सती 29
मोरशास्त्री : पहा बुवा, शेवटी तुम्हीच काय ते ठरविणार; परंतु केवळ पैसा पाहू नका.
धोंडभटजी : मी आठ दिवसांनी काय ते नक्की कळवितो.
मोरशास्त्री : मी आठ दिवस येथेच मुक्काम करतो. काही निश्चित न करता माघारी जाणे योग्य नव्हे. जाईन तो काही तरी सोक्षमोक्ष लावूनच जाईन. एक हो किंवा नाही. म्हणजे दुसरीकडे दगड मारून पहावयास मोकळीक झाली. भीक मागणा-यास शंभर घरे, शंभर रस्ते!
धोंडभटजी : असे काय काही तरी बोलता? तुम्ही का भीक मागणारे?
मोरशास्त्री : भीक नाही तर काय? एवढे तुमच्याकडे आशेने यावे व तुम्ही आपले नाही म्हणावे!
धोंडभटजी : जरा विचार नको का करायला? या गोष्टी का घाईने करावयाच्या? एकदा गाठी पडल्या, म्हणजे त्या कायमच्या व्हायच्या.
श्रीधरभट : का त्या गोपाळाला, त्या गोसावडयाला द्यायची आहे पोर? आहे विद्वान पण काडीची त्याला अक्कल नाही. तो एक मोठा राजा याला दरबारी ठेवीत होता, तर या पंडितांनी उत्तर दिले, 'राजांच्या दरबारात राहणा-या पंडितांच्या ज्ञानाचे दिवाळे निघते!' याचे मात्र ज्ञान जणू जिवंत राहिले आहे!
मोरशास्त्री : त्या शिवालयात राहणारा तो का?
धोंडभटजी : हो, तोच.
विष्णुपंत : काय हो धोंडभटजी, त्याचे मैनेवर व मैनेचे त्याच्यावर प्रेम आहे म्हणतात, ते खरे का?
धोंडभटजी : कोण म्हणतो?
श्रीधरभट : म्हणतात कोणी कोणी.
मोरशास्त्री : अहो, लोक वाटेल ते बोलतात.
धोंडभटजी : पूर्वी त्या शिवालयाच्या बागेतून फुले आणण्यासाठी मैना जात असे. आता केली बंदी.
मोरशास्त्री : त्यावरून केले असेल लोकांनी अनुमान.
श्रीधरभटजी : लोक सुताने स्वर्गात जाणारे असतात. शून्यातून विश्व निर्माण करितात, मोहरीचा मेरू करतात, पराचा कावळा करतात. मुळात काही नसते, त्यातून रामायणे रचतात! जाऊ द्या. धोंडभटजी असला अविवेक कधीही करणार नाहीत. मैनेसारखे रत्न माकडापुढे फेकणार नाहीत. शिवाय लहानग्या जयंताचेही कल्याण नको का पहायला?
धोंडभटजी : या लहानग्याचीच चिंता वाटते हो. नाही तर का मी असा पैशाचा बंदा आहे?
विष्णुपंत : बरे धोंडभटजी, विचार करा; काय ते कळवा. येतो आम्ही.
धोंडभटजी : मीही येतो तुमच्याबरोबर. मलाही जरा बाहेर काम आहे.