सती 15
''या फुलांची मी किंमत देईन. फुकट कशी घ्यावी, म्हणून आल्ये की या फुलांना पाणीही घालीत जाईन. आहे कबूल?''
''तू एकटी का घालणार पाणी?''
''आपण दोघे घालू. मी काढीन, तुम्ही घाला. तुम्ही काढा मी घालीन. दोघे मिळून फुले फुलवू. मग परडी भरून न्यायला आनंद होईल. मोकळेपणा वाटेल.''
''फुलांची परडी भरेल, मनाचीही परडी भरेल. ही ओसाड जागा हसेल व ओसाड हृदयही असेल. आतबाहेर फुलबागा फुलतील.''
''किती सुंदर बोलता तुम्ही. मग ठरले हां. पहाटे मी येत जाईन.''
''होय. पहाटे मैना किलबिल करीत येईल.''
''जाते आता मी. उशीर झाला.''
''मी येऊ का पोचवायला?''
''नको. मला भय ना भीती.''
''परंतु पोचवायला आलो तर तुम्हांला वाईट वाटेल का?''
''सुंदर सौम्य प्रकाशाच्या संगतीत प्रसन्नच वाटते.''
मैना निघाली. हसत खेळत नाचत निघाली. गोपाळ पोचवायला गेला. नदीजवळ दोघे आली. नदीतून दोघे जाऊ लागली मैना प्रेमाच्या वेगवान भरलेल्या नदीतून जात होती. तिला पाण्याच्या नदीतील दगडाची ठेच लागली. ती पडणार तो गोपाळने तिला धरले.
''हे दगड मेले नदीच्या पाण्यात मनातील पापांप्रमाणे लपून बसतात; परंतु केंव्हा पाडतील नेम नाही. गुळगुळीत गोटे, परंतु लबाड मोठे.'' मैना म्हणाली.
''ते खडबडीत होते. गुळगुळीत होण्यासाठी, प्रेमळ होण्यासाठी पाण्यात राहून ते तपश्चर्या करतात. बिचारे डोकेही वर काढीत नाहीत. इकडेतिकडे हलत नाहीत.''
''जा आता माघारे, किती दूर येणार?''
''हे घे निशिगंधाचे फूल.''
''कोणासाठी हे?''
''कोणासाठी बरे?''
''मला, या मैनेला दिलेत?''
''हो, गोड बोलणा-या, गोड दिसणा-या मैनेला.''
''निशिगंधाचे फूल. या फुलाला रात्री अधिकच वास येतो. होय ना?''
''हो. दिवसा वास येत नाही. इतर वासात त्याचा वास नाहीसा होतो. ते एकटे असते, तेव्हाच त्याची खरी माधुरी.''
''जा आता तुम्ही.''
''कोठे जाऊ?''
''त्या शिवालयात, त्या पलीकडच्या माझ्या कुंजवनात.''
''मैने!''
''काय?''
ती दोघे तेथे नदीतीरी अंधारात उभी होती. वरून तारे पहात होते. वारे त्यांच्याभोवती पहारेक-याप्रमाणे घिरटया घालीत होते.