Get it on Google Play
Download on the App Store

सती 18

गोपाळ रोज पहाट होताच मैनेची वाट पाही. पाखरे किलबिल करीत; परंतु मैना दिसत नसे. सायंकाळी श्रोते मंडळींतही मैना दिसेना. गोपाळाचे प्रवचनही रंगेना. प्रवचनाला मंडळीही कमी कमी येऊ लागली. पूर ओसरला. गोपाळाला सुनेसुने वाटे.

त्या दिवशी ती दुपारची वेळ होती. बाहेर कडक ऊन पडले होते. गोपाळ बकुळीच्या झाडाखाली निजला होता. वारा त्याला वारा घालीत होता. पक्षी झाडावर शांतपणे होते. उन्हाने जणू ते थकून गेले होते. इतक्यात त्यांची किलबिल सुरू झाली. कोणाला त्यांनी पाहिले, कोण ते आले? तेथे मैना आली होती. झाडाच्या आडून ती गोपाळाकडे बघत होती. पाखरांनी मैनेचे स्वागत केले. त्यांनी गोपाळाला साद घातली; परंतु तो जागा झाला नाही. मैनेने हळूच गोपाळाच्या तोंडावर फुले फेकली. तो जागा झाला. परंतु पुन्हा तो झोपला. मैनेला लौकर घरी जायचे होते. तिला वेळ नव्हता. ती गाणे म्हणू लागली.

हृदय देवा, होई जागा॥धृ.॥
बघ रे अश्रु, नको रे रुसू
माझ्या राजा, सोडी रागा॥हृ.॥
प्रेम तू घेई प्रेम तू देई
तोडू नको आशा-धागा॥हृ.॥
जीवनाचे वन रुक्ष भीषण
वसंत तू फुलवि बागा॥हृ.॥

मैनेचा हृदयदेव जागा होऊन तिच्यासमोर उभा होता; परंतु आता तिने डोळे मिटले होते. गाणे गाता गाता जणू ती तन्मय झाली होती. संपले एकदाचे ते गाणे. तिने पाहिले, डोळे उघडून पाहिले. दोघे मधुर मधुर हसली.

''बसा ना. उभे का?'' ती म्हणाली.

''मी मनात म्हटलं की तू बहुधा कंटाळलीस. तुझ्यासाठी मी रोज फुले तोडून ठेवीत असे. मग नदीपर्यंत आणून मी ती नदीत सोडून देत असे. विचार तू त्या नदीला, हे खरे की खोटे.''

''मग माझ्या घरी का ती तुम्ही आणली नाहीत?''

''मला काय माहीत तुझे घर?''

''कोणीही सांगितले असते. मैनेचे घर सर्वांना माहीत आहे. मग का नाही आलात?''

''लोक हसतील म्हणून.''

''तुमचे प्रेम भितरे आहे एकूण. मला नाही का हसत लोक? माझे प्रेम निर्भय आहे, म्हणूनच ते निर्मळ आहे.''

''जगात जपून रहावे लागते.''

''मला नाही आवडत असे लपवालपवीचे वागणे. ती पहा कुत्री खेळत आहेत. धरू का मीही तुम्हांला हृदयापाशी? घट्ट धरू?''

''मैने, वेडी आहेस तू. माणसे म्हणजे का कुत्री! माणसाने संयमी झाली पाहिजे. जरा धीराने घे.''

''मला नाही धीर. आज आले धावून.''

''इतके दिवस का नाही आलीस?''