सती 33
वासुदेवरावांस विजय मिळाला. ते आपल्या दिवाणखान्यात गादीवर पडले होते. त्यांच्या चेह-यावर जरा आनंद दिसत होता. ते मनात म्हणत होते, 'प्रतिज्ञा तर जिंकली. म्हणत होते लोक की, बुद्रुकाला मिळणार नाही मुलगी. परंतु मिळवली पठ्ठयाने. चटकचांदणी आहे म्हणतात मुलगी. मुलगी नसती मिळाली तर अब्रू गेली असती. अब्रूला जपावे लागते. रुपये काय चाटायचे आहेत. दहा हजार काय, दहा लाख ओतले असते. अब्रू कशी धुळीत मिळवायची? समाजात तर विजय मिळविला. इतर सारे श्रीमंत पराभूत करून हे रत्न तर मी मिळविले. हो, आता मिळाल्यासारखेच आहे. एकदा अक्षता पडल्या म्हणजे झाले. परंतु पुढे कसे होणार? बाहेर विजय मिळविला परंतु घरात कसा मिळवायचा? आतापर्यंत तिघीशी झगडावे लागे, तिघींचे शिव्याशाप खावे लागत. आता चौथी येईल. अभिमन्यू अनेकांशी एकटा लढला, तसे मला करावे लागणार. शिखंडीचे बाण सहन करीत भीष्म शरतल्यी पडले, त्याप्रमाणे या चौघींचे वाग्बाण सुखाने सहन करीत मी पलंगावर पडून राहीन. ही तर म्हणे पुजा-याची आहे पोर. त्या पूर्वीच्या घरंदाज तरी आहेत. परंतु ही असेल फटकळ. भिकारडी कुत्री जास्तच भुंकतात. भुंक म्हणावे. भुंक, थुंक. काही कर. मी शांत राहीन; परंतु भिका-यांची कुत्री भाकरी पुढे करताच शांत होतात. हीच्यासमोर दागिन्याची रास ओतीन, शालूपैठण्यांची पेठ उघडीन. तुकडा पाहून कुत्री खूश, दागिने पाहून बायका खूश. त्या तिघींना मागतील ते दिले नसते, तर फाडून खाल्ले असते त्यांनी मला. घ्या, पाहिजे ते घ्या, परंतु गप्प बसा. स्वतः घ्या, माहेरी न्या. तोटा नाही. त्या तिघींनी आपली माहेरे भरली. भरोत बिचा-या, मी मरेपर्यंत इस्टेट पुरली म्हणजे झाले. या चवथीची सोन्यामोत्यांनी पूजा करीन होईल प्रसन्न. मग नाही अंगावर येणार धावून. पोपटाला पेरू, बायकांना दागिना, ब्राह्मणास दक्षिणा की खूष सर्व मंडळी. माझ्याजवळ शरीरबल नाही. मनोबल नाही; परंतु देवाने सर्वात श्रेष्ठ असे द्रव्यबल देऊन ठेवले आहे. या धनाने काय विकत घेता येत नाही. कवी, शिपायी, स्त्रिया सारे काही मिळविता येते. माझ्या हयातीपर्यंत हे द्रव्यबल पुरो, म्हणजे झाले.' असे विचार करीत हे वृध्द जहागिरदार पडले होते. इतक्यात दिवाणजी आले व लवून प्रणाम करून बसले.
वासुदेवराव : काय, झाली का तजवीज?
दिवाणजी : दहा हजार रोकड मिळणे कठीण. थोरल्या बाईसाबांनी मध्ये पाच हजार माहेरी पाठविले.
वासुदेवराव : 'नाही' हा शब्द मी मरेपर्यंत मला ऐकवू नका. कर्ज काढा, दहा हजार तर रोकडे मुलीच्या बापाला द्यावे लागतील. शिवाय दागदागिने सारे नवीन केले पाहिजेत. आणि इतरही खर्च का थोडा लागेल?
दिवाणजी : कर्ज वाढत जात आहे.
वासुदेवराव : त्याची तुम्हाला नको काळजी. आपल्या जहागिरीच्या मानाने हे कर्ज काहीच नाही. हत्तीला का मुंगीचा भार होतो? अहो, पुष्कळ कर्ज असणे हा श्रीमंतीचा एक पुरावा असतो, मोठमोठया राजांची कर्जेही मोठी असतात. दिल्ली हलवणारा प्रताप बाजीराव, परंतु त्यांची किल्ली सावकारांच्या हाती होती.
दिवाणजी : बरं, मी करतो व्यवस्था.
वासुदेवराव : आणि गणेशपंत वैद्यांना द्या ना पाठवून.
दिवाणजी : बरे.
दिवाणजी गेले. जहागिरदारांना एकदम इतका खोकला आला की, ते कावरेबावरे झाले. मरणच जवळ आले, असे त्यांना वाटले, परंतु थांबला एकदाचा खोकला. थोडी विश्रांती घेऊन ते उठले. त्यांनी खोकल्याच्या गुटिका काढल्या व दोन गोळया तोंडात टाकल्या. इतक्यात गणेशपंतही आले. नमस्कारचमत्कार झाले.
गणेशपंत : कशी आहे प्रकृती?
वासुदेवराव : खोकला तर रहात नाही. पायांनाही मुंग्या येतात. जरा सुजल्यासारखेही वाटतात. परंतु खोकला फारच सतावतो. सा-या बरगडया दुखवतात अगदी. क्षयावर जाणार काही दुखणे? भलभलत्या कल्पना मनात येतात. गणेशपंत, लग्न लागण्याच्या वेळेत तरी खोकला येणार नाही इतके करा. दोन तास खोकला थांबवा. तुम्ही मागाल ते धन देईन. नाही तर तेथे पाटावरच जीव गुदमरायचा. कशाने हो उसळतो हा खोकला? म्हातरपणामुळे का?