सती 30
ती सर्व मंडळी गेली. घरात जयंत निजला होता. मैना सर्व काही ऐकत होती. आपल्या नशिबी काय आहे, तिला कळेना. तिचा चेहरा काळवंडला. तिला रडू आले. गोपाळने सांगितलेली कुणकुण खरी एकूण. तिच्या मनातील मनोरथांच्या माडया कोलमडून पडल्या. तिची स्वप्ने भंगून गेली. तिच्या गोड आशा अस्तास गेल्या. भयाण भविष्यकाळ डोळयांसमोर दिसू लागला. तिच्या हृदयमंदिरातील गोपाळची गोड मूर्ती दूर फेकली जाणार व तेथे खोटया म्हसोबाची स्थापना केली जाणार! अरेरे! मैनेचा गळा दाबला जाणार, कायमचा दाबला जाणार! तिचे हास्य, तिचा आनंद, तिचे सुख, तिचे लावण्य, तिचे तारुण्य, तिचे प्रेम, सर्व मातीत मिळविले जाणार! यासाठी का तिला वाढवण्यात आले? यासाठी का मैनेच्या देहाला पोसण्यात आले? मैनेच्या देहावर तिची सत्ता नव्हती. त्या देहावर आईबापांची सत्ता होती. त्यांनी पोसलेला पिंड वाटेल तेथे देण्याचा त्यांना अधिकार होता; परंतु मन? मन मैनेचे होते. तिचे स्वतःचे होते. ते मन ती कोणाला देणार? स्वतःचे हृदय कोणाला देणार? आपल्या हृदयदेवाला देणार!
मैना अस्वस्थ झाली. जवळ जयंत झोपला होता. त्या भावासाठी तिची विक्री मांडण्यात आली होती. भावाचा मुका घेऊन मैना म्हणाली, 'लहानग्या भावा, तुला तरी पुढे सुख मिळो! तू तरी पुढे सुखात रहा; परंतु तुला कसे रे मिळेल सुख? आपल्या ताईच्या सुखाची होळी करून, हे वैभव आपणासाठी ठेवण्यात आले आहे, असे जेव्हा तुला कळेल, तेव्हा बाळा जयंता, तू तडफडशील, तू रडशील, ते वैभव तू भिरकावून देशील जयंता! भाऊराया, लहान आहेस रे, तू आज. नाही तर तू बाबांचे मन वळवतास, तुझ्या ताईची पाठ राखतास. होऊ दे माझ्या भावाच्या सुखासाठी होऊ दे माझ्या सुखाची होळी. बाबांना त्यात आनंद आहे ना? त्यांची इच्छा प्रमाण.'
मैना आता हसेना, बोलेना. नीट खाईना-पिईना. तिचे डोळे अकस्मात भरून येत. एके दिवशी रात्री तर एकदम किंकाळी मारून तो झोपेतून घाबरून उठली. तिच्या सर्व अंगाला दरदरून घाम सुटला होता. आईबापांनी तिला सावध केले. तिने आईला घट्ट धरून ठेवले. ती हुंदके देऊन रडू लागली.
'मैने, नको अशी रडू. काय झाले? भ्यायलीस का? मैने, पूस डोळे. नीज.' आई शांतवीत होती.
'माझ्यावर वीज कोसळणार, आता कुठली वीज? आई, तुला सारे माहीत आहे.' मैना आईच्या गळयात गळा घालून म्हणाली.
'उगीच काही तरी मनात आणतेस. नीज आता. कसली वीज पडणार आहे? झोप.' वडील म्हणाले.
मैना शांत झाली. आई तिच्याजवळ बसली. मध्येच ती आईचा हात घट्ट धरी व आपल्या हृदयाशी धरून ठेवी.
शेगावकर जहागिरदार वासुदेवराव यांच्याकडून काय निरोप येतो, याची धोंडभटजी वाट पहात होते. एवीतेवी मैनेचे पैसे घ्यायचे, मग तितके जास्त मिळतील तितके का न घ्यावे? जयंताचा संसार त्यामुळे पुढे सुखाचा होईल. त्याला सुखाने, ऐश्वर्याने नांदता येईल. त्याला कसलीही ? पडणार नाही. असे विचार धोंडभटजींचे चालले होते. त्यांनी शेगावकरांना दहा हजारांचा आकडा कळविला होता.
त्या दिवशी राघेगोविंद महाराज शेगावकरांकडे मुक्कामासच राहिले होते. त्यांचा कोण थाटमाट! त्यांची कोण बडदास्त ! शिष्य वारा घालीत होते; कोणी पाय चेपीत होते, कोणी तांबूल करून देत होते. त्यांची कोणती बोलणी-चालणी चालू होती बरे? हे गादीवाले महाराज काय सांगत होते?
राधेगोविंद : आज तर फारच उकाडा होत आहे.
शिष्य : थंडाई तयार होत आहे.
राधेगोविंद : आज भोजनही फार झाले? म्हणून जरा अस्वस्थ वाटते.
शिष्य : लोकांचा आग्रहच फार होतो. तुमच्यावर त्यांची अपार श्रध्दा. तुम्हालाही त्यांचे मन दुखविणे जड जाते. खावे - घ्यावे लागते.