Get it on Google Play
Download on the App Store

क्रीडाखंड अध्याय ७

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

नमो स्मरारिपुत्रा अप्रमेया । ब्रह्मांडनायका महाकाया । निर्गुणा रे अप्रमेया माया । दाखवी पाया आपुलिया ॥१॥

मी केवळ मतिमंद । होऊ पाहे त्वदांघ्‍र्‍यब्जमुलिंद । हा माझा मनोदय छंद । तू ब्रह्मानंद पूर्ण करी ॥२॥

षष्टमाध्यायचे अंती । महाप्रळयाग्निपासूनि काशीपती । रक्षोनिया गणपती । पुन्हा नगरी प्रवेशला ॥३॥

काशिराजा पुण्यश्लोक । जेणे वश केला विनायक । जो पूर्णब्रह्म जगदव्यापक । भक्तपाशच्छेदक जो ॥४॥

उठोनिया प्रभाती । नित्यकर्मे करोनि निगुती । येवोनिया विनायकभवना प्रती । नमोन भक्तपतीस बोलतसे ॥५॥

भूप म्हणे गा विनायका । भोजनार्थ चलावे विश्वपाळका । तव तेणे उद्गार देवोनि निका । म्हणे नका आग्रह करु ॥६॥

राजा पाहे चमत्कार । भोजन केलेला दिसे कुमर । अंगी उटी शोभे सुंदर । रत्नालंकारे साजिरा ॥७॥

भोजन तृप्त दिसे अत्यंत । उद्गार देतसे बहुत । पाहोनि राजा विनवित । म्हणे कौतुक वाटते ॥८॥

कोणी आला भक्तजन । तेणे करोनिया अर्चन । षड्रस करविले भोजन । तुजलागुन सांग पा ॥९॥

विनायक म्हणे राया लागोन । दंडकारण्यदेशी नामल म्हणून । आहे विख्यात पट्टण । तेथे भक्तजन नांदतो ॥१०॥

भृशुंडीनामे भक्तोत्तम । जो भक्तशिरोरत्न सत्तम । तपोतेजे पूर्णकाम । त्याचा महिमा अगम्य पै ॥११॥

हरिहर देवसकल । ज्याचे वंदिती पादकमल । शांतदांत भक्त प्रेमळ । ऐके नवल तयाचे ॥१२॥

त्याचे तप अत्यंत दुर्धर । भूमध्ये फुटला गजकर । तो पावला माझे सादृश्य थोर । काय वर्णावा महिमा त्याचा ॥१३॥

तेणे रात्री करोनि अर्चन । नैवेद्य अर्पिला मजलागुन । तेणे पावलो समाधान । नको भोजन मजलागी ॥१४॥

तुवा जावोनि तयास्थानी । विनये तयासि प्रार्थुनी । विवाहार्थ यावे घेउनी । तेणे करोनि साफल्य तुझे ॥१५॥

ऐकोन संतोषला भूपती । धनुष्यबाण घेऊनि हाती । बैसोनिया तुरंगावरती । चपलगती निघाला ॥१६॥

वनपर्वतनद्या गहन । कष्ट अवघडमार्ग टाकुन । राजा पातला भुशुंडीचे स्थान । रम्य सदन देखिले तेणे ॥१७॥

नंदनवनाहून अधिक रम्य । निर्वैर क्रीडती पशुसाम्य । जे का दुष्कृती अगम्य । पाहूनि मन संतोषले ॥१८॥

वेदशास्त्रार्थ मंत्रघोष । ऋषि तप करिती विशेष । जेथे वसे पुण्यपुरुष । भृशुंडी तपोधन साजिरा ॥१९॥

करोनिया दंडवत । राजा उभा जोडोनि हात । ऋषि आनंदे आशीर्वाद देत । मग पूसत तयाते ॥२०॥

राजा म्हणे ऋष्युत्तमा । विनायके पाचारिले तुम्हा । चतुर्थी पूजन परमात्मा । तृप्त जाहला तुम्हावरी ॥२१॥

तेणे सांगितले माते । की पाचारावे तुम्हाते । तो माझे वचनाते । मान देऊन येईल ॥२२॥

तोच तुमचा आराध्यदेव । ज्याचे अगम्य आहे वैभव । अदिती उदरी अवतारभाव । जाहला मानव अवलीळा॥२३॥

अवतारकाळी चतुर्भुज । अदितीने पाहिला गणराज । तिणे प्रार्थिता सहज । प्राकृतापरी जाहला ॥२४॥

बाळपणी थोर पराक्रम । करोनि मर्दिले राक्षस अधम । हे नव्हे मानवी कर्म । सर्वोत्तम अवतरला ॥२५॥

ज्याची वेदांसि न कळे लीळा । तो माझे घरी येवोनि राहिला । तेणे असुरांचा संहार केला । आहेत तयाला सप्तवर्षे ॥२६॥

अनेक अवतारांची स्थिती । त्याचे भक्त एक जाणती । तुम्ही अहा ज्ञानमूर्ती । संपूर्णस्थिती ठावी तुम्हा ॥२७॥

ऋषि म्हणे काशीपती । जे वेदा अगम्य गणपती । तो तुझे मंदिरी अहोराती । येऊनि कैसा राहिला ॥२८॥

ज्याते हरिहर ब्रह्मादिक । ह्रदयी ध्याती अलोलिक । तो तुझे गृही विश्वविनायक । होऊनि बालक क्रीडे कैसा ॥२९॥

ज्याचे स्वरूपाचा थांग । वर्णिता थकले उपनिषद्भाग । तो सिद्धिबुद्धीचा रंग । तुझे गृही कैसा राहिला ॥३०॥

ज्याचे करिता नामस्मरण । भवभय नासे दारुण । तो तुझे मंदिरी धूम्रवर्ण । बाळकामाजी खेळे कैसा ॥३१॥

जो ब्रह्मांडाहुन दशांगुळे । वरी तिष्ठे अवलीळे । तो तुझे मंदिरी खेळे । हेच आश्चर्य मज वाटे ॥३२॥

माझी ध्यानमूर्ती गजानन । तू सांगशी तो मानवजन । मी न ये दर्शनालागुन । सांगे जाउनी तयाशी ॥३३॥

ठेऊनि वरदहस्त मस्तकी । म्हणे आता नेत्र झाकी । नयन झाकिता एकाएकी । राजा नगरी प्रवेशला ॥३४॥

विनायकासि करोनि नमन । राजा सांगे वर्तमान । ऐकोन करी हास्यवदन । कश्यपनंदन तेधवा ॥३५॥

विनायक म्हणे रायाशी । आता जाऊनि सांगे त्याशी । येऊनि भेटे गजाननाशी । तो तुजशी पाचारितो ॥३६॥

पुन्हा येऊनि भृशुंडीआश्रमी । राजा ऋषीचे चरण नमी । ऋषि म्हणे उगाच श्रमी । कारे राया होतोसी ॥३७॥

राजा म्हणे ऋषिलागुन । तुज पाचारितो गजानन । ऋषी ऐसे ऐकोन वचन । आनंदोन उठे वेगे ॥३८॥

रायासि देउनि आलिंगन । म्हणे दावी गजानन । तुझी पीयूषप्राय वाटती वचन । होय समाधान जिवाचे ॥३९॥

भृशुंडीने रायास धरूनि करी । जेव्हा गमनाते आरंभ करी । तेव्हा थरारोनि मही करी । प्रार्थना तेथे ऋषीची ॥४०॥

मूर्तिमंत्र अवनी जोडोनि कर । ऋषीते म्हणे माझे रक्षण कर । तीचे मस्तकी ठेऊनि अभयकर । पुढे सत्वर चालिला ॥४१॥

तिसरे पाउली राजनगर । प्रवेशता जाहला ऋषीश्वर । रायाते बैसवोनि आसनावर । राजोपचार समर्पी तया ॥४२॥

भृशुंडी बोले हास्यवदन । मज दावी आता गजानन । विनायकासि राजा पाचारुन । भृशुंडीलागुन भेटवीतसे ॥४३॥

भृशुंडी म्हणे गा भूपती । ही नव्हे माझी आराध्यमूर्ती । याचे अंगी माखली माती । मुलांसंगती खेळतो ॥४४॥

यासि मी कैसे करू नमन । महोत्कट बोले सुहास्य वदन । तुज कैसे पाहिजे दर्शन । मजलागोन ते सांग ॥४५॥

ऋषि म्हणे गजवदन । तोचि माझा देव जाण । ऐकोन ऐसे न लगता क्षण । होय गजानन तेधवा ॥४६॥

दशबाहू आयुधे हाती । दोहो भागी दोन्ही युवती । सिद्धिबुद्धी चामरे ढळिती । माथा विराजती दुर्वांकुर ॥४७॥

नागबंधने कटिवेष्टित । दिव्य झळके एकदंत । पाहता अष्ठभावे सद्गदित । करी दंडवत ऋषि तेव्हा ॥४८॥

नयनी गळे प्रेमजळ । तेणे क्षाळिले पादकमळ । ऋषि जोडोनि करतळ । तेव्हा प्रेमळ स्तवन करी ॥४९॥

ऐकोनि त्याचे अद्‌भुत स्तवन । संतोषोनि बोले गजानन । तू भक्तशिरोमणी मुख्यरत्‍न । मजलागोन आवडता ॥५०॥

उतावीळ तुझे दर्शनासाठी । म्हणोनि घेतली तुझी भेटी । लीलावतार धरोनि सृष्टी । धन्य करणे मजलागी ॥५१॥

कश्यपगृही अवतारपूर्ण । करणे आहे भूभार हरण । ऐसे बोलोनि न लगता क्षण । पूर्ववत जाहला तो ॥५२॥

भृशुंडी म्हणे गा काशीपती । तुझे भाग्य वानू किती । जो परमात्मा गणपती । तुझे संगती क्रीडतसे ॥५३॥

आम्ही वंदावे तुझे चरण । तूते वंदिना जगी कोण । तुझा संसार धन्य जाण । भवभयमरण जिंकिले तुवा ॥५४॥

ऐसी बोधोनिया वचने । ऋषि गेला प्रसन्नमने । महोत्कटासि राजयाने । तेव्हा अर्चिले यथाविधी ॥५५॥

दुसरे दिनी प्रातःकाळी । घेऊनि समवयस्क बालकमंडळी । विनायक क्रीडतसे तयेवेळी । नानापरी करोनिया ॥५६॥

तव एक कपटी असुर । गळ्यात घाली माळाभार । जटा शोभती माथ्यावर । भस्मे शरीर चर्चिले ॥५७॥

काखेत ताडपत्राचे पुस्तक । ब्रह्मचारी कपटी देख । राजसभेत येवोनि कौतुक । करिता जाहला तेधवा ॥५८॥

राजा पाहोनिया ब्राह्मण । येवोनि वंदी त्याचे चरण । म्हणे कोणीकडोनि जाहले येणे । मजकारण सांगाजी ॥५९॥

आशीर्वाद देवूनिया रायाशी । म्हणे गेलो होतो गंधर्वनगराशी । तुझे हीत सांगणे आहे तुजशी । म्हणोनि येथे पातलो ॥६०॥

राजा म्हणे जी विप्रवर्या । सांगे आता लागतो पाया । मजवर ठेवावी तुवा दया । ही काया अर्पीन तुज ॥६१॥

ब्राह्मण म्हणे विश्वास धर । तुझेवरी अरिष्ट फार । वायूने उडोनि पर्वतथोर । नगरावर पडतील तुझे ॥६२॥

ऐसेपरी अरिष्ट कोटी । उद्भवोनि होशील कष्टी । विनायक गृही आणल्यासाठी । तुज अपाय बहुतांपरी ॥६३॥

आता ऐके माझे वचन । तुवा त्याचा त्याग करून । प्रजांसह आपले अवन । सधीर मन करोनि करी ॥६४॥

राजा म्हणे गा विप्रवरा । तू अवलोकी त्या अदितिकुमरा । मग करोनिया विचार बरा । मज सांगे भविष्यार्थ ॥६५॥

पाचारोनिया विनायकाशी । राजा भेटवी त्या विप्रांशी । तो पाहोनि महोत्कटाशी । तेव्हा मानसी खोचला ॥६६॥

सरड्यापरी तुकवोनि मान । सामुद्रिकासि करी कथन । म्हणे पडशील कूपी जाऊन । कदापि वाचोन आलाशि जरी ॥६७॥

समुद्री पडोनिया मरशील । हे मानी माझे सत्यबोल । ये माझे संगती तरी नासेल । अरिष्ट सकल बालका ॥६८॥

ऐकोन त्याचे भविष्यवचन । विनायक अभ्यंतरी जाऊन । मुठीत राजमुद्रिका धरून । तया लागोन पुसतसे ॥६९॥

माझे मुष्टीत काय आहे । हे विप्रा सांग लवलाहे । कपटी तेव्हा खाली पाहे । म्हणे आता हे सांगू कैसे ॥७०॥

विनायक म्हणे त्या कपटीशी । तू तर पुढील भविष्य जाणशी । मुष्टीतील वस्तू का न सांगशी । खाली पाहशी कपटिया ॥७१॥

तीच मुद्रा त्याचे वक्षावरी । विनायक तेव्हा क्रोधे मारी । वज्रहत पर्वतापरी । मृत असुर पडियेला ॥७२॥

असुराचे पडता प्रेत । मंदिरे मोडिली अपरिमित । लोक पाहोनि आश्चर्य करित । पुष्पे वर्षती सुरमेळ ॥७३॥

त्याचा होता ऐसा नाश । भय वाटले असुरांस । देवांतक नरांतकास । चिंता झगटली प्राणाची ॥७४॥

श्रीकृष्णाचे नाशालागी । कंस दैत्य पाठवी वेगी । कूपकंधर असुर तयाप्रसंगी । तैसे पाठवी नरांतक ॥७५॥

देवोनिया वस्त्राभरणे । तयासि तो असुर म्हणे । तुम्ही काशीपतीचे नगरी जाणे । बाल मारणे वंचोनिया ॥७६॥

दोघे असुर करोनि नमन । तेव्हा निघाले वेगेकरून । काशीपतीचे नगरी येऊन । कापट्य त्याणी आरंभिले ॥७७॥

कृपासुर होवोनिया कूप । जळे विस्तारला तेव्हा अमुप । कंधर धरोनि बालकाचे रूप । कश्यपसुताशी भेटला ॥७८॥

बालकांसवे कश्यपनंदन । क्रीडा करी आनंदघन । तयासि बोले असुर वचन । नगराबाहेरी खेळू चला ॥७९॥

त्याचा समजोनि कपटाचार । बालकांसह अदिति कुमर । येता जाहला नगरबाहेर । खेळ अपार खेळतसे ॥८०॥

खेळखेळता तयेवेळी । बाळे पातली कूपाजवळी । उदक पाहती आत तळी । सर्व मंडळी मिळोनिया ॥८१॥

आत दिसे निर्मळनिर । मंडुक त्यात होवोनि असुर । शब्द करिती भयंकर । कश्यपकुमार पाहतसे ॥८२॥

बाळक वेषे निशाचर । तेणे ढकलिला कश्यपकुमार । कूपी पडता हाहाःकार । करिती कुमर सांगाती जे ॥८३॥

आक्रोशे रडती तेव्हा बाळक । वर्तमान ऐकोन नरनायक । भूमीसी ताडोनिया मस्तक । रडत तेव्हा पातला ॥८४॥

कूपाभोवती मिळोन जन । करिती तेव्हा दुःखे रुदन । राजा त्याचे गुण आठऊन । शोक दारुण करितसे ॥८५॥

म्हणे आता करू काय । प्राण सोडील त्याची माय । कैसा घडला यासि अपाय । वंदिती पाय सुर याचे ॥८६॥

अपयश आले माझे माथा । जनास मुख कैसे दाउ आता । कूप जैसा उत्पन्न जाहला । अवचिता अदितीसुता ग्रासावया ॥८७॥

श्रीकृष्ण यमुनाडोही बुडाला । तेव्हा गौळियानी आकांत केला । तैसाच प्रकार येथे घडला । शोक जनाला न साहे ॥८८॥

आत पडता कश्यपसुत । कूप मंडूकरूपे तयासि गिळित । मग कूपाबाहेर पडत । जात उडत आकाशपंथे ॥८९॥

त्याचे फोडोनिया उदर । बाहेर आला अदितीकुमर । तो पर्वतप्राय उभा कंधर । असुर भयंकर आक्रोश करी ॥९०॥

त्याचा तेव्हा न लगता क्षण । विनायके घेतला निःशेष प्राण । भूमीवरी विशाल प्रेत दारुण । पडते जाहले तयाचे ॥९१॥

विजयी जाहला कश्यपात्मज । प्रेमे भेटे तयास भूभुज । देव पुष्पे वर्षती सहज । जनसमाज आनंदला ॥९२॥

राये भांडार फोडून । सुखी केले याचक जन । संगे घेवोनि कश्यपनंदन । करी भोजन आनंदे ॥९३॥

जयजयाजी विश्वनाथा । पुढे बोलवी रसाळकथा । सदा तुझे चरणी माथा । माझा राहो गजानन ॥९४॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । सप्तमोध्याय गोड हा ॥९५॥ अध्याय ॥७॥ ओव्या ॥९५॥

अध्याय सातवा समाप्त

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४