सती 32
वासुदेवराव : संतांची सेवा फुकट जात नसते.
राधेगोविंद : मी आधी कोणाच्या कामात पडत नाही. परंतु एकदा पडलो, तर ते यशस्वी केल्याशिवाय, संपूर्णपणे यशस्वी केल्याशिवाय रहात नाही.
वासुदेवराव : थोरांचे लक्षणच ते. बरे, बसा मी जातो, तुम्हाला थोडी तरी विश्रांती मिळू दे. पुन्हा लोक येऊ लागतील, सारखे बोलावे लागेल.
राधेगोविंद : अहो, आता मुंग्यासारखी रांग सुरू होईल. सांसारिकांच्या कर्मकथा ऐकाव्या लागतात. कोणाला दुखणे आहे, कोणाला संतान नाही, कोणाला पिशाच्च-बाधा. एक की दोन. परंतु ऐकावे लागते. संन्याशाला सा-या जगाचा संसार!
वासुदेवराव : संतपण म्हणजे सुळावरची पोळी!
राधेगोविंद : अहो, हे समजेल त्याला. काही पाखंडी म्हणतात, 'गादी चालविणे म्हणजे गादीवर लोळणे, पुरणपोळी खाणे, अंगाला चंदनाची उटी लावणे!' अहो, आमचे यात काढीइतकेही लक्ष नसते. जनक राजा एकीकडे जेवे तर एकीकडे एक हात आगीत ठेवी. आमचे वैभव जगाला दिसते, परंतु आमचे तपश्चर्या जगला दिसत नाही. तपर्श्चेशिवाय का वैभव मिळते? या जन्मी नसली तरी मागील जन्मीची असते. आमचे पाय चेपण्यात येतात, तेच काहींना पाहवत नाही ! अहो, हजारो लोक आपली डोकी ठेवतात या पायांवर हे पाय सुजून जातात. नको का मग चार तास चुरून घ्यायला?
वासुदेवराव : आणि पाय चेपावे बायकांनीच. माझे पाय गडीमाणसे चेपतात, तर उलट आणखीच दुखू लागतात. पुरुषांचे हात ताठर, कठोर.
राधेगोविंद : सेवा स्त्रियांनीच करावी. परमेश्वराने कामे वाटून दिली आहेत. 'स्वधर्मे निधन श्रेयः परधर्मी भयावहः' ज्याचे काम त्यानेच करावे.
शिष्य : माझे हात कसे आहेत? बोचतात का?
राधेगोविंद : माझे नसते रे लक्ष.
वासुदेवराय : बरे, मी येतो. घ्या विश्रांती.
वासुदेवराव काठी टेकीत निघून गेले. महाराजांनी शिष्यासही जावयास सांगितले. ते तेथे गादीवर एकटेच आता होते. त्यांची मुद्रा चिंतनाने प्रफुल्लित होऊ लागली. कसले चिंतन सुरू झाले? त्यांच्या मनात डोकावता? परंतु तेच बोलू लागले स्वतःशी ऐकू या त्यांचे बोलणे. 'किती भोळसट असतात ही माणसे. वासुदेवरावही इरेस पेटला आहे. मुलबाळ होईल, अशी मी ग्वाही दिली आहे. आपणास मुलबाळ होणे शक्य नाही. इतकेही या मूर्खाला कळत नाही का! केवळ लग्ने करून का मुलेबाळे होतात? आणि महाराजांच्या शब्दांनी का होतील? परंतु आपणास काय करावयाचे आहे? आपले पैशाशी काम. इतरही भोग मिळतील. चैन, सुखभोग म्हणजे आमचे परब्रह्म. आमचे ध्येयच मुळी गादी आणि गादी सर्व काही साधी. या देशातील लोक कितीही गरीब झाले, तरी आमच्या गाद्या गरीब होणार नाहीत. हिंदुस्थानातील सारे धंदे बुडतील, बुडवण्यात येतील, परंतु हा गादीवाल्यांचा धंदा, हा आम्हा बोवांचा धंदा, हा कोण मारील ! ती शक्ती फिरंग्यांजवळ नाही. इंग्रजांजवळही नाही. हिंदुस्थानात इतर राज्ये येतील व जातील. परंतु बोवांचे राज्य कायम आहे. चिरंजीव आहे!'
असे महाराज बोलत होते. इतक्यात शिष्य आत आला व 'बाहेर मंडळी आली आहे,' असे सांगता झाला. महाराज उठले, 'राधेगोविंद, राधेगोविंद, म्हणत राधेगोविंद महाराज बाहेर आले. लोक पाया पडण्यासाठी धडपडू लागले. महाराज बसले लोक मुमुक्षूप्रमाणे उत्कट तोंडे करून बसले होते. महाराज हसून म्हणाले, 'मी आत विषयाचेच चिंतन करीत होतो. मनात म्हटले आज कोणत्या विषयावर प्रवचन करावे? शेवटी ठरविले देवाची इच्छा असेल, ते येईल तोंडून. सारी भगवंताची इच्छा आपण योजून काय होणार? कर्ता करविता तो. राधेगोविंद, राधेगोविंद!' लोकही राधेगोविंद गर्जू लागले, टाळया वाजवू लागले.
धोंडभटजीकडे दहा हजार देतो, असा निरोप घेऊन घोडेस्वार आला, धोंडभटजींस हर्षवायू होण्याची वेळ आली. त्यांना पुन्हा वाटले की, वीस हजार सांगितले असते तर? परंतु आता काय? आणि फारही अंत पाहण्यात अर्थ नाही. असा पोक्त विचार त्यांनी केला. त्यांनी ठीक आहे, असे निरोप पाठविला. मैनेचे लग्न ठरले, मुहुर्तही ठरला.