सती 19
''मला नवीन भाऊ मिळाला आहे. आई बाळंत झाली आहे. सर्वांना आनंद झाला आहे. म्हातारपणी मुलगा झाला. बाबांना आकाश ठेंगणे वाटत आहे. जणू जन्माचे सार्थक झाले, असे त्यांना वाटत आहे. घरात सारे मला करावे लागे. त्यामुळे वेळ होत नसे. आज आले जरा वेळ काढून. बाळाचे बारसे झाले. मोठा सोहळा झाला. मी आजपर्यंत एकटी होते, ना भाऊ ना बहीण; परंतु देवाला दया आली, पाठीराखा भाऊ आला.''
''काय ठेवले नाव?''
''जयंत.''
''सुंदर नाव. जगाची हृदये जिंकून येईल.''
''जाते आता मी. बाबा घरी नाहीत. ते कोठे बाहेर गेले आहेत. आई झोपली होती. बाळ झोपला होता. दार लोटून मी आले. मी आता मधूनमधूनच येत जाईन. रोज येता येणार नाही. तुमची भेट होणार नाही. सायंकाळची प्रवचने ऐकायला मिळणार नाहीत. सकाळी तुमच्याबरोबर फुले वेचता येणार नाहीत. हृदय फुलणार नाही, परडी भरणार नाही, दुरूनच बरे. जपून रहावे. तुम्हीच मघा म्हणालात. नाही?''
''मैने!''
''काय?''
''काही नाही. जा. घरी बाळ उठला असेल, आई उठली असेल, जा!''
मैना निघून गेली. आणि खरेच, किती तरी दिवसांत ती परत आली नाही. आता सायंकाळची प्रवचने बंद झाली, कारण त्यांना आता फारसे कोणी येत नसे. ''पूर्वीसारखी प्रवचने आता नाही होत. पूर्वी काही निराळीच गोडी वाटे.'' असे लोक म्हणत. जुने झाले की बेचव वाटते. ताजे आहे, नवीन आहे तोच गोडी. गोपाळ कधी कधी उदास होई. कधी कधी मन एकाग्र करण्याची तो पराकाष्ठा करी.
गोपाळ गावात मधुकरीसाठी जात असे. आता तो फक्त पाचच घरी जाई. काही ठराविक घरीच तो जात असे, परंतु त्या दिवशी रस्त्यात त्याला मैना दिसली. तिच्या पाठोपाठ तोही चालला. मैना स्वत:च्या घरात शिरली. थोडया वेळाने गोपाळही त्या घरात शिरला, त्याने मधुकरी मागितली.
''ॐ भवति भिक्षां देहि,'' म्हटले.
''अजून स्वयंपाक झाला नाही.'' मैना हसून म्हणाली.
''जे असेल ते वाढा.'' तो म्हणाला.
''ताक देऊ?''
''कशात घेऊ?''
''भांडेच न्या. मी सायंकाळी देवदर्शनास येईन व येताना ते परत आणीन.''
''बरे तर!''
ताकाचे भांडे घेऊन गोपाळ गेला. शिवालयात जाऊन तो भोजनास बसला. त्याच्याने इतर काही खाववेना. शेवटी फक्त ते ताक पिऊनच तो उठला. बाकीची मधुकरी त्याने गाईपुढे ठेविली. तो नदीवर गेला. त्याने ते ताकाचे भांडे घासून घासून आरशासारखे केले. त्यात का तो मैनेला बघत होता?