सती 38
आता तो उदास होऊन बसला होता. मध्येच त्याच्या डोळयांतून अगतिकत्वाचे दोन अश्रूही येत. त्याला आज सारी सृष्टी भयाण वाटत होती. एक सुंदर पक्षी समोर बसला होता. गोपाळाने त्याला दगड मारला. जणू तो पक्षी आपणांस चिडवीत आहे, असे त्याला वाटले. बागेतील सारी फुले कुस्करून टाकावी, असे त्याला वाटले. तो गेलाही तसे करायला; परंतु ती फुले त्याच्याने कुस्करवेनात. तो फुलांकडे पहात राहिला. त्या फुलांनीच प्रथम मैनेची त्याला ओळख करून दिली. त्या फुलांसाठी ती येऊ लागली. ती फुलांसाठी येई का माझे प्रेम मिळावे म्हणून येई? फुलांचे निमित्त होते. माझ्या हृदयात प्रेम फुलावे म्हणून ती येई. रोज उजाडत येई. प्रेमाचे फूल फुलले का ते ती पाही. आपण मैनेची परडी कशी भरून देत असू, एके दिवशी ती येथील पाय-यांवर बसली असता तिची आपण फुलांनी पूजा कशी केली, फुले तोडताना एकमेकांचे हात एकमेकांस लागून सर्व शरीरावर रोमांचाची फुले कशी एकदम फुलत, चेहरे कसे भरकन् भावनोन्मत्त होत, सारे त्याला आठवले. ज्या फुलांना चुरगाळून टाकण्यासाठी तो आला, ज्यांचा चोळामोळा करावा म्हणून तो आला, ती फुले त्याला प्रेमकथा सांगू लागली. बारीकसारीक शेकडो प्रसंग. आणि ते पहिल्या सायंकाळी दिलेले निशिगंधाचे फूल! गोपाळ तेथे फुलांजवळ उभा राहिला. किती तरी वेळ झाला. तो हलेना, तेथून जाईना. जणू त्याची प्रेमसमाधी लागली होती.
आणि मैना येऊन तेथे उभी राहिली होती. ती आपल्या प्रियकराकडे पहात होती. त्याची ती प्रेमविव्हळ स्थिती पाहून तिला अतोनात दु:ख झाले. ती फुले! मैनेलाही शेकडो स्मृती दिसू लागल्या. तीही भावमत्त झाली. दोघे एकमेकांकडे न पाहता फुलांकडे पहात उभी होती.
आकाशात अकस्मात ढग जमा झाले. काळे काळे ढग. पाऊस का येणार? अकाली पाऊस. या वेळेस कशाला पाऊस? तो पहा मोर ओरडत आहे. केकारव कानी येत आहे. वरून पाण्याचे दोन थेंब पडले, गोपाळाच्या डोक्यावर पडले. त्याने वर पाहिले. आणि मग शेजारी पाहिले. तो एकदम मैनेला धरण्यासाठी पुढे झाला. ती दूर झाली.
''दूर का होतेस, दूर का जातेस?'' गोपाळ म्हणाला.
''मला आता दूरच जायचे आहे, दूर रहायचे आहे.''
''तू दूर जायला तयार आहेस?''
''मला स्वातंत्र्य नाही. मी बांधलेली गाय आहे.''
''बांधलेली गाय येथे कशी आली?''
''गाय थोडा वेळ मोकळी असते, परंतु जर तिला घरी जायला उशीर झाला, तर तिला शोधीत येतील, तिला हाणीत मारीत घरी नेतील. बळकट दाव्याने बांधून ठेवतील.''
''मैने, तू दुष्ट आहेस.''
''काही म्हणा.''
''मैने, तू जाऊ नकोस. मी तुला जाऊ देणार नाही. तुला धरून ठेवीन. तू लहान हो, या डोळयांत तुला लपवून ठेवीन.''
''असे काय वेडयासारखे बोलता? आज तुमचा संयम कोठे गेला, धीरगंभीर वृत्ती कोठे गेली? मर्यादा हे आपल्या धर्माचे प्राभूत तत्त्व. ती मर्यादा आपण सांभाळली पाहिजे. तुम्हीच ना पूर्वी असे सांगत असा? समुद्र कितीही उचंबळला, तरी मर्यादा सोडीत नाही. तुम्हांला आज काय झाले? इतर काही झाले तरी तुम्ही स्वत:ला कलंक लावून घेऊ नका. तुम्ही निर्दोष व निष्कलंक असावे, असे मला वाटते. तुम्ही माझ्या जीवनाच्या आकाशातील चंद्र, निर्दोष पूर्ण चंद्र. तुम्हाला डाग न लागो, मी तुमची मनात पूजा करीन. एकटी असले म्हणजे पूजा करीन. मानसपूजा करीन. माझा देह दुस-याचा आहे. माझा आत्मा माझा आहे. तुम्हाला माझा आत्मा पाहिजे की ही वरची पांढरी माती पाहिजे? आपण आत्म्यावर प्रेम करायला शिकू या. मी तुमचा आत्मा पूजीन, तुम्ही माझा. तुमची चिन्मय मूर्ती माझ्या हृदयात मी ठेविली आहे. किती सुंदर आहे ती! ती सदैव माझ्याजवळ आहे. ती कोणी नेणार नाही. ती जीर्ण शीर्ण होणार नाही. ती सदैव घवघवीत अशी राहील. नकोत या बाहेरच्या मूर्ती. गोपाळ, का असा खिन्न चेहरा? का काळवंडला मुखचंद्र? सर्व सृष्टीकडे ज्या वेळेस तुम्ही प्रेमाने बघता, त्या वेळेस किती गोड दिसता? आज का तुमच्या हृदयातील प्रेम समाप्त झाले? मैना दूर जाणार असे कळताच का ते प्रेम मेले? हे काय, डोळयांतून पाणी? तुम्हीच ना त्या दिवशी सांगितलेत की, एका गोष्टीसाठी रडावे, जर आपल्या हातून काही चुकले असेल तर!''