सती 26
''एका श्रीमंत वृध्दाशी.''
''काय?''
''ऐक मैने! एका श्रीमंत वृध्दाला मैना विकली जाणार आहे. ही मैना श्रीमंताच्या पिंज-यात पडणार आहे. सारे लोक बोलत आहेत!''
''सारे लोक बोलतात, परंतु मी ऐकली नाही. माझे बाबा असे कसे करतील? तुम्ही या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवलात? माझे बाबा इतके हीन वृत्तीचे असतील, असे कठोर असतील, असे तुम्हास वाटले? माझ्या बाबांच्या ठिकाणी ही शक्यता तुम्हास वाटली? माझ्या बाबांची मी मुलगी. माझाही तर मग तुम्हास तिटकारा आला असेल. कडू वेलाला कडू फळे. तुम्ही माझ्या बाबांना मनात धिक्कारले असेल?''
''नाही, मी धिक्कारले नाही. मैने, कोणी कोणाचा तिरस्कार करावा. निर्दोष कोण आहे? मी तरी स्वत: केवळ पवित्र असा आहे का? माझ्या जीवनावर का थोडे मळ आहेत? जगात कोणी कोणाला तुच्छ लेखण्याचे कारण नाही. सर्व एक दिवस वर जातील. सर्वांचा उध्दार होईल. शिडी चढून सारी जातील. मैने, पापालाही कधी कधी प्रमाण करावा, असे मला वाटते. पापाला मिठी मारावी, पापाला पुजावे, असे मला वाटते-''
''काय म्हणता तुम्ही? कोणाच्या तोंडून ऐकते हे मी?''
''मैने, घाबरू नकोस. आपण शेतात खत घालतो. ते खत म्हणजे घाणच नाही का?''
''हो. सारे सडलेले कुजलेले म्हणजेच खत.''
''शेतात हे खताचे ढीग ओतल्याशिवाय सोन्यासारखे पीक येतच नाही. जीवनाची शेती पिकवायलाही खत हवे. आपली पापे म्हणजे खत. पापांच्या राशीतून मला पुणचा अंकुर वर येताना दिसतो. पापातून पावित्र्य वर येत आहे, असे मला दिसते. मैने, तुझ्या वडिलांना मी का म्हणून तुच्छ मानू? मला काय अधिकार?''
''तुमचा माझ्यावर अधिकार आहे, म्हणून माझ्या वडिलांवर रागावण्याचाही अधिकार आहे.''
मैना घरी आली. धोंडभटजी खाटेवर बसले होते. जवळ जयंत झोपला होता. ते विचारात मग्न होते. त्यांच्या मनात कसला तरी झगडा चालला होता.
धर्माधर्माचा झगडा. 'मुलीचे पैसे घ्यावे की न घ्यावे? काय हरकत आहे घेतले म्हणून! कसले पाप नि काय? या कलियुगात सारे क्षम्य आहे. सरकार, सावकार, राजेमहाराजे, जमीनदार - जहागिरदार, सारे का न्यायाने पैसा मिळतात? कोणी ठेवतो का त्यांना नावे? मोठयांनी काही केले तरी ते चालतेण तेच गरिबांनी केले, तर सारे जग त्यांना खायला उठते. माझी मुलगी. मैनेला म्हणतात मी विकणार ! आणि हे आपापल्या मुलांचे हुंडे घेतात, तेव्हा आपल्या मुलांना नाही का विकीत? मुलांचे पैदे घेता, मग मुलीचे घेतले म्हणून काय झाले? मला वाटत होते पूर्वी की, मैना ब्रह्मवादिनी होईल; परंतु ते नाही तिचे लक्षण. प्रेमाच्या पाशात तीही गुंतत चालली आहे. त्या भिकारडया गोपाळाच्या नादी ती लागली आहे. त्या गोसावडयालाही लाज नाही वाटत. मैना जर ब्रह्मवादिनी होणार नसेल, तर ती श्रीमंताची राणी होईल. ती एक तर परब्रह्माला माळ घालील, किंवा कुबेराला माळ घालील. भिकारडयास ती मिळणार नाही.
'आणि हा जयंत! म्हतारपणी हा देवाने मला दिला. किती सुंदर आहे बाळ! याची व्यवस्था कशी लावायची? आम्ही पिकली पाने झाली. या जयंताला कोण? या जगात कोण कोणाचे नाही. पैसा एक सत्य आहे. जग पैशाला ओळखते. जयंतासाठी शेतीवाडी करून ठेवली पाहिजे. मैनेचे पैसे तिच्या भावासाठी होतील. कसा झोपला आहे. निश्चित. आपले आईबाप आपणास किती दिवस पुरतील, ही आहे का याला चिंता?'