आजवर वाढऊनिया तुझे हाती । परम प्रीती देतसो ॥६०॥

आता पाळावी स्नेहभावे । हेचि इच्छिले माझे जीवे । तुवा आता पूर्ण करावे । मनी द्यावे अखंड सुख ॥६१॥

मांदार घेऊनिया शमीशी । वेगे पातला स्वसदनाशी । दोघे रमती अहर्निशी । अत्यंत मानसी संतोष त्याचे ॥६२॥

भृशुंडी स्वभावे त्याचे आश्रमी । येता हासती मंदारशमी । हे पाहता क्रोध उर्मी । ऋषिलागी न साहे ॥६३॥

भृशुंडी बोले शापवचन । तुम्ही उभयता वृक्ष होऊन । तेथेचि राहा अनुदिन । पक्षिहीन सर्वदा ॥६४॥

शापोनि गेला ऋषिराज । तत्क्षणी ते वृक्ष जाहले सहज । काही दिवस गेल्यावर सतेज । शौनकऋषि पातला ॥६५॥

सुमेधा म्हणे और्वाशी । जामात घेऊनि गेला कन्येशी । तेव्हा पासोनिया मजशी । समाचार कळेना ॥६६॥

ऐकता प्रियेची सखेद वाणी । और्वऋषी निघाला तत्क्षणी । मांदाराश्रमी येऊनि जनश्रेणी । लक्षोनिया पूसत ॥६७॥

शौनक म्हणे और्वाशी । आश्रमी न देखो मांदाराशी । और्व म्हणे जामाताशी । मी शोधावया पातलो ॥६८॥

कन्येलागी घेऊनि आला । तेव्हापासोनि नाही कळला । कुशलार्थ हो आम्हाला । उभयतांचा आजवरी ॥६९॥

विशाळ हे तरू आंगणी । पाहिले न पाहिले कदा नयनी । त्याही पुसता कथिले जनानी । शापोक्तीचे कारण ॥७०॥

ऐकता गुरुश्वशुर करिती शोक । म्हणती ऐसे उद्धरतील तोक । त्यात विचार करी शौनक । विनायक उद्धरील यया ॥७१॥

विनायक आणि उपासक । हे दोघे अभेद एक । म्हणोनि यांचे विनायक । शापमोचन करील पै ॥७२॥

मग त्याणी तप केले । शरीर आपले तपे शोषिले । ऐसे अवलोकिता वळले । चित्त तेव्हा प्रेमळाचे ॥७३॥

त्याचे तपाचे फळ उदेले । तेणे निर्गुण साकारले । त्यापुढे येऊनि उभे राहिले । मन निवाले अवलोकिता ॥७४॥

प्रसन्नमूर्ती गजानन । सिंदूर चर्चित कमनीय वदन । सहस्त्रसूर्यापरी भासमान । घवघवीत प्रगटला ॥७५॥

पाहता त्याची प्रसन्नमूर्ती । और्वशौनक नेत्रांप्रती । उदक आले अश्रू गळती । प्रेमभावे करोनिया ॥७६॥

गणनायक दोही हाते । चरणावरोनि उठवी त्याते । मग म्हणे मागा वराते । देईन त्याते अविलंबे ॥७७॥

ऋषि म्हणती गा विनायका । आता मुक्त करी बालका । तुजवाचोनि भक्तपालका । कोण निका भक्तरक्षणी ॥७८॥

त्यापासूनि अपराध जे घडले । ते तुवा पाहिजे क्षमा केले । तुझे लंबोदर आहे भले । करुणासागर जगदात्मया ॥७९॥

तूचि आहेस जगी कर्ता । तूचि आम्हाते पाळिता । अपराधी शिक्षाकर्ता । शरणरक्षिता तूचि पै ॥८०॥

तूच सकळ ब्रह्मांडाचा स्वामी । तुझी कृपा नसता संसारी श्रमी । पावोनिया अपूर्णकामी । हे तो जाणशी गणराया ॥८१॥

ऐकोन निजभक्तांचे वचन । सुहास्यवदने गजानन । अभयवचने गौरवोन । शापमोचन करी त्याचे ॥८२॥

दो तरूपासोनिया जाहले । युग्म येऊनि गणेशपदी लागले । भक्ती पाहून संतोषले । चित्त भले गणपतीचे ॥८३॥

जगदानंद गणपती । वरद बोले मधुरोक्ती । शमीमांदार पुष्प मजवाहती । ते पावती मत्पद ॥८४॥

शमीचे करिती स्मरण । किंवा घेती इचे दर्शन । त्याचे चुके भवबंधन । मत्पद पावन होतील ते ॥८५॥

जे नेमे शमीपत्रे पूजिती । त्यांचे दर्शने जन उद्धरती । संकटगणापासोनि तरती । सदा पावती विजयाते ॥८६॥

ऐसा देवोनिया वर । गुप्त जाहला लंबोदर । न कळे त्याची लीळा समग्र । वेदा पार न कळे याच्या ॥८७॥

गृत्समद म्हणे राजकांते । शमीमाहात्म्य कथिले तूते । जो भजेल गणरायाते । त्यास आयते सुख लाभे ॥८८॥

कमलासने यज्ञ केला । आरंभी गणपती नाही पूजिला । तेणे तो महद्विघ्न पावला । यज्ञ राहिला तैसाची ॥८९॥

सावित्रीचे शापोक्तिमिषे । नद्यारूप वाहती देव असे । नारायणकृष्णारूप विलसे । वेण्याभासे महेश्वर ॥९०॥

देव सावित्रीचे शापाने । नद्या होता तत्स्त्रियांची मने । आकुलित होवोनिया दुःखाने । दीनवदने रडती त्या ॥९१॥

उमारमा इंद्रायणी । आणखी इतर देवरमणी । लक्षोनिया पद्मयोनी । आकांत करूनि बोलती ॥९२॥

आहा कमलासना काय केले । तुवा गणपतीसि नाही पूजिले । तेणे यज्ञी विघ्न केले । दुःख जाहले आम्हांसी ॥९३॥

पतिवाचोनि स्त्रियाजन । आम्ही जाहलो पहा दीन । ब्रह्मा म्हणे गजानन । आता तुम्ही प्रसन्न करा ॥९४॥

मग तयाचे कर्णी मंत्रविधी । उपदेशिता जाहला विधी । तप करिता त्यांची आधी । गणाधीशे निरसली ॥९५॥

प्रसन्न होता गजानन । देव पातले पूर्वस्थान । अंशरूप नद्या होऊन । अद्यापवरी वाहती ते ॥९६॥

अनेक अवतार धरोनि लंबोदर । करी असुरांचा संहार । पदी स्थापी वारंवार । देवगणाते दयाळू ॥९७॥

होवोनिया धुंडीविनायक । पदी स्थापिले वृंदारक । त्याचे अवतार अनेक । वर्णिता न वर्णवती सहस्त्रमुखा ॥९८॥

श्रोते परिसा सावधान । पुढे धुंडीविनायकाख्यान । जेणे तुटे भवबंधन । विघ्नशमन सहजची ॥९९॥

जयस्वामी लंबोदरा । पार्वतीनंदन विश्वंभरा । माझे ह्रदयी तूचि खरा । बैसोनि बोलविसी निज लीळा ॥१००॥

इति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । नवमोध्याय गोड हा ॥१॥ अध्याय ॥९॥ ओव्या ॥१०१॥

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४