सती 41
''प्रेमानेही मर्यादा पाळली पाहिजे. ऋतसत्याच्या मर्यादा प्रेमालाही पाळाव्या लागतील.''
''मैने, जगात एकाच वस्तूला बंधन नसते व नकोही. प्रेमाला मर्यादा नाही, बंधन नाही. प्रेम म्हणजेच परमधर्म. प्रेमामुळे सर्व सृष्टीला सत्यत्व आहे. सत्यालाही प्रेमामुळे अस्तित्व आहे. प्रेम हे अनंत आहे, सर्वत्र स्वतंत्र आहे. प्रेम कोणाच्यार रागालोभाची पर्वा करीत नाही. प्रेम हे बेपर्वा असते. ते मस्त करते, बलवान करते. प्रेम दुबळे नाही, कोण घालणार प्रेमाला पायबंद?''
''हे घातुक आहे तत्त्वज्ञान.''
''घात, नाश, सर्वनाश, मरण - प्रेमाला त्याची पर्वा नाही. प्रेम निर्भय असते. ते जनाला भीत नाही. मरणाला भीत नाही. प्रेम मृत्युंजय आहे. प्रेम सर्वजय आहे. अब्रू, मान, कीर्ती, शील, चारित्र्य, सर्वांची राख करावयास प्रेम सिध्द असते. सर्व जगाची होळी करून त्याचे भस्म प्रेम अंगाला फाशील व थै थै नाचेल.''
''मी जाते. ते पहा लोक पाहताहेत आपणांकडे''
''पाहू देत, हसू देत.''
''जाते, गोपाळा.''
''मी तुला जाऊ देणार नाही. अशी घट्ट धरून ठेवतो. पाहतो कोण येतो तुला न्यायला? मृत्यूशीही मी झगडेन.''
''हे काय हे? तुमचे सारे ज्ञान का चुलीत गेले? इतर भोंदू लोकांसारखेच का तुम्हीही? तुम्हीही का शेणातील किडे? माणसे म्हणज का कुत्री? किडया-कुत्र्याप्रमाणे मी तुम्हाला होऊ देणार नाही. मी तुम्हाला उंच जायला शिकविन. मी कठोर होईन. माझे प्रेम तुम्हाला पाडण्यासाठी नाही, तुम्हाला चढवण्यासाठी आहे. ते तुम्हाला पागल न करता पवित्र करील. हृदयदेवा, मी जाते. शुध्द रहा, निष्कलंक रहा. माझा देव पडलेला पाहण्यापेक्षा माझे डोळे मिटोत. जाते मी, गोड गोपाळा, जाते मी.''
मैना निघून गेली.
''गेली, मैना गेली. आग लावून निघून गेली. ही आग आता कोण विझवील? ही आग सप्तसागर विझवू शकणार नाहीत, प्रलयकाळचे मेघही विझवू शकणार नाहीत. अननुभूत आग! कोठे घेऊ उडी, कोठे मारू बुडी?'' कोणत्या डोहात शिरू? आग, भयंकर आग! कोण शांतवील ही आग, कोण विझवील ही होळी? रावणाची चिता हजारो वर्षे धडधडत पेटत होती. माझ्या जीवनाची चिता अहोरात्र अशीच पेटत राहणार का? आग, आग, आग! छे! कशी विझणार ही आग? दुष्ट, निर्दय, कठोर मैना. चूड लावून निघून गेली. प्रेम हे विष की अमृत? प्रेम म्हणजे आग की शीतल गंगा? प्रेम जिववीते का जाळू मरते? प्रेम फुलाप्रमाणे आहे की विषारी बाणाप्रमाणे आहे? छे. हे तर आग लावणारे प्रेम, जाळणारे, भाजणारे, भस्म करणारे प्रेम! आग, कशी शमवू ही आग?
गोपाळ वेडयासारखा झाला. तो बागेतील फुलांजवळ गेला. त्याने फुले तोडून हृदयाशी धरली. 'विझवा रे माझी आग' तो त्या फुलांना म्हणाला, परंतु ती फुले आग विझवू शकली नाहीत. उलट आग वाढली, भडकली. धावत धावत जाऊन मग गोपाळाने नदीत उडी घेतली. तो पाण्यात बुडून राही, पुन्हा वर येई. पुन्हा बुडे. परंतु आग थांबेना. पाण्यातही आग वाढली! गोपाळ शेवटी शिवालयात परत आला. तो शंकराच्या गाभा-यात परत आला. तो शंकराच्या गाभा-यात शिरला. तेथील शांत पिंडीवर त्याने आपले तप्त डोके ठेविले. किती तरी वेळ तसाच तो तेथे बसला होता!
झाले का डोके शांत, झाले का शांत हृदय? थांबली का आग, विझली का होळी? देवाला माहीत!
मैनेच्या बलिदानाचा दिवस उजाडला. ज्योतिष्यांनी अति मंगल म्हणून तो दिवस सांगितला होता. परंतु त्याच दिवशी अति अमंगल अशी गोष्ट होणार होती. त्या शुभ मुहूर्तावर अत्यंत अशुभ अशी घटना घडणार होती. गावात सर्वत्र धामधूम होती. शेगावकर जहागिरदार वासुदेवराव यांच्या श्रीमंतीचे प्रदर्शन त्या लहानशा सारंग गावी होत होते. हत्ती, घोडे गावात हिंडत होते. भालदार, चोपदार हिंडत होत. मोठे मंडप देण्यात आले होते. ते सजवण्यात आले होते. हंडया, झुंबरे सारा थाट होता. मुलीकडचा सारा खर्च नवरदेवाकडूनच होणार होता. मैनेचे नशीब थोर, असे बायामाणसे म्हणत होती. परंतु मैना काय म्हणत होती?
मैना मुकी होती. तिने शांतपणे सारे सहन करण्याचे ठरविले. मोत्यांच्या मुंडावळी तिच्या कपाळावर बांधण्यात आल्या होत्या; परंतु डोळयांतून मोत्यासारखे अश्रू येऊ पहात होते. मोठया कष्टाने मैना त्यांना आवरीत होती. तिच्या लहान भावाला आज नटवण्यात आले होते. त्याच्या गळयात सोन्यामोत्यांचे दागिने होते. त्याच्या कुंचीला मोत्यांचे पिंपळपान होते. किती सुंदर दिसत होता बाळ जयंत. जणू स्वर्गातील इंद्राचाच मुलगा.