सती 46
मायलेकी निघाल्या. मैना हसत होती. तिने आपल्या कानात फुले घातली. केसातून गुंफली. मैना जणू वनदेवता दिसत होती. वाटेत धोंडभटजी भेटले.''
''फुले आणायला गेली होती. फुलवेडी पोर.'' सावित्रीबाई म्हणाल्या.
''परंतु मैने, आता एकटे नाही जायचे, बरोबर दासदासी घ्याव्या. आता तू श्रीमंताची राणी आहेस. आता स्वत: जायला नको फुले तोडण्यासाठी. नोकराचाकरांस सांगावे. मैने, आता भिकारणीप्रमाणे नको वागूस. आता श्रीमंतांस साजेशी वाग. पतीला लाज वाटेल असे करू नकोस. त्यांच्या इतमामास कमीपणा येईल, असे काही करू नकोस. ते दागदागिने सारे काढूनसे ठेवलेस? नट, हिरेमाणकांनी नट. सोन्यामोत्यांनी सज. मैने, तुझे भाग्य मोठे म्हणून असे मोठे खानदानी घराणे तुला मिळाले.'' धोंडभटजी बोलत होते.
''खरेच, मी किती भाग्यवान. मुरलीधराची केलेले पूजा फुकट नाही गेली. त्याला मनापासून माळा घालीत असे, म्हणून श्रीमंत पतीच्या गळयात मला माळ घालता आली. बाबा, मी नीट वागेन. मी का आता लहान आहे? तुम्ही चिंता नका करू. घरी जयंत रडत असेल. चला भराभरा जाऊ.'' मैना म्हणाली.
''जयंत कसा आहे देखणा! अलीकडे तो रडतही नाही. आपली ताई आता जाणार, मग कोण घडीघडी खेळवणार, म्हणून जणू तो न रडण्याची सवय करीत आहे. मैने भावाला विसरू नकोस हो.'' धोंडभटजी म्हणाले.
सारी घरी आली. मैना फुलांसाठी गेली होती; असे सर्वांना कळले. मैनेने सुंदर हार केला. ती मुरलीधराच्या देवळात गेली. त्या मनोहर मूर्तीला तिने तो हार घातला. तिने प्रार्थना केली. डोळे मिटून प्रार्थना केली. काय तिने मागितले त्या प्रार्थनेत? कोणते नवस तिने केले? तिने का मूलबाळ मागितले? तिने का जयंताला उदंड आयुष्य मागितले? तिने गोपाळ सुखी असो, अशी का मागणी केली? काय मागितले तिने देवाजवळ? जीवन मागितले की मरण? संपत्ती मागितली की विपत्ती? तिची मुकी प्रार्थना होती. त्या प्रार्थनेतील भावार्थ तिच्या हृदयाला माहीत व मुरलीधराला माहीत.
मैनेची सासरी जाण्याची तयारी झाली. तिने जयंताला आज भरवले. ती त्याला सारखी नाचवीत होती, खेळवीत होती. जणू पुन्हा त्यांची भेट व्हायची नव्हती. मैना आईबापांच्या पाया पडली.
''तुला लवकरच परत आणू,'' आई म्हणाली.
मातेच्या डोळयांतून पाणी आले. मैनाच आईची समजूत घालू लागली.
''आई, रडू नको. चिंता करू नको. मैनेच्या सुखाला तोटा नाही. लवकर माहेरी परत यायला मी का लहान आहे? नवीन संसार थाटाचा सुरू होऊ दे. मग पुढे येईन वेळ येईल तेव्हा. जयंताला सांभाळा. बाबा, मैनेवर रागावू नका. तिला आशिर्वाद द्या. मैना आता शहाणी झाली आहे.''
धोंडभटजी म्हणाले, ''शहाणी आहेसच तू. नीट वाग.''
मेणा तयार झाला. सुंदर होता मेणा. भोयांनी उचलला. पुढेमागे घोडेस्वार होते. दुस-या एका मेण्यात नवरदेव वासुदेवराव बसले. त्यांचा मेणा पुढे झाला. मागून मैनेचा चालू झाला. सारंगगावातील घरातून बायकामाणसे पहात होती. ''चालली मैना, श्रीमंताचे घरी राज्य करायला चालली. माहेराला आधार होईल.'' वगैरे बोलणी बायकांची चालली होती.
धोंडभटजी पोचवून परत आले. सावित्रीबाई रडणा-या जयंताला घेऊन बसल्या होत्या. धोंडभटजीही तेथे बसले.
''उगी जयंता. येईल हो ताई.'' आई समजावीत होती.
''भारीच तिचे याला वेड.'' धोंडभटजी म्हणाले.