Get it on Google Play
Download on the App Store

सती 22

''मी करू प्रार्थना?''
''कर.''
''कोणाची करू?''
''देवा-महादेवाची.''

''कोठे आहे देव? कोठे आहे महादेव?''
''सर्वत्र आहे.''
''मला तर एके ठिकाणी फक्त दिसतो.''
''कोठे?''
''हा माझ्यासमोर!''

''मैने!''
''काय?''
''घरी जा आता. बाळ रडत असेल. आई हाका मारील. बाबा रागावतील.''

''बाळ रडत आहे, म्हणून तर आले आहे. आईनेच पाठवले आहे. बाळाचे रडे थांबत नाही. आई घाबरून गेली आहे. तुम्हांला येतो का मंत्र? देता का मंतरून राख?''

''आण राख, देतो मंत्रून.''
''त्याने राख हातात घेतली. त्याने मनाची एकाग्रता केली. त्या अंधुक प्रकाशात मैनेला गोपाळाचे तोंड नीट दिसेना; परंतु हळूहळू अंधारातही तिला दिसू लागले. ती त्याच्याकडे पहात होती.''

''हा घे अंगारा. बाळ रडायचा थांबेल. थांबलाही असेल. जा, घरी जा. जपून जा.'' तो म्हणाला.

''आज मला पोचवायला नाही का येत?''

''येऊ का?''

''नको. मी जाईन एकटी.''

''थांब येतो.''
''येथे रात्री दिवा का नाही लावीत? अंधारात भुतासारखे बसणे बरे नव्हे.''
''प्रकाशात आपण कोणाला दिसलो असतो.''

''त्यात कसली भीती? मी का चोरून आले आहे?''
''मला नाही दिवा आवडत. दिव्यामुळे ध्यानात व्यत्यय येतो. अंत:करणात ज्ञानाचा दिवा लावू पाहणा-यास बाहेरचे दिवे मालवावे लागतात. ही आली नदी. जा आता.''

''माझा हात धरून मला पलीकडे न्या. पाण्याला आज ओढ आहे, खळखळाट आहे. मघापेक्षा पाणी वाढलेले दिसत आहे. कोठे तरी वरती पाऊस पडला बहुधा. धरा माझा हात. भिऊ नका.''

''तू पाण्याला भितेस, मी लोकांना भितो. दोघे भित्री.''

''भर पुरात उडी घेणारी मी, तुम्हाला माहीत नाही. मी पाण्याला भीत नाही, मरणाला भीत नाही. मी मरणाला भिते असे तुम्हाला वाटते?''