Get it on Google Play
Download on the App Store

सती 50

'जयंत, त्या शिवालयात जाऊ नकोस.'
'का बाबा? आपण सारीच तेथे रहायला जाऊ. कसे छान वाटते तेथे. कशी उंच उंच झाडे तेथे आहेत! किती पक्षी, छानछान रंगाचे पक्षी! बाबा, तेथे तुम्ही कराल का हो बाग? मळयात कशाला फुले? देवाजवळ फुले हवीत. करा ना तेथे बाग, देवाजवळ बाग.'

'तू पुढे मोठा झालास म्हणजे कर तेथे बाग. आम्ही आता म्हातारी झालो. जयंता, तू शहाणा हो. उगीच वेडेवाकडे विचारीत नको जाऊ. घरी  पंतोजी शिकवायला येतात, त्यांच्याजवळ शिकत जा. तू त्यांच्याजवळ बसतही नाहीस. नीट लिहावाचायला शीक. हिशेब लिहायला शीक. स्तोत्रे शीक, परवचा शीक. सारे शीक. शिकशील ना? 'पित्याने प्रेमाने विचारले.'

'बाबा, तुम्हीच मला शिकवा. तुम्ही का नाही शिकवीत?' जयंताने प्रश्न केला.
'मला नीट नाही शिकविता येत.' धोंडोपंत म्हणाले.

'तुम्ही शहाणे नाही झालेत?' जयंताने विचारले.
'नाही झालो. आता तू हो. मी भिकारी होतो. तू श्रीमंत हो, हुशार हो.' पिता म्हणाला.
'हुशार होणे म्हणजे काय?'

'हुशार होणे म्हणजे घरदार सांभाळणे, शेतीवाडी सांभाळणे; आपली संपत्ती वाढविणे. दहा रुपये असतील, तर त्याचे शंभर करणे. हजार असतील त्याचे लाख करणे. समजेल पुढे तुला, पंतोजींजवळ शीक.' पित्याने समजावून दिले.

दहाचे शंभर कसे होतात. ते जयंताला समजेना. दहावर पूज्य शंभर दे. लवकरच तो शिकला. तो हुशार होता. मैनेचाच तो भाऊ, पंतोजी येत,  शिकवीत, गोष्टी सांगत. पुराणातील कथा सांगत. जयंत कधीकधी त्यांना मार्मिक शंका विचारी. कधीकधी पंतोजींस उत्तरे देता येत नसत. ते मग आपले अज्ञान क्रोधाने लपवीत.

जयंताचे अक्षर मोठे सुंदर होते. वळणदार अक्षर, मोत्यासारखे अक्षर. तो एखादा चुलीतील कोळसा घेई व 'मैनाताई कधी येईल?' माझी मैनाताई मला कधी घेईल?' वगैरे लिहून ठेवी. असे इकडेतिकडे कोळशाने लिहू नये म्हणून सावित्रीबाई रागावत. मग जयंत बाहेर जाई. दगडावर लिही. झाडावर लिही.

'जयंता, हे झाडावर लिहितोस, ते कोण वाचणार?' त्याला एका गृहस्थाने विचारले.
'पाखरे वाचतील.'

'पाखरांना का वाचता येते? त्यांना का पंतोजी आहेत शिकवायला?'
'त्यांच्याही शाळा असतील, आपल्याला काय माहीत? मी त्या शंकराच्या देवाजवळ गेलो की, पाखरे मला हाका मारतात. मी त्यांना सांगतो,  मैनाताईला बोलवा. मग ती गप्प बसतात. हसता काय तुम्ही? तुम्हाला खोटे वाटते? मुलांचे सगळयांना खोटे वाटते. सारी मला हसतात. मी तुमच्याजवळ बोलतच नाही, मी आपला जातो.' असे म्हणून जयंता पळून गेला.

जयंता इकडे असा लहानाचा मोठा होत होता.
आणि तिकडे मैनेची काय होती स्थिती.