सती 40
''या जगात कसे रहावे कळत नाही. तू जीव का देत नाहीस? आपण दोघांनी पळून का जाऊ नये? त्या थेरडयाचा मी खून का करू नये? त्या राधेगोविंदमहाराजाला समुद्रात का बुडवू नये? तुझ्या वडिलांना शासन का करू नये? कोणता धर्म, कोणता मार्ग? काही कळत नाही. तू मला अंतरणार एवढे खरे. मैने, तुझी माझी ताटातूटच शेवटी व्हायची होती, तर भेट तरी कशाला झाली?''
''त्यातही देवाचा हेतू असेल. गोपाळ, आता तुम्ही केव्हा भेटाल, केव्हा दिसाल? तुम्हाला आज शेवटचे पोटभर पाहून घेऊ दे. एकदा त्या प्रचंड वाडयात जाऊन पडले, म्हणजे मी जन्माची कैदी होईन. आता तुमच्या मैनेचे सुख कायमचे संपले. मैना आता कधी हरणार नाही. मी मरणाची वाट पहात बसेन. झुरून झुरून त्या वाडयात ती मरून पडेल. पण गोपाळा, तुला माझ्या हृदयगोकुळात मी ठेवीन. तेथे वाजव हो गोड मुरली, दे हो मला धीर. मी कोठेही गेले, तरी माझे मन तुझ्याभोवती प्रदक्षिणा घालीत राहील. तू माझ्या मनाचे मन, जीवनाचे जीवन, प्राणांचा प्राण! आजचे हे शेवटचे बाह्यदर्शन. अत:पर मनोमय भेट, मनोमय दर्शन. इतके दिवस देवाची सगुण पूजा केली, आता निर्गुण पूजा सुरू होऊ दे.''
''मैने! माझ्याशिवाय तू जगशील?''
''पाण्यातून बाहेर काढताच मासा तडफडून मरतो. प्रेमाच्या पाण्यातून बाहेर काढताच माणसाचेही तसेच झाले पाहिजे. परंतु माझे प्रेम इतक्या पराकोटीचे आहे का? मला माहीत नाही. मी जगेन का मरेन? मला माहीत नाही. परंतु झुरेन एवढे मात्र खरे.''
''तेल संपताच दिवा विझतो, प्रेमवस्तू दूर होताच जीवनाचा दिवाही वास्तविक विझला पाहिजे.''
''प्रेम का एकालाच द्यावे? सर्व सृष्टीला नको द्यायला?''
''सर्व सृष्टीला का पती मानणार तू? सारे पुरुष का पती?''
''काय बोलतोस हे गोपाळ? जगात का पती एवढेच सत्य? त्याला द्यावयाचे प्रेम मी माझ्या हृदयात एका बाजूस ठेवून देईन. परंतु हृदयातील इतर प्रेमावर दुनियेचाही हक्क आहे. ते दुनियेला दिले पाहिजे.''
''तुझा तो पती तुला पत्नी म्हणूनच मानणार ना?''
''परंतु मी त्यांना मनात पती म्हणून मानणार नाही.''
''पत्नीधर्माने तुला त्याच्याशी वागावे लागेल.''
''मी त्यात अलिप्त असेन. संन्यासिनी असेन. बाह्य कर्मावरून परीक्षा न करता हेतूवरून करावी. कदाचित माझी विरक्ती पाहून त्यांनाही विरक्ती येईल.''
''जग बाह्य कृतीवरूनच परीक्षा करते. कारण मनात असते तेच कृतीत प्रकट होणार. लोकांना तुमच्या मनात डोकावता येत नाही. बाह्य कर्म हीच कसोटी.''
''नका मला छेडू. मी अडाणी मुलगी आहे. माझ्या हृदयातील देव मार्ग दाखवील, त्याप्रमाणे मी जाईन. तुमचे स्मरण करीन. माझ्या जीवनात तुमचा सुवास भरलेला आहे. तो मला तारील. कधी कधी माझे डोळे भरून येतील. गोपाळ, वादाने का प्रेम सिध्द होते? मी उद्या येथून जाताच मेले नाही, मला पत्नीधर्माने वागावे लागले, एवढयावरून माझे तुमच्यावर प्रेम नाही असे तुम्हाला वाटले तर वाटो बिचारे. माझ्या प्रेमाची निश्चिती मी तरी कशी देऊ? मन हे चंचल आहे. उद्या माझे मन कसे असेल ते मी कसे सांगू? माझ्या प्रेमाचा अहंकार मला नको. गोपाळ, या मैनेजवळ काही नाही हो. मी एक टरफल आहे, बुडबुडा आहे. मजजवळ ना ज्ञान, ना विचार; ना प्रेम, ना निश्चय; ना स्थिरता, ना काही. मी खरोखरच अबला आहे. कसलेही बळ मजजवळ नाही. जाते मी. गोपाळ, जाऊ दे आता मला. जाऊ दे या दुबळया मैनेला.''
''कोठे चाललीस?''
''घरी.''
''कोठे आहे घर?''
''गोपाळा, तुझे हृदय हे माझ्या आत्म्याचे घर. परंतु या देहाचे घर तिकडे नदीपलीकडे आहे. जाऊ दे मला.''
''जाऊ नकोस, मैने, जाऊ नकोस. तुला पोटभर पाहू दे.''
''पोट कधीच भरत नसते. तिकडे आरडाओरड होईल. आई-बाबा रागे भरतील.''
''प्रेम कशाचीही पर्वा करीत नाही.''