सती 16
''जाऊ दे आता. उशीर झाला.''
''मैने!''
''काय ते सांगा!''
''काही नाही. जा. उशीर झाला आहे. आज तारे किती सुंदर दिसत आहेत.''
''तुमच्या बागेतील फुलांप्रमाणे!''
''तुझ्या डोळयांप्रमाणे.''
''तुमच्या आत्म्याप्रमाणे.''
''माझा आत्मा का इतका निर्मळ आहे?''
''तारे दुरून तरी निर्मळ, शांत दिसत आहेत. जवळ जाऊन पाहू तर कदाचित आगीचे लोळ असतील. तुमचा आत्मा मला अद्याप दुरून तरी निर्मळ दिसत आहे. कदाचित जवळ येईन, तर तेथे भडकलेली आगही असेल, परंतु आज तरी निर्मळ दिसते आहे.''
''म्हणजे अजून तू दूर आहेस माझ्याजवळून?''
''माझे घर नदीच्या या तीरावर. तुमचे त्या तीरावर.''
''नदीने ते तीर व हे तीर आपल्या पाण्याने जोडले आहे. एकच ओलावा दोहींकडे ती देत आहे. प्रेमाने ते तीर व हे तीर जोडले नाही का जाणार? एकाच प्रेमाचा ओलावा दोन्ही जीवांना नाही का पोसणार?''
''जाते मी. उशीर झाला. रातकिडे ओरडू लागले.''
''ते ओरडत नाहीत. प्रेमाची गीते गात आहेत.''
''प्रेमाची गीते का अशी कर्कश असतात? आणि प्रेमाचे खरे गाणे नि:स्तब्ध असते, नि:शब्द असते. प्रेमाजवळ वाचेची वटवट बंद पडते, जाते मी!''
''मैने!''
''काय?''
''काही नाही. जा. उशीर झाला. रातकिडे ओरडत आहेत. कुत्रीही भुंकत आहेत. ही वटवाघळेही वर फिरत आहेत बघ.''
''दडलेली सृष्टी रात्रीच्या अंधारात स्वैर उडू पहात असते. जाते मी. उशीर झाला.''
''जाते मी, जाते मी म्हणतेस व घुटमळत तर उभी आहेस. जा ना पटकन्.''
''गोपाळ!''
''काय?''
''काही नाही. जा. त्या पडक्या शिवालयात जा.''
''पडक्या मंदिरातच मी राहू ना?''
''शिव पाहिजे असेल, तर पडके मंदिरच बरे. अ-शिव पाहिजे असेल, तर दुसरी घरेदारे. जाऊ दे मला आता. मी पळतच जाते.''