Get it on Google Play
Download on the App Store

सती 5

''आई, बाबा सांगतात की देव सर्वत्र आहे. पुराणातील ते का खोटे? देव जर सर्वत्र आहे तर भीती कशाची? आणि वाईट काही झाले तरी तेही कदाचित चांगल्यासाठीच असेल, असे नाही तुला वाटत? मला तर त्या पडक्या शिवायलयात मौज वाटते. तेथे माझे मन रमते. तेथे एक प्रकारचा विशेष आनंद होतो. मला त्या शिवालयाची स्वप्ने पडतात. कोणी तरी मला ''मैने, मैने, इकडे ये, या शिवालयात ये,'' असे जणू बोलावीत असते. मुरलीधराच्या मंदिरात सुंदर चित्रे आहेत. मुरलीधराची मूर्ती गोड गोजिरवाणी आहे. त्या मूर्तीच्या अंगावर मोलाच्या माणिकमोत्यांचे दागिने आहेत. मंदिराचा सोन्याचा कळस पवित्र आत्म्याप्रमाणे जणू झळकत असतो. परंतु असे हे मंदिर त्या पडक्या शिवालयापुढे मला फिके वाटते. शंकराच्या जटेतील एका केसाचे वजन कुबेराच्या सर्व संपत्तीहून अधिक भरले, ती गोष्ट खरी आहे. माझ्या तरी ती अनुभवास येत आहे.'' मैना म्हणाली.

''मैने, तू माझे ऐक. त्या शिवालयात एकटी जाऊ नकोस.''

''दुसरे कोण येणार माझ्याबरोबर?''

''तू दुसरीकडे कोठेही जा. पण तेथे नको.''

''दुसरीकडे माझा आत्मा रमत नाही. पडक्या देवळातील महादेव मला आवडतो. स्मशानातील मृत्युंजय मला आवडतो.''

सावित्रीबाईंस मैनेची काळजी वाटू लागली. पोरीचे पुढे काय होणार ते त्यांना कळेना. तिचे लग्न करून टाका, असे ती पतीला सांगे. परंतु धोंडभटजी ऐकायलाही तयार नसत. ''तुझी मुलगी ब्रह्मवादिनी होईल. ती सहस्त्र पिढयांचा उध्दार करील.  तू काळजी करू नकोस.'' असे ते म्हणत.

''ब्रह्मवादिनी का संसारात नसतात? सीता, सावित्री, द्रौपदी व अरुंधती ह्या का ब्रह्मवादिनी नव्हत्या?'' सावित्रीबाई पतीला विचारीत.

''तुझ्याजवळ बोलण्यात अर्थ नाही.'' धोंडभटजी म्हणत.

एकदा धोंडभटजी आजारी पडले. धोंडभटजींच्या आजारीपणात पुराण कोण सांगणार? अशा वेळी गावातील कोणी तरी श्लोक अर्धा श्लोक वाचून खंड पडू देत नसत. परंतु या वेळी निराळीच गोष्ट झाली. मैना रोज पुराण सांगू लागली. गावक-यांना ती गोष्ट आवडली. पुराणाला स्त्रीपुरुषांची गर्दी जमू लागली. व्यासपीठावर मैना गंभीरपणे बसे व गहन तत्त्वांचे विवरण करी. जणू बालसरस्वतीच तिच्या रूपाने अवतरली आहे.

धोंडभटजीस अद्याप बरे वाटत नव्हते. परंतु आपल्या मुलीचे पुराण त्यांना ऐकावयाचे होते. मैनेचा हात धरून ते देवळात गेले. खांबाला टेकून बसले. मैनेने पोथी सोडली. तिची वाणी सुरू झाली. धोंडभटजींच्या डोळयांतून आनंदाश्रू आले. त्यांना धन्य वाटले, कृतार्थ वाटले. पुराण संपल्यावर मेनेने पित्याच्या चरणावर मस्तक ठेविले. पित्याने तिला हृदयाशी धरून तिच्या पाठीवरून वात्सल्याने हात फिरविला. ''खरोखर तू ब्रह्मवादिनी होशील. सहस्र पिढया उध्दरशील.'' धोंडभटजी सद्गदित होऊन म्हणाले.

मैनेचे पुराण सांगणे आज संपणार होते. उद्यापासून पुनरपि धोंडभटजी सांगणार होते. अनेक स्त्रीपुरुषांनी मैनेला आज देणग्या दिल्या. कोणी खण दिले, पाटावे दिली; कोणी अलंकार दिले, कोणी साधी फुले दिली. मैनेने प्रेमाने व कृतज्ञतेने सर्व वस्तूंचा स्वीकार केला. परंतु समाप्तीचे वेळेस ती म्हणाली, ''खरे सांगू का, मला या वस्त्रालंकारांची आवड नाही. कशाला ही पाटावे? कशाला ह्या सुवर्णमाळा! ह्या वस्तूंनी आत्मा चिरडला जातो. ह्या वस्तूंनी आत्म्याची विस्मृती पडते. मला फक्त फुले आवडतात. निर्मळ सुगंधी फुले. या बाकीच्या वस्तू आहेत सुंदर. परंतु त्यांना सुगंध नाही. गोपालकृष्णाला वनमाला आवडे. कौस्तुममणी फार आवडत असे. तुम्ही प्रेमाने या वस्तू मला दिल्यात याबद्दल मी ऋणी आहे. तुमच्या आशीर्वादाने माझे जीवन निर्मळ राहो, ते देवाचे होवो, गोपाळकृष्णाचे, या मुरलीधराचे होवो.''