सती 8
''अगं, एवढया मोठया मुलीला करणार तरी कोण?''
''लग्न करावयाचे आहे असे एकदा जगाला कळू दे. राजा महाराजे मागणी घालतील. तुम्हांला काळजी नको.''
''परंतु मैना आता मोठी झाली आहे, तिचा विचार नको का घ्यायला? लहानपणी आईबाप सारा विचार करितात. परंतु आता?''
''काही नको तिला विचारायला. तिच्या विचाराने घ्यायचे ठरविले की, काही जमायचे नाही आणि तिला तरी स्वत:चे मन कोठे समजत असेल? अजून बेतात आहे तोच तिला उजवून टाका. तुमचे आमचे ऐकते आहे तोच सारे करा.''
''तू म्हणतेस त्याचा विचार केला पाहिजे. ब्रह्मवादिनी मैनेला का संसारातील चिखलात ढकलू? संसाराच्या चिखलातूनही मोक्षाची कमळे फुलणे अशक्य नाही. बघू.''
हा ना करिता करिता मैनेला आजोळी पाठवायचे ठरले. मैना आजोळी गेली. आजोळी किती तरी मंडळी होती. मैनेची आजी, आजोबा अद्याप हयात होते. तिला तीन मामे होते. सर्व मामांचे संसार सुरू झाले होते. धाकटया मामांची मुलगी सासरहून माहेरी आली होती. मैना तिच्याशी मनमोकळेपणे बोले. एके दिवशी दोघी जणी शेतावर गेल्या होत्या. शेताच्या बांधावरील दूर्वा त्या तोडीत होत्या. त्यांचे बोलणे चालले होते.
''मैने, खरेच का गं तू लग्न नाही करणार?''
''इंदुताई, माझ्या मनात काय आहे, ते मला समजत नाही. एखादे वेळेस लग्नाचे विचारमाझ्या मनात येऊन जातात. त्या गोड विचारात मी बुडून जाते, परंतु एकदम घाबरून जणू शुध्दीवर येते. लग्न नको असे वाटते. त्याचे भय वाटते मला.''
''मग तू भित्री आहेस एकूण? भिऊन लग्न न करणे यात काय अर्थ? भित्रेपणाने जगात काहीही मिळत नसते.''
''इंदू तू सुखी आहेस का?''
''बायकांना सुखदु:ख विचारायचे नसते.''
''आपण का माणसे नाही?''
''जवळ जवळ नाहीच. अगं, मी सासरी तळयावर धुणी धुवायला जाते. तेथे इतरही बायका येतात. त्यांच्याजवळ बोलण्यात एखादे वेळेस घरी जायला उशीर होतो, परंतु जरा उशीर झाला, तर घरी संशय घेतात. सासुबाई बोलतात आणि ते मारतात. मैने, बायका म्हणजे गाई, शेतक-यांच्या बायका ब-या त्यांना थोडे स्वातंत्र्य असते. त्या मोलमजुरी करतात. दोन पैसे मिळवितात. पतीलाही त्या बोलू शकतात. परंतु आपण पिंज-यातील मैना, कधी डाळिंब मिळेल, कधी थोबाडित मिळेल. मैने, स्त्रिया म्हणजे संसारातील संन्यासिनी.''
''इंदू, किती भयंकर तुझी स्थिती? अशा या संसारात कशाला मी पडू?''
''तू मोठी आहेस, म्हणून पड. आम्हांला कळत नव्हते, तेंव्हा आमची लग्ने लागली. तू स्वत:चे स्वयंवर लाव, सीता-सावित्री हो.''
''सीता-सावित्रीस त्यांच्या वडिलांनी तशी मोकळीक दिली होती. मला कोण देणार? आणि खरे सांगू का, अजून माझे मन ओढून घेणारा कोणी मिळाला नाही. कधीकधी माझ्या मनाला हुरहूर लागते. कोठे आहे. या मनाचा मालक, या मनाला मोहणारा? इंदू, बाबा म्हणतात की, मैना ब्रह्मवादिनी होईल; परंतु मैना मोहांकडे ओढली जाते. एके दिवशी आमच्या अंजनी नदीच्या तीरावर पक्ष्यांचे एक जोडपे खेळत होते. त्यांच्याकडे पाहावेसे वाटे मला; परंतु कोणी आपल्याकडे बघत तर नाही ना? असे मनात येई. वास्तविक असे प्रसंग पाहून आपण पशुपक्ष्यांहून निराळे आहोत, आपण मानव आहोत, असे मनाला समजाविले पाहिजे; परंतु तितके भान रहात नाही आणि एकदम ग, कोण होणार विरक्त? हळूहळूच जीवन फुलणार, हळूहळूच मोक्ष मिळणार? नाही का?''