Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय १२

श्रीगणेशाय नमः । श्रीदिगंबराय नमः ।

जयसिद्धिबुद्धिह्रदयविलासा । भक्तपालका चारुहासा । मन्मानस राजहंसा । भक्तवासा चतुर्भुजा ॥१॥

निजकथासुरससुधा । ह्रदयकमळी करवी बोधा । तेणे तापशमन त्रिविधा । संसारबाधा नासे तेणे ॥२॥

इंद्रपराभवलियापाठी । त्रिपुरासुर जगजेठी । करोनिया अटाटी । कैलासापाठी धावतसे ॥३॥

पाहूनि त्याचे महावैभव । सामोरा धावे महादेव । देऊनिया त्यासि खेव । दैत्यराव तोषविला ॥४॥

त्रिपुर म्हणे विश्वनाथासी । मी स्नेहभावे आहे तुजशी । कैलास देऊनि आम्हाशी । मंदराचळी तुवा वसावे ॥५॥

तथास्तु म्हणोनि शंकर । अग्नीकालिका घेऊनि सत्वर । बैसोनिया नंदीवर । मंदर तेव्हा वळंघिला ॥६॥

घेऊनिया भुतगणाचा मेळ । शंभू सेवी मंदराचळ । तेथूनिया दैत्यपाळ । वैकुंठाकडे सुडावला ॥७॥

तव विष्णू सकल संपत्तीसी । राहे जाऊनि क्षीरसागरासी । ब्रह्मा त्यागोनि सत्यलोकासी । राहे कमलात नाभिदेशी ॥८॥

पावोनि त्रैलोक्यविजय । नाहीच केला कोठे अपाय । त्रिजगती त्रिपुरराय । सर्व पाय वंदिती त्याचे ॥९॥

स्वर्गमृत्यूपाताळ समस्त । जिंकोनि आणिले वस्तुजात । मणिरत्‍ने असंख्यात । हिरोनी नेती दैत्य तेव्हा ॥१०॥

राजकन्या नागकन्या । देवकन्या स्वरूपमान्या । दैत्यी हिरोनि ऋषींच्या धन्या । पतिव्रतांगना हरियेल्या ॥११॥

मांडिले गोब्राह्मणाचे कंदन । यज्ञ टाकिले विध्वंसुन । करू लागला साधूंचे छळण । केले कलन पृथिवीचे ॥१२॥

स्वधर्म राहिला निःशेष । अधर्म जाहला प्रबळ विशेष । सदाचार पावला शोष । दैत्यदोष घरोघरी ॥१३॥

राहिल्या तीर्थयात्रा सकल नेम । बुडाले वर्णाश्रमधर्म । स्वाहास्वधाकार संपूर्ण । कर्म बुडविले दैत्यांनी ॥१४॥

हतस्थान धनवैभव । होवोनिया सकळ देव । गुहांतरी राहिले सर्व । म्हणती उपाव यासि काय ॥१५॥

ऐसे असता चिंताक्रांत । नारद आला तेथे शोधित । लोटांगण घालिती त्वरित । अमर्त्य तेव्हा ऋषिचरणी ॥१६॥

पाहूनि त्यांचे ऐसे कष्ट । कृपेने द्रवला मुनिश्रेष्ठ । गणेशमंत्र राजवरिष्ठ । कर्णे स्पष्ट उपदेशिला ॥१७॥

देऊनिया आशीर्वाद । स्वर्गपंथे गेला नारद । मग सकल देवांचा वृंद । पावोनि मोद तप करिती ॥१८॥

करोनिया गणेशाग्रवृत्ती । सकल देव अनुष्ठान करिती । पाहूनि त्यांची कष्टस्थिती । कृपामूर्ती कळवळिला ॥१९॥

दिव्य स्वरूप धरिले सुभट । चतुर्भुज धावे तो विकट । नासावया सुरांचे कष्ट । जाहला प्रगट गणपती ॥२०॥

सहस्त्रविद्युत्प्राय प्रकाशमान । दंताग्री शुंडादंड ठेऊन । पुढे उभा गजानन । देव पाहून घाबरले ॥२१॥

घालोनिया लोटांगण । स्तुती करिती देवगण । तेणे तुष्टला धूम्रवर्ण । संकटहरण करीन म्हणे ॥२२॥

तुमच्या स्तवने संतोषलो । तेने तुम्हा आधीन झालो । देव म्हणती दुःख पावलो । त्रिपुरासुरप्रभावे ॥२३॥

तू जरी कनवाळू दीनाचा । तरी नाश करी असुराचा । नातरी देहांत मांडला आमचा । असता आमचा कैवारी तू ॥२४॥

गणेश वदे अभयवचने आता असावे निश्चितमने । तुमचे ह्रदयी नंदनवने । प्रमोदजीवने वाढोत की ॥२५॥

ऐसे देऊनि अभयवचन । तेथोनि निघाला गजानन । भूदेव वेष अवलंबून । त्रिपुरभुवन प्रवेशला ॥२६॥

वह्नी जैसा दैदीप्यमान । असुरे विप्र ऐसा पाहुन । आसनाखाली उडी टाकून । पाणी जोडून नमन करी ॥२७॥

बैसवोनिया सिंहासनी । युक्तोपचारे सुपूजुनी । तोषऊनिया नम्र वचनी । नाम त्याचे पूसतसे ॥२८॥

येरू म्हणे श्रवण कर । मन्नाम तो कलाधर । तुझे अवलोकून वैभव थोर । संतोष जाहला बहुसाल ॥२९॥

तुझे ऐसा भाग्यशाली । देखिला नाही भूमंडळी । माझी वृत्ती संतोषली । किर्ती ऐकिली ती सत्य ॥३०॥

ऐकोनि म्हणे त्रिपुरासुर । नाममात्र कलाधर । किंवा जाणशी कला समग्र । दावी सत्वर जाणशी तरी ॥३१॥

नातरी हे नाम हास्यास्पद । ऐकोनि म्हणे कलाभेद । आता पाहे तू विशद । दावितो तुज असुरेशा ॥३२॥

लोहतार कनकमय । पुरे निर्मिता जाहला महाकाय । एक शरावरी त्याची सोय । पाहता राय चोजावला ॥३३॥

वनोपवने रम्य गोपुरे । ठाईठाई देव मंदिरे । निर्मलोदके वाहती सुंदरे । पाहोनि चमत्कारे दैत्यराव ॥३४॥

द्विजेंद्र म्हणे तयाशी । तू राहावे या पुराशी । एकभेद्यमात्र पिनाकीशी । हे इतरांशी अगम्य पै ॥३५॥

पाहोनि ऐसे कलालाघव । संतोषोनि म्हणे दैत्यराव । कलाधर हे तुझे नाव । सत्य सत्य त्रिवाचा ॥३६॥

आता जाहलो तुज प्रसन्न । जे का इच्छी तुझे मन । तू सांग मजलागुन । ते पुरवीन मी तुझे ॥३७॥

मग हास्यवदने म्हणे ब्राह्मण । जरी तू होसी योद्धा दारुण । तरीच तुजशी एक मागण । आहे जाण दैत्यवर्या ॥३८॥

येरू म्हणे दुर्लभ सुरनरा । ते देईन तुजशी विप्रवरा । निःसंदेहे मागे सुंदरा । आता विचार करू नको ॥३९॥

विप्र म्हणे ऐक सावधान । कपर्दीशी हट्टे जिंकुन । गणेशमूर्ती दे आणून । तरीच धन्य होशी जगी ॥४०॥

सहज गेलो शिवदर्शनासी । अवलोकिले मी मूर्तीसी । अप्रतिम ब्रह्मांडी ऐसी । म्हणोन तुजशी मागतो ती ॥४१॥

दैत्येंद्र म्हणे तयालागुन । प्रयत्ने देईन मुर्ती आणून । मग वस्त्रभूषणे अमूल्यरत्‍ने । विप्रोत्तमासि देतसे ॥४२॥

दासदासी सालंकृत । धेनु रथ कुंजर बहुत । हेमनिष्क असंख्यात । बळेच देत कलाधरा ॥४३॥

देवोनिया दशग्राम । आदरे गौरविला विप्रोत्तम । तो पावोनिया स्वाश्रम । निजरामा आनंदविली ॥४४॥

स्वाश्रमी विप्र गेलियावरी । मग दानवेंद्र विचार करी । देता विप्रासि मूर्ती तरी । कीर्ती बरी जगी माझी ॥४५॥

मग बलाढ्य दूत बोलावुनी । पाठविता झाला शंकरभुवनी । दूत म्हणे शिवालागुनी । ऐक कानी वचन माझे ॥४६॥

चिंतामणीची दिव्यमूर्ती । तुझे मंदिरी अष्टमूर्ती । ती मागतो चक्रवर्ती । अतिप्रीती करोनिया ॥४७॥

जगी उत्तम वस्तु होत्या । दैत्यनाथे आणिल्या त्या । मूर्ती देशी गृत्समदापत्या । सुख भोगिशी जितेपणे ॥४८॥

सुखे मूर्ती न देशी जरी । महद्‌दुःख पावसी तरी । ऐकोन क्षोभला पंचाशरारी । नेत्र आरक्त करोनिया ॥४९॥

तुवा जावून सांगावे तयासी । भीती नाही मज ईश्वरासी । सुखे यावे तुवा युद्धासी । समरी पावसी कृतांतपुरी ॥५०॥

ऐकोन शिवाचे सक्रोधवचन । दूत सांगे असुरासि जाऊन । दैत्येश जाहला क्रोधायमान । वाहिनी घेऊन निघाला ॥५१॥

विमानापरी त्रिपुरनगर । फिरतसे अलात चक्राकार । त्यामाजी आरूढोन असुर । संग्राम घोर करू आले ॥५२॥

ऐसे ऐकोन पिनाकपाणी । सेना सिद्ध करोन रणी । उभा राहे धनुर्धराग्रणी । जैसा तरणी प्रलयींचा ॥५३॥

दोन्ही सैन्या पडली गाठ । रजे कोंदले घनदाट । परस्परे नोळखती भट । माथा घाव हाणिती बळे ॥५४॥

सिंहनादे वीर गर्जती । तेणे उलथू पाहे क्षिती । वीर शस्त्रास्त्रे वर्षती । जीमूत जैशा जळधारा ॥५५॥

रणी खोचले वीरप्रवाह । बाहुभूषणासहित कर । गजअश्व पडले अपार । घोरांदर मांडले रणी ॥५६॥

प्राणे मुकल्या वीरश्रेणी । शोणितनदी वाहे रणी । शरसंधे झाकुळला तरणी । अंधार पडला रणी तदा ॥५७॥

रणनदीचे वाढले पुर । शर वाहती मत्स्याकार । गज कलेवरे तेथे सुसर । नौकाकार रथ वाहती ॥५८॥

धनुष्यासि ते पादोदर । बाबरझोटी शेवाळ थोर । वीरी वीर आटले समग्र । मग शंकर लोटला पुढे ॥५९॥

रणी देखोन शंकर । सन्मुख धावला त्रिपुरासुर । कोदंडी लाऊनि शर । द्वंद्वयुद्धा मिसळले ॥६०॥

समरी प्रचंड दैत्यासी । षण्मुख पाचारी त्यासी । नंदी हाकारी चंडाशी । महाप्रळयाशी पेटले ॥६१॥

भीमकाय आणि पुष्पदंत । भृंगीटि कालकूट झगटत । वीरभद्रावरी वज्रदंष्ट्र उठावत । त्याही कल्पांत मांडला ॥६२॥

शुक्र पाहताच नयनी । सुराचार्य आला धाउनी । दैत्य अमात्याशी पाकशासनी । द्वंद्वयुद्धी मिसळला ॥६३॥

त्रिपुरासुर पुत्रासी । जयंत युद्ध करी त्यासी । गज भीडले गजाशी । रथ रथांसी झगटले ॥६४॥

प्रचंडे देऊनिया हाक । षडाननावरी सोडी सायक । षण्मुख तोडी एकएक । वीरनायक खवळिला ॥६५॥

प्रचंड निर्वाण शर सोडी । ते कार्तिकेय मध्येच तोडी । दैत्य क्रोधे अधर रगडी । मग काढी निर्वाण शर ॥६६॥

धनुष्यी लाऊन नव बाण । प्रचंडे सोडिले दारुण । स्कंदे मध्ये केले खंडन । पाच बाण काढिले मग ॥६७॥

स्कंदे सोडिले पाच बाण । प्रचंड करी निवारण । परिशर भेदले दारुण । घोडे मरण पावले ॥६८॥

सपिच्छ भेदला एक ह्रदयी । प्रचंडासी मूर्छा दाटली पाही । मूर्छित पडता ते समयी । देव गर्जती जयजयकारे ॥६९॥

येरीकडे नंदी आणि चंडवीर । येरयेरा मारिती शर । सिंहनादे गर्जविती अंबर । पाय मागे न ठेविती ते ॥७०॥

नंदिवीरे पंच सायक । सोडोनि चंड भेदिला देख । मूर्छित होवोनि वीरनायक । पडला तेव्हा रथाखाली ॥७१॥

तैसे पुष्पदंत आणि भीमकाय । सायके ताडिती निष्ठुरघाय । परस्परे प्राणासि अपाय । करू पाहती निकराने ॥७२॥

महाकाय कानाडी वोढुनी । दश सायक दिधले सोडुनी । पुष्पदंते पाडिले तोडुनी । खंडे खंडे करोनिया ॥७३॥

रागा पेटूनिया पुष्पदंत । तीन बाणे ह्रदय भेदित । महाकाय मृतप्राय पडत । पाहोनि गर्जत पुष्पदंत ॥७४॥

भृंगिटी आणि कालकूट । रणी योद्धे भिडती सुभट । भृंगिटी धरोनिया हट्ट । बाण तीक्ष्ण वर्षतसे ॥७५॥

आकर्ण वोढोनि कानाडी । भृंगिटी पाच शर सोडी । एकबाणे सायक तोडी । ध्वज पाडी एके बाणे ॥७६॥

क्रोधे विंधोनिया कौतुके । तुरंगमा मारिले दोन सायके । कालकूट ह्रदय एके । भेदोनि निके भिन्न केले ॥७७॥

कालकूट मूर्छित जाहला । रथाखाली उलथला । त्याचे सैन्या पळ सुटला । रणी खवळला वीरभद्र ॥७८॥

त्यासि वज्रे मांडोनि फळी । शरमारे रथ झाकुळी । वीरभद्र गर्जोनि बळी । शरजाळी वर्षतसे ॥७९॥

धगधगीत तीन बाण । वीरभद्र सोडी दारुण । येरे तोडिले न लगता क्षण । अचुक संधान वज्रदंष्ट्राचे ॥८०॥

वज्रदंष्ट्र वीरनायक । रागे सोडी तीन सायक । वीरभद्रे भेदिले एकएक । अचुक संधान तयाचे ॥८१॥

वीरभद्र म्हणे रे मशका । किती धरिसी व्यर्थ आवाका । खद्योत करू पाहे अर्का । स्वतेजे साम्यता ज्यापरी ॥८२॥

की पादोदरापुढे पुष्ट मूषक । दावी आपुले युद्ध कौतुक । आता छेदीन रे मस्तक । राहे निष्टंक समरंगणी ॥८३॥

वीरभद्रे वीरनायके । ह्रदय भेदिले तीन सायके । मूर्छित पडला अधोमुखे । पळे वाहिनी तयाची ॥८४॥

दैत्य करिती हाहाःकार । जय शब्दे गर्जती अमर । वीरश्री चढली तयांसमोर । दैत्यसंहार केला त्याणीं ॥८५॥

इंद्रे हाणोनिया र्‍हादिनी । अमात्य पाडिला मेदिनी । जयंते असुरसुतालागुनी । रणांगणी पहुडविले ॥८६॥

फुटले त्रिपुराचे कटक । दशदिशा पळती एक एक । रणी पहुडले वीरनायक । समरी वृंदारक क्षोभले ॥८७॥

संहारित उठली दानवपृतना । असंख्य पाडिली त्रिपुरसेना । जयजयकारे गर्जती नाना । विजयवाद्ये वाजऊनिया ॥८८॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । द्वादशोध्याय गोड हा ॥८९॥ अध्याय १२॥ ओव्या ॥८९॥

श्रीआर्यांबाप्रसन्न ॥

अध्याय बारावा समाप्त

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४