सती 39
''माझे चुकलेले मला दिसत आहे. माझे खरे स्वरूप आज मला दिसत आहे. आत्म्याच्या प्रेमाच्या मी पूर्वी गप्पा मारीत असे. त्या खोटया होत्या. प्रसंग येताच मी लटपटलो. मैने, मी साधा मनुष्य आहे. मीही सुखलोलुप आहे. तुझ्यासाठी भुकेलेला आहे. आजपर्यंत माझी भूक स्पष्टपणे, तीव्रपणे मला कळू आली नाही. इंद्रिये तुझ्या दर्शनाने तृप्त होत असत, परंतु तू आता जाणार. आज तीव्रतेने सारे समजत आहे. वस्तू जवळ होती, तोपर्यंत वाटे आपलीच आहे. काय घाई. परंतु आता? आता मला धीर नाही. मी एक वासनामय प्राणी आहे. कशी कोंढू इंद्रिये? कसे रोखू हे मन! मैने, चल. तू व मी दूरदूर जाऊ. रानावनात राहू. भिल्ल असतात, कातकरी असतात. त्यांच्याप्रमाणे राहू. मी रानफुले जमवून तुला सजवीन, गोड वनफळे तुला आणून देईन. आपण झ-याचे पाणी पिऊ, सुखाने राहू. येतेस? खरेच जाऊ, चल. या मानवी जगापासून दूर दूर जाऊ. सृष्टीच्या जवळ जाऊ. येतेस? खरेच जाऊ.''
''नाही, मी येत नाही. बाबांनी हा देह पोसला. हा देह त्यांच्या ताब्यात. तुमची सत्ता माझ्या प्रेमावर आहे, माझ्या देहावर नाही. माझे प्रेम मी तुम्हाला दिले आहे. माझा देह बाबा ज्याला देतील, त्याचा होईल. माझे प्रेमाचे पाखरू तुमच्याभोवती उडेल, तुमच्याभोवती गाणी गुणगुणेल. रानात कशाला जायचे? आपणाला देहाच्या पलीकडे जायला शिकले पाहिजे. तुमचे प्रेम का या माझ्या देहावर आहे! हा देह आज सुंदर आहे, टवटवीत आहे. उद्या समजा मला देवी आल्या, माझे हे तोंड विद्रूप झाले, तरी कराल का तुम्ही प्रेम? उद्या माझा हा डोळा फुटला, आवडेल का मी तुम्हाला? देहावर प्रेम नको. आत जाऊ या. देहाला ओलांडून आतील शिवत्वाकडे जाऊ या. हृदयदेवा गोपाळा, माझ्या देहाचा मोह सोड. मैनेच्या देहावर प्रेम करणारा न होता, तिच्या आत्म्यावर प्रेम करणारा होता. माझा प्रियकर डबक्यातील बेडूक न होवो. तो उंच विहार करणारा मानसहंस होवो.''
''तू का खरोखरीची ब्रह्मवादिनी झालीस? कोठून असे बोलायला शिकलीस?''
''तुमच्या प्रवचनामुळे हे शिकले. प्रवचने देताना तुम्ही कसे तन्मय होत असा.''
''तू श्रोत्यांत आहेस, हे माहीत असल्यामुळे मला स्फूर्ती येई. माझ्या स्फूर्तीचा झरा म्हणजे तू. तू गेलीस म्हणजे माझे जीवन सुकून जाईल.''
''कोठे जाणार मी? मी तुमच्याच जवळ आहे.''
''मैने, तू अंतर्बाह्य माझी आहेस. देहासकट आत्मा व आत्म्यासकट देह अशी तू माझी आहेस. हा देहही एकदा मनाने तू अर्पिला होतास. तो का दुस-याला देणार?''
''जे माझे आहे तेच मी देऊ शकेन. जे सर्वस्वी माझे आहे, तेच मी द्यावे. मी देह देऊ पहात होते. परंतु देह माझा नाही.''
''मैने तुझा देह जो कोणी विकत घेईल, त्याची सेवाचाकरी तू करणार नाहीस?''
''ज्याप्रमाणे एखादा गडी प्रामाणिकपणे नोकरी करतो, बैल नांगर ओढतो, त्याप्रमाणे मी करीन.''
''तुझा पती तुला पाय चेपायला लावील, तुझ्या मांडीवर डोके ठेवील व ते तुला चोळायला लावील.''
''मी सारे करीन. माझे कर्तव्यच आहे. त्यांनी बाबांना पैसे दिले. मी त्यांची सेवा केली पाहिजे.''
''तू का त्यांची मनोभावे सेवा करशील?''
''हो.''
''प्रेम असल्याशिवाय सेवा करता येत नाही. मग तू त्यांना प्रेमही देणार काय?''
''मला काही समजत नाही.''
''समजत नाही काय? तू त्यांची सेवाचाकरी मनापासून करणार ना?''
''हो.''
''प्रेमाशिवाय ते शक्य नाही. तुला मग माझे प्रेम विसरावे लागेल.''
''प्रेम अनंतरूप आहे. तुमची सेवा मी पतिप्रेमाने केली असती. माझ्या लहान भावाची सेवा मी बंधुप्रेमाने करते. त्यांची सेवा कोणत्या तरी प्रेमस्वरूपात करीन. ते माझ्याकडे कोणत्या का दृष्टीने बघत ना. मी त्यांची कीव करीन. मनाने व शरीराने रोगी बनलेल्या त्या वृध्दाची मी दाई बनेन, आई बनेन.''