सती 10
दोघी जणी घरी निघाला. लगबगा जात होत्या.
''अगं, इंदू साप साप!'' असे म्हणून मैनेने एकदम इंदूला ओढले.
अस्सल दहाचा आकडा असलेला सर्प फणा करून तेथे उभा राहिला. दोघींनी क्षणभर डोळे मिटले. फण् करून सर्प निघून गेला.
''इंदू, आपण वाचलो.''
''जीवनाचा कंटाळा येतो; परंतु मरण समोर आले, तर आपण डोळे मिटून घेतो. किती ही आसक्ती, किती ही संसाराची ओढ! मैने, माणसापेक्षा सर्प एकंदरीत भला. आपण डोळे मिटताच तो निघून गेला. परंतु आपण भीतीने डोळे मिटले, वीट येऊन डोळे मिटले, तरी मनुष्यरूपी साप विळखा घातल्याशिवाय राहात नाही.''
''चल लौकर. तुझा गोविंदा रडत असेल.''
''मैने, तो बघ सुंदर दगड. कसा आहे छान!''
''खरेच. किती हे रंग.'' असे म्हणून मैनेने तो उचलून घेतला.
दोघी आता गावात शिरल्या. तिन्हीसांजा होत आल्या होत्या. इतक्यात एका पाणचट माणसाने मैनेला फुले मारली. नागिणीप्रमाणे तिने मागे पाहिले. हातातील तो रंगीत दगड तिने फणकन् मारला. तो वात्रट मनुष्य मटकन् खाली बसला. त्याच्या कपाळातून रक्त निघत होते. तो मनुष्य संतापून त्या मुलीच्या अंगावर दुखावलेल्या सर्पाप्रमाणे धावणार, इतक्यात त्याला इतरांनी धरून ठेवले. तेथे गर्दी जमली.
''शाबास पोरीची! हातात दगड घेऊनच जाते की काय?''
''फुले हातात घेऊन जाणारी फुलपाखरे ज्या समाजात वावरतात, त्या समाजात मुलींनी हातात दगड घेऊन वावरलेच पाहिजे.''
''कोणाची ती मुलगी?''
''अहो, त्या श्यामभाऊंची ती नात. आजोळी आली आहे.''
''ती ब्रह्मवादिनी होणारी म्हणून आपण ऐकत होतो ना मुलगी, तीच ती.''
''आहे खरी तेजस्वी.''
''अहो, कसली ब्रह्मवादिनी नि काय? ब्रह्मवादिनीने दगड नसता मारला. जिच्या मनात इतका राग आहे. तिच्या मनात अनुरागही असणार. कामक्रोध हे सोबती आहेत. एकाजवळ दुसरा आहेच.''
''अहो, ब्रह्मर्षींनाही राग नसे का येत?''
''आणि ते ऋषिमुनी सुंदर स्त्री पाहताच लाळ नसत का घोटीत?''
''मनुष्य शेवटी अपूर्णच आहे.''
''या मातीच्या देहात परिपूर्णता मावणार नाही.''
''म्हणून का प्रयत्न नये करू?''
''जाऊ द्या हो फाफट चर्चा. आज रात्री तमाशा मग आहे की नाही?''
''आहे तर. मोठा सुंदर आहे तमाशा. नाच्या पो-या मोठा मारू आहे म्हणतात.''
''चला लौकर जेवणे आटपून जाऊ.''