सती 4
दिगंबर पुढे निघाला. गुराख्याचे शब्द ऐकून तो जरा खिन्न झाला. जी पवित्र स्थाने पहावयाला तो आला होता, इतक्या लांब आला होता, त्यांच्याभोवती का रान माजलेले असावे? तेथे माणसांनी न जाता, फक्त का साप, वाघांनी जावे? पवित्र स्मृतीची, पवित्र स्थानांची का ही अशी उपेक्षा? हिंदुस्थानात त्यागाला, पावित्र्याला ध्येयनिष्ठेला किंमतच नाही का? सारे का केवळ मीठ-मिरचीचे उपासक बनले? सारे का केवळ खाण्यापिण्याचे शोकी? का दारिद्रयामुळे ही उदासीनता आलेली होती? पोटात चारा नसतो परमेश्वर कसा आठवेल? दारिद्रय व दास्य जोपर्यंत सभोवती
***** (पान नं. ७ ते १० नाही आहे) *****
मैनेच्या पाठीवर सावित्रीबाईस पुन्हा मूल झाले नाही. संसारातील हीच एक आपली जोड असे. आईबापांस वाटे. धोंडभटजी मैनेवर अपार माया करीत. मैना मोठी व्हावी, कीर्तिमान व्हावी, असे त्यांना वाटे. ते तिला घरी शिकवू लागले. मैनेच्या सारे लक्षात राही. एकदा सांगितले की पुरे. तिचा उच्चार स्पष्ट असे. तिला व्याकरण चटकन कळे. तिने स्तोत्रे पाठ केली, सारी गीता पाठ केली. ती वेदमंत्र म्हणे तेव्हा किती गंभीरपणे म्हणे. सौर, पुरुषसूक्त, त्रिसुपर्ण वगैरे ती म्हणे. धोंडभटजी म्हणत, ''माझी मैना मोठी विदुषी होईल. ती ब्रह्मवादिनी होईल.''
त्या काळात लहान वयात लग्ने होत असत. मांडीवरच्या मुलांची लग्ने होत. मैनेचे लग्न कधीच व्हावयाचे. आणि त्यात अशी सोन्यासारखी मुलगी; रूपाने सुंदर, गुणांनी अद्वितीय. परंतु काय असेल ते असो, धोंडभटजी लग्नाच्या भानगडीत पडले नाहीत. मैनेच्या विवाहाची गोष्ट ते कधीही काढीत नसते. पत्नीला काढू देत नसत. ''माझी मैना मोठी होईल, ब्रह्मवादिनी होईल,'' असे ते सर्वांना सागांवयाचे.
मैनेवरही या गोष्टीचा परिणाम होऊ लागला. ती फारशी खेळत नसे. खिदळत नसे. एखादे वेळेस एकटी नदीतीरावर जाई व तेथे शांत बसे. कधी कधी नदीपलीकडे एक जुने पडके शिवालय होते, तेथेही ती जाई. शंकराच्या पिंडीसमोर ती बालयोगिनी डोळे मिटून बसे. जणू तिची समाधी लागे.
''आई, त्या गावाबाहेरच्या शिवालयात कोणी का जात नाही? तेथे सुंदर एकांत आहे. मला आवडते तेथे जायला. वाटते तिथेच रहावे. तेथून येऊ नये.?'' एके दिवशी मैना म्हणाली.
''तेथे नको हो जाऊस. तेथे जाणा-याचे बरे होणार नाही अशी दंतकथा आहे. म्हणून त्या देवळात कोणी साधू उतरत नाही, बुवा राहात नाही. मैने, त्या देवळांत तू जाऊन बसतेस? मला नव्हते माहीत. मी समजत होते की, मुरलीधराच्या मंदिरातच तू जाऊस बसतेस!'' आईने सांगितले.