सती 21
''आई, का ग रहात नाही आज बाळ?''
''दृष्ट झाली बहुधा त्याला?''
''कोणा पाप्याची दृष्ट?''
''मी तरी काय सांगू?''
''आज कोण आले होते आपल्याकडे? तू गेली होतीस कोठे बाहेर?''
''नाही ग. कोठेसुध्दा गेले नाही. दुपारी आज ते मधुकरी मागायला आले होते. बाळाकडे ते पहात होते.''
''त्यांची नाही पडणार दृष्ट. त्यांचे डोळे प्रेम आहेत. त्यांच्याच डोळयांवर कोणाची तरी दृष्ट पडायची. त्या शंकराच्या देवळात ते राहतात. देवाजवळ राहतात.''
''त्यांच्याजवळून अंगारा तरी आण. म्हणावे, म्हणा एखादा मंत्र व द्या मंतरून राख.''
''खरेच का जाऊ?''
''जा. रडे याचे थांबत नाही. करू तरी काय?''
बाहेर अंधार पडू लागला होता. मैना निघाली. थोडी रक्षा घेऊन निघाली. झपझप पावले टाकीत ती जात होती. ती शिवालयात आली. आसनावर गोपाळ ध्यानस्थ बसला होता. मैना प्रथम गंभीरपणे तेथे उभी राहिली. नंतर तिला हसू आले. राख एका पानावर ठेवून तिने त्याचे डोळे झाकले. तो भानावर आला.
''काय पण समाधी! कशाला ही सोंगे?'' ती म्हणाली.
''प्रयत्न करीत राहणे मानवाचे काम.''
''चालू द्या प्रयत्न.''
''तू काय करीत होतीस?''
''तुमच्या कपाळाला भस्म लावीत होते. वासनाविकारांचे भस्म. हे पहा माझे हात. खरे ना आहे भस्म?''
''तू आता कोठे इकडे आलीस?''
''घाबरलात वाटते?''
''मैने, जग मोठे नाठाळ आहे.''
''जग भित्र्याला भिवविते, भिवविणा-याला भिते.''
''सांग ना का आलीस?''
''येथे देवाजवळ बसण्यासाठी, देवाजवळ राहण्यासाठी.''
''घरी काय म्हणतील?''
''मी घर सोडले आहे!''
''मैने!''
''काय?''
''थट्टा पुरे. सायंकाळी थट्टा करू नये. ही संध्येची, प्रार्थनेची वेळ.''