सती 28
मोरशास्त्री : हीच आपली कन्या वाटते?
धोंडभटजी : हो.
मोरशास्त्री : बरीच मोठी आहे?
विष्णुपंत : अहो, कधीच लग्न केले पाहिजे होते. जगाच्या विपरीतच धोंडभटजी वागले. एव्हाना दोन मुलांची आई झाली असती.
श्रीधरभट : एकुलती मुलगी. घरातून दूर करणे जिवावर येई त्यांच्याशिवाय हुशार होती. सारी शास्त्रे जणू तिच्या मुखावर. धोंडभटजी म्हणत, मैना ब्रह्मवादिनी होईल; परंतु कलियुगात कोठली शक्यता! असो. आता मुलगाही यांना झाला आहे. म्हातारपणी करमणूक मिळाली आहे. मैना सासरी गेली, तरी यांना आता सुनेसुने वाटणार नाही. वर्षाचा झाला का हो मुलगा?
धोंडभटजी : दीड वर्षाचा झाला.
इतक्यात मैना सुपारी घेऊन आली.
धोंडभटजी : मैने, यांना नमस्कार कर. थोरामोठयांचा आशीर्वाद घ्यावा. आधी यांना कर. हे मोरशास्त्री. हे आपले श्रीधरभट व हे विष्णुपंत तुझ्या आहेतच ओळखीचे.
मैना नमस्कार करून 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद घेऊन आत झटकन निघून गेली. बाहेर बोलणी सुरू झाली.
विष्णुपंत : काय धोंडभटजी, मग केलात का विचार?
धोंडभटजी : यांचा नक्की आकडा काय?
मोरशास्त्री : आता फिरून फिरून काय सांगायचे ? माझ्या गावचा जहागिरदार पाच हजार रुपये देण्यास तयार आहे. त्यांनी मध्यस्थी म्हणून मला देऊ केलेली पाचशे रुपयांची रक्कम तीही मी तुम्हाला देतो. म्हणजे झाले? मी काही पैसे मिळविण्यासाठी या भानगडीत पडलो नाही. आपल्या गावचा जहागिरदार आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा मरण पावला. पुढे कोण? झाले मुलबाळ तर घर चालेल. नाही तर शेवटी दत्तक आहेच; परंतु दत्तकांनी घराण्याचा मोठेपणा वाटत नाही. औरस संतती असली, तर तिला थोडे तरी वाटते. घराणे मोठे आहे, ते चालावे, असे वाटते. मोठे झाड हजारो पक्ष्यांना आश्रय देते. ते मरू देऊ नये. त्याप्रमाणेच मोठे खानदानी घराणे नष्ट होऊ देऊ नये. अनेकांची पोटे भरतात. अनेकांना आधार होतो. यासाठी माझी आटाआटी, ही पवित्र गोष्ट सिध्दीस जावी, म्हणून तळमळच हजार व हे वर आणखी पाचशे. आता नाही म्हणू नका.
श्रीधरभटजी धोंडभटजी, मला वाटते की, आता तुम्ही ओढून धरू नये. मुलगीही फार मोठी झाली. सारा गाव नावे ठेवितो. फार ताणून धरल्याने तुटते. पाच हजार रुपये थोडे नाहीत. उद्योगधंदे बसत चालले. तलवारी नाहीशी झाल्या घोडेस्वार गुप्त झाले. सर्वत्र अवकळा येत आहे. नवीन राज्य पसरत आहे. अशा उतरत्या काळात पाच हजार रुपये फार झाले.
विष्णुपंत आणि घराणेही कुलीन आहे. पहिल्या बायका नाहीत. जमीनदार वयानेही फार नाहीत. पन्नाशी नुकती उलटली आहे म्हणतात. रोज घोडयावर बसून स्वारी - शिकारीस जातात. जुने, कसलेले, खालेप्यालेले शरीर, तेजस्वी दिसतात.
धोंडभटजी : परंतु त्या शेगावकरांचे काय उत्तर येते, ते पाहू आणि त्या बाबतीत राघेगोविंद महाराजांनी स्वतः मध्यस्थी चालविली आहे.
मोरशास्त्री : अहो, कसले महाराज नि काय? सारा व्याभिचार माजवला आहे बेटयांनी.
श्रीधरभट : तसे पाहिले तर धर्म उरला आहे तरी कोठे? धर्म जगात नाही. जगात एक अर्थ व दुसरा काम - या दोनच वस्तू असतात.
विष्णुपंत : काय धोंडभटजी, विचार करा, हे स्थळ गमावू नका. शेगावकर जहागीरदार मला माहीत आहेत. त्यांच्या पहिल्या तीन बायका जिवंत आहेत. एकीसही मूलबाळ नाही. लाखो रुपये मिळाले, तरी तेथे सोन्यासारखी पोरगी देणे नको. त्यांची इस्टेट मोठी आहे. ही गोष्ट खरी; परंतु केवळ इस्टेट काय चाटायची आहे? इतरही मुलीचे सुख पाहायला हवे.