Get it on Google Play
Download on the App Store

सती 20

सायंकाळी मैना आली.

''हल्ली पुराण नाही का?'' तिने विचारले.

''पुराण कधीच संपले, बंद पडले. श्रोते असतील तर पुराण.''

''एकटयाला येथे कंटाळा नाही येत?''

''येथे झाडे आहेत, पाखरे आहेत. रात्री वटवाघळे असतात. मनात विचार असतात, स्वप्ने असतात; आशा-निराशा असतात. या जगात कोणालाही एकटे राहता येत नाही. अनंत सृष्टी अंतर्बाह्य भरलेली आहे.''

''तुम्ही असे एकटेच राहणार का?''

''मला दुकटे कोण मिळणार? मी दरिद्री आहे. ना मला घर ना दार. ना शेती ना भाती. ना बाग, ना बंगला.''

''भिकारीसुध्दा संसार करतात, गातात, आनंदात असतात.''

''ते खरोखरचे भिकारी असतात.''

''तुम्ही का खोटे भिकारी आहात?''

''भिकारी असूनही भिका-याप्रमाणे राहण्याची मला लाज वाटते. भिका-याप्रमाणे संसार करण्याचे मला धैर्य नाही. मी भित्रा आहे.''

''कोणी धैर्य दिले तर? तुमचा हात ? कोणी तुम्हाला जगभर नेले तर? याल त्याच्याबरोबर?''

''मैने!''
''काय?''
''काही नाही. तू जा. तुझा लहान भाऊ तुला हाक मारीत असेल. त्याला खेळव. जा.''
''भांडे द्या.''

''ते बघ तेथे आहे. ते घे.''
''किती स्वच्छ घासले आहे तुम्ही!''
''तुझ्या निर्मळ मनाप्रमाणे ते दिसत आहे.''

''निर्मळ जो असतो, त्याला सर्वत्र निर्मळ पाहण्याची इच्छा असते. नाही?''
''मैने, आपण भांडी निर्मळ घासतो, परंतु मनाला कोण घासणार? हे ताकाचे ओशटलेले भांउे घाशीत असताना मी जणू माझे बरबटलेले मन घाशीत होतो.''

''कशात बरबटले, कशात लडबडले?''
''वासनाविकारांच्या चिखलात.''
''वासनाविकारांच्या चिखलातून सृष्टीची सुंदर कमळे दृष्टीस पडतात. कोठून आलात जगात तुम्ही, कोठून आल्ये मी? मनाला फार घासू नका. स्वत:वर फार त्रासू नका.''

''मैने!''

''काय?''
''काही नाही. जा. भाऊ धाकटा रडत असेल. बाबा रागावतील. जा.''
भांडे घेऊन मैना गेली. ती घरी गेली तो लहान भाऊ रडत होता. काही केल्या तो राहीना.