सती 17
मैना निघून गेली. ते निशिगंधाचे फूल हृदयाशी धरून ती गेली. ते फूल ती डोक्यावर ठेवी, कानावर ठेवी, नाकावर ठेवी, ओठांवर ठेवी, गालांवर ठेवी, भालावर ठेवी, ते फूल कोठे ठेवू, कोठे न ठेवू असे तिला वाटत होते. वाटेत ती थांबली. तिने मागे पाहिले. तिला का अद्याप गोपाळ दिसत होता? परंतु ती पहा पळाली. गेली घरी.
गोपाळही परतला होता. त्या शिवालयात तो आला. आज त्याच्याही जीवनाच्या बागेत नवीन फूल फुलले होते. त्या फुलाची कोमलता त्याला मोह पाडीत होती. त्या फुलाचा वास गोड होता; परंतु उन्मादकारी होता. उग्र होता तो वास. गुंगवणारा, रंगवणारा होता तो वास. तो रंगीत वास होता, संगीत वास होता. त्या वासाने गोपाळ नागासारखा डोलू लागला. कोठे होते ते फूल? कोठे कशावर फुलले होते? कोणी लावले ते फुलझाड, कोणी त्याला पाणी घातले? गोपाळ शिवालयाभोवती हिंडत होता. त्या बागेतील फुलांचे तो वास घेत होता; परंतु ते सारे वास फिके होते. तो जो दिव्य वास येत होता, तो कोठे आहे? त्या वासाचा नुसता घमघमाट सुटला होता. सारे वातावरण दरवळले होते. कोठे आहे ते फूल? कोठून येत होता तो वास?
मैना रोज उजाडले नाही तो हातात परडी घेऊन येई. गोपाळ वाटच पहात असे. तिकडे उषा फाके व इकडे मैनेचे फुललेले डोळे दिसत. तिकडे पाखरे किलबिल करू लागत व इकडे मैना मंजुळ गाणी गुणगुणत येई. प्रथम दोघे झाडांना पाणी घालीत. गोपाळाच्या हातात ती घडा देई. हातांना हात लागे. तो का पाण्याचा घडा होता? ते प्रेमाचा घडा होता. गोपाळ घडे रिकामे करून आणी. न थकणारी मैना पुन्हा भरून देई. मैनेजवळ अथांग पाणी आहे. अथांग प्रेम आहे.
''मैने, तुझ्या तोंडावर घामाची फुले फुलली आहेत, घेऊ का ती तोडून?''
''नको. घामाची फुले घाणेरडी. ती सुगंधी फुले आपण तोडू.'' ती म्हणे.
दोघे मग बागेतील फुले तोडीत. कधी कधी एकाच फुलावर दोघांची बोटे पडत. ती बोटे फुले खुडण्याचे विसरून जात व एकमेकांशी खेळू लागत. सुंदर फुलांच्या कोमल पाकळयांवर बोटांचा खेळ! कोमल पाकळयांवर कोमल भावनांचा नाच!
''माझ्या फुलावर तुमचे का डोळे? दुसरी फुले का थोडी आहेत?'' मैना रागावून म्हणे.
''आणि माझ्या फुलावरही तुझे का बरे डोळे?'' तो हसून म्हणे.
''खरेच असे सारखे का बरे होते? एकाच फुलावर दोघांचे हात.''
''कारण आपले डोळे एक आहेत.''
''आणि आपली हृदये एक आहेत.''
''आपली परड एक आहे. ती दोघांनी मिळून भरून ठेवायची आहे; देवाच्या चरणी वाहायची आहे.''
असे दिवस जात होते.
परंतु एके दिवशी मैना आली नाही. गोपाळ वाट पाहून दमला. सुंदर सुंदर फुले त्याने तोडून ठेवली होती; परंतु मैनेचा पत्ता नाही. मैना आजारी का आहे? का तला येण्याची बंदी झाली? का बरे ती नाही आली? आपणच तिच्या घरी फुले नेऊन द्यावी, असे गोपाळाच्या मनात आले. कर्दळीच्या पानात फुले घेऊन तो निघाला. नदीपर्यंत तो आला; परंतु त्याला गावात जाण्याचे धैर्य होईना. तो तेथे नदीच्या प्रवाहात घुटमळत उभा राहिला. एकदम त्याच्या हातातील फुले नदीच्या पाण्यात पडली. ती फुले वाहून जाऊ लागली. गोपाळ खिन्न झाला. त्या फुलांकडे तो बघत होता. आपले प्रेमही असे वाहून जाईल का? ते एकमेकांस नाही का मिळणार? आम्हांला आमच्या प्रेमावर तिलांजली द्यावी लागेल का?
किती तरी विचार गोपाळाच्या मनात आले. तो आपल्या त्या शिवालयात परत आला. त्याचे डोके भणाणले होते, तप्त झाले होते. तो देवाच्या गाभा-यात शिरला. मदनाची होळी करणा-या कैलासपतीच्या पिंडीवर त्या शांत, शीतल, निश्चल पिंडीवर-त्याने आपले मस्तक ठेवले. होऊ दे शांत डोके, जळून जाऊ देत सारे कामांकुर; वासनांकुर!