सती 49
जयंताला धोंडोपंत स्वत: आंघोळ घालीत. त्याच्या कपाळी केशरी गंध लावीत. त्याला सूर्याला नमस्कार घालण्याला सांगत. तो जेवायला पित्याजवळ बसे. त्याचा रंगीत पाट होता. चांदीचे ताट होते. चांदीची झारी होती. दुपारच्या वेळेस धोंडोपंत जयंतास जरा निजवीत. त्याची चिमणी मऊमऊ गादी होती. छोटीशी मच्छरदाणी होती; परंतु जयंता जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा तो दुपारी झोपेनासा झाला. आईबापांचा डोळा चुकवून गावात हिंडू फिरू लागला. तो दुपारी झोपल्याचे ढोंग करी, परंतु धोंडोपंतास झोप लागली म्हणजे तो हळूच पळून जाई. तो गावाबाहेरच्या नदीत डुंबे. एके दिवशी तो नदीपलीकडेही गेला. त्या शिवालयाजवळ तो आला. त्या शिवालयात तो शिरला. त्या देवळाभोवती तो हिंडला. त्या बकुळीच्या झाडाखाली बसला. पाखरे किलबिल करीत होती. ती का जयंताला गतगोष्टी सांगत होती? तेथून उठू नये असे त्याला वाटे.
या देवळात का बरे कोणी येत नाही? हे का असे ओसाड, पडके? येथे फुले नाहीत, काही नाही. या देवाची का नाही कोणी पूजा करीत? बाळ जयंताच्या मनात किती तरी विचार येत होते. त्याने तेथील पाने गोळा केली. हिरवी हिरवी पाने. तो त्याने शंकराच्या पिंडीवर वाहिली. देवाला त्याने नमस्कार केला.
'का ग, जयंत कोठे गेला?' धोंडोपंतांनी सावित्रीबाईस विचारले.
'निजवला होतास ना तुम्ही? मीही जरा पडले होते. आज अंग दुखत आहे माझे. खरेच का तो नाही वर? सावित्रीबाईंनी विचारले.
'तुला त्या मुलाची मुळी काळजी नाही. झालीस कशाला आई?' धोंडोपंत म्हणाले.
'तुम्ही मला हात लावू देत नाही, तर मी काय करू? कसा झाला तरी माझ्या पोटचा गोळा आहे. एक दिवस तुम्हीच कंटाळाल व मग आईच कामा येईल.' सावित्रीबाई म्हणाल्या.
'कोठे गेला असेल? मी बघतो. तू पण बघ.' ते म्हणाले.
धोंडोपंत बाहेर पडले. सावित्रीबाईही शेजारीपाजारी चौकशी करू लागल्या; परंतु एकदम त्यांच्या मनात काही विचार आला. त्यांची पावले नदीकडे वळली. नदी ओलांडून त्या तडक एकदम त्या शंकराच्या देवळात आल्या. तो तेथे जयंता शंकराची पूजा करीत होता.
'जयंत, येथे काय करतोस?'
'देवाची पूजा.'
'इतका लांब एकटा कशाला आलास?'
'आई, या देवाची कोणीच का नाही पूजा करीत? येथे का नाही बरे बाबा फुलझाडे लावीत? मला येथून घरी येऊ नये असे वाटते, येथेच रहावेसे वाटते. मैनाताई का येथेच येऊन बसे? मला येथेच बसावेसे का बरे वाटते? राहू मी येथे?
'वेडा आहेस तू. या रानात का राहणार?'
'ज्या रानात देव आहे, तेथे कसली भीती? ध्रुव नाही का रानात गेला? राहू का आई?'
'आता घरी चल. मग मोठा झालास म्हणजे ठरवू.'
असे म्हणून सावित्रीबाईंनी जयंताचा हात धरला. बाळ जयंत सारखे मागेमागे बघत होता. जणू त्याचा ठेवा तेथे होता. जणू तेथील झाडे, तेथील पाखरे, तेथील दगडधोंडे, त्या शिवालयाच्या ती भिंती पिंडी, तो नंदी, तेथील वारा, तेथील अणूरेणू त्याला हाका मारीत होती.
सावित्रीबाई जयंताला घेऊन घरी आल्या. थोडया वेळाने धोंडोपंत आले. जयंताला पाहून त्यांचा जीव खाली पडला.
'कोठे गं सापडला?'
'त्या शिवालयात.'