सती 25
''ते गरीब आहेत, म्हणूनच तुझे लग्न ते श्रीमंताजवळ ठरवतील. आपल्या सुंदर मुलीला दारिद्रयाचा वारा लागू नये, म्हणून प्रेमळ पिता पराकाष्ठा करील.''
''मला नकोत राजवाडे, मला झोपडी आवडते.''
''परंतु तुझ्या वडिलांना नसेल आवडत तर?''
''लग्न तर माझे लागायचे ना? आईबापांना मुलीच्या सुखापेक्षा का पैसा प्रिय असेल? आपली मुलगी गरिबीत असूनही सुखाने नांदत आहे, हे पाहून त्यांना आनंद होईल की, सोन्यामोत्यांनी मढलेली परंतु सदैव रडवेली अशी मुलगी पाहून त्यांना आनंद होईल? आईबाप मुलीला वाढवतात, ते का तिचे जीवन पुढे दु:खाचे व्हावे म्हणून?''
''मैने, तुझे आईबाप तू वेडी आहेस, असे म्हणतील. तुझे हित तुझ्यापेक्षा आम्हांला अधिक कळते, असे म्हणतील. केवळ भावनांनी या जगात चालत नाही. आणि मनुष्याच्या त्या त्या क्षणी उत्कट होणा-या भावना सदैव तशाच तीव्रतेने टिकतील, असेही नाही. भावनांचाही एक ऋतु असतो. तो मोसम गेला की, भावनांचा भर ओसरतो. त्यानंतर जीवनात मग भावनांची फुले फुलत नाहीत. थोडाफार तो जुना वास मध्येच येतो, क्षणभर येतो; परंतु क्षणभरच. मैने आज तुला जगातील गरीबी गोड वाटत आहे; परंतु उद्या संसारात पडलीस, मुलेबाळे झाली, शेजारची सुखी व संपन्न मुले पाहिलीस, म्हणजे दारिद्रयाचा तुला तिटकारा येईल. आपल्या मुलांचे लाड आपणास पुरवता येत नाहीत, त्यांना खाऊ देता येत नाही, खेळणी देता येत नाहीत, म्हणून तू तडफडशील, रडशील. मैने, आईबाप स्वत: आनंदाने गरिबीत राहतील. परंतु स्वत:च्या मुलांना दारिद्रयात गारठलेले पाहणे त्यांना होत नाही.''
''हृदयातील प्रेमाच्या उबेने गरीब आईबाप मुलांना वाढवतील.''
''काव्य संसारात निरुपयोगी आहे.''
''काव्यच एक सत्य आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. या सर्व जीवनाला सुरूप वा कुरूप करणे हे आपल्या भावनेवर आहे. जड परिस्थितीचा बागुलबुवा चिन्मय आत्म्याला भिववू शकणार नाही. मी दारिद्रयालाही सुंदर करीन. काळया ढगांना सूर्य रंगवतो. माझा प्रेमसूर्य संकटांना सुंदर करील. मी माझे तनमन तुम्हाला दिले आहे. मी आईला तसे स्पष्ट नसले, तरी अस्पष्ट सांगितले आहे. ती बाबांना वेडेवाकडे करू देणार नाही. आई त्यांचे मन वळवील.''
''बायकांच्या मताला किंमत नसते.''
''का असे म्हणता तुम्ही?''
''मी कुणकूण ऐकली, गुणगूण ऐकली.''
''सांगा, काय काय ऐकलेत ते.''
''तुला वाईट वाटेल ऐकून.''
''वाईट गोष्ट तुमच्या तोंडून ऐकताना मला जरा कमी वाईट वाटेल. कडू घोट प्रेमळ माणसांच्या हाताने दिलेला कमी कडू लागतो. अत्यंत अशुभ वार्ता अत्यंत आवडत्या माणसाच्या तोंडून ऐकावी; कारण ते अशुभही प्रेम व सहानुभूती यातून न्हाऊन बाहेर येईल. सांगा, तुमच्या शुभ सुंदर ओठांतून ती अशुभ वार्ता सांगा.''
''माझ्याने सांगवत नाही.''
''मला सांगवत नाही? मला सांगायला भिता? मी गैरसमज करून घेईन, असे वाटते तुम्हांला? नकोत असले संशय. पडदे दूर करा व हृदय मोकळे करा.''
''मैने, मैने, तुझे वडील एका श्रीमंताशी तुझे लग्न लावणार आहेत.''
''एका श्रीमंताशी?''