सती 7
''जे आत आहे तेच बाहेर आहे. बाहेर आणखी काय निराळे आहे बाबा? आणि आकाशात का मधून मधून ढग येत नाहीत? मधून मधून ढग यावेत, मधून मधून स्वच्छ प्रकाश पडावा, यातच मौज आहे. बाबा, तुमच्या मैनेला एकांत तरी आवडतो, किंवा खूप स्वच्छंदी मोकळेपणा तरी आवडतो. तिला महापुरात पोहणे आवडते, नाही तर घरी स्वस्थ बसणे आवडते. ती झोक्यावर सर्वांहून अधिक उंच झोके घेईल, नाही तर मुळीच घेणार नाही. मिळमिळीत जीवन मैनेला नको. संपूर्ण संन्यास किंवा संपूर्ण रस. मैनेला मधली स्थिती नाही.''
''मैने, तू काही दिवस आजोळी जातेस?''
''का? तुम्ही मला कंटाळलेत वाटते? आईही हल्ली पुन्हा व्रतवैकल्ये करू लागली आहे. मुलगा व्हावा म्हणून तुम्हां दोघांना चिंता लागली आहे. बाबा, एक ब्रह्मवादिनी सहस्र कुळांचा उध्दार करील, असे तुम्हीच ना म्हणत असा?''
''परंतु ती ब्रह्मवादिनी होईलच याचा नेम काय?''
''खरे आहे. मैना उंच उडेल की खाली पडेल, काय सांगावे? मैनेचा चिमणा जीव आहे. मैना काही मानस सरोवरावर उड्डाण करणारी मरालिनी नाही. मैना काही आकाशाला मिठी मारणारी गरुडिनी नाही, चंडोलिनी नाही. बाबा तुमची मैना मातीची आहे. तिच्याने फार उंच नाही उडवणार. परंतु केव्हा तरी जीवनात क्षण येईल, ज्या वेळेस ही मातीची मैना मोक्षाला मिठी मारील.''
असे म्हणून मैना उठून गेली. देवाजवळ जाऊन ती गीतेचे श्लोक म्हणत बसली. पिता तसाच सचिंत बसला होता.
''मी इतकी वर्षे सांगत होते की, पोरीचे लग्न करावे. परंतु ऐकलेत नाही. पोरीला वेड लागणार. ब्रह्मवादिनी होण्याऐवजी निराळेच काही होणार.'' सावित्रीबाई म्हणाली.
''तिला तुझ्या माहेरी पाठविली तर काही दिवस?''
''तेथे तिला सारी नावे ठेवतील. केवढी वाढलीस हिडिंबा, असे म्हणतील. माहेरी जायला मला लाज वाटते. मैनेला पाठवावयालाही लाज वाटते.''
''हल्ली मैना खिन्न दिसते.''
''फुलेल दोन दिशी पुन्हा कळी. झाडांवर का नेहमी फुले असतात? जीवनाचा अर्थ कळू लागला म्हणजे माणूस जरा सचिंत होतो. मैना काही आता लहान नाही. तिच्याएवढया मुली माता होतात, संसार करू लागतात. मैना मनात झुरत असेल. तुम्हां पुरुषांना काही कळत नाही. मैना घराच्या बाहेर कशी पडेल? तिच्या मैत्रिणी सासरहून माहेरी येतात. स्वत:ची मुले कडेवर घेऊन देवळात येतात. त्या मैत्रिणीस भेटावयास मैनेला लाज वाटते. तिला तिचा जीवनाचा मळा रिकामा दिसतो. का नाही होणार खिन्न? क्षणभर तुमच्या ब्रम्हाचे चिंतन ती करते. क्षणभर ती प्रसन्नपणे हसते. परंतु पुन्हा सचिंत होते. तुम्ही तिचे लग्न करून टाका.''
''मैना सासरी गेल्यावर हे घर ओके ओके वाटेल. मैनेशिवाय हे घर म्हणजे स्मशान. मैना दूर जावी असे मला नाही वाटत.''
''तुमच्या समाधानासाठी तिच्या आयुष्याचे का मातेरे करणार? करते आहे मी व्रतेवैकल्ये. सूर्यनारायणाची उपासना करीत आहे, पिंपळालाप्रदक्षिणा घालीत आहे. देवाने दिला मुलगा तर घर स्मशानाप्रमाणे न होता नंदनवन होईल. परंतु ते आपल्या हाती नाही. माझे तुम्ही आपले ऐका. मैनेचे लवकर लग्न करून टाका.''