सती 11
''मंडळी पांगली. तमाशाचे भक्त घरोघर गेले. मैना इंदूही घरी पोचल्या होत्या. त्या घरी पोचल्या नाहीत, तो त्यांच्यावर वीज कडकडली.''
''मैने, किती ग उशीर करायचा? काही काळ वेळ आहे की नाही? आणि इंदू, तुलाही कळत नाही का? त्या मैनेबरोबर जात जाऊ नकोस. तुला सासरी नांदायचे आहे. जगात राईचा पर्वत होतो. आज रस्त्यात काय झाला प्रकार? असले प्रकार करायचे असतील तर मैने येथे राहू नकोस. उगीच नाही आईबाप तिकडे कंटाळले.''
''पण मामा, मी काय केले? त्या चावट माणसाने फुले मारली मी त्याला दगड मारला. यात वाईट ते काय केले?''
''परंतु तुम्ही तिन्हीसांजा होऊन जाईतो बाहेर का राहिलात? रात्र पडू लागली, अंधार होऊ लागला की कोण पडतात बाहेर? उद्यापासून खबरदार घर सोडून बाहेर जाल तर!''
आज लौकर झाली जेवणे. इंदू व मैना हळूहळू बोलत होत्या.
''आज कोठे ग गेले सारे मामे?''
''आज म्हणे तमाशा आला आहे!''
''काय ग असते तमाशात?''
''तू नाही कधी पाहिलास!''
''मी कोठे पाहू?''
''अगं, माझ्या सासरी घरी मांडवातही करतात. नाच्यापो-या मुलगीसारखा सजतो. शृंगारिक गाणी म्हणतो. तमाशाला मोठमोठे येऊन बसतात. ते या नाच्या पो-याला मांडीवर काय घेतात, नाना प्रकार करतात आणि हे भाग्य मिळाले म्हणून त्या नाच्या पो-याला देणग्या देतात. त्याला दौलतजादा म्हणतात. जणू जादा झालेली दौलत अशा रीतीने उधळावयाची. किळसवाणे प्रकार!''
''आणि तू ते बघतेस?''
''अगं, समोर मांडवात करतात, तर लक्ष्य नाही का जाणार? त्या नदीतीराच्या पाखरांकडे तुझे ब्रह्मवादिनीचेही लक्ष गेले. मी तर बोलूनचालून संसारात बरबटलेली.''
''या पुरुषांना याची लाज नाही का वाटत? मुलांबाळांदेखत असले प्रकार करतात? आणि मोठमोठे प्रतिष्ठितही जाऊन बसतात!''
''जो जाईल तोच प्रतिष्ठित. जो जाणार नाही, त्याला नावे ठेवतात. कामशास्त्रातला पुरुषार्थ हाच एक आज पुरुषार्थ झाला आहे. दुसरे सारे पुरुषार्थ संपले. अगं, या गावात असे कितीतरी लोक आहेत की, ज्यांची अंगवस्त्रे आहेत. स्वत:च्या पत्नीशिवाय अशा स्त्रिया ठेवणे, हे श्रीमंतीचे, खानदानीचे व पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते. एक नानासाहेब म्हणून आहेत माझ्या सासरच्या गावी. ते आढयतेने म्हणत असतात की, ''कोण जाईल माझ्या दारावरून निसटून? सर्वांचा भोक्ता नारायण मी बसलो आहे.'' लोक त्यांचे म्हणणे ऐकून संतापत नाहीत. तर वाहवा करतात! मैने कशाला वाचतात हे रामायण? कशाला वाचतात गीता?''
''केलेल्या पापांचे भस्म होण्यासाठी. वाटेल ते पाप करावे व देवाचे र्तीर्थ घ्यावे. वाटेल ते पाप करावे व कपाळाला भस्म लावून त्या पापाचे भस्म करावे. सोपे उपाय. आपले पूर्वज एकंदरीत मोठे मुत्सद्दी. पापे कशी मोकळेपणे करावी व ती पचवावी. याचे सहसुंदर नियम त्यांनी सांगितले आहेत.''