सती 36
आई : मैने, किती रडणार? जे ठरले आहे, ते तुझ्या अश्रूंनी पुसले जाणे शक्य नाही. देवाने ललाटी लिहिले, ते कोण पुशील?
मैना : देवाचे कशाला नाव? तुम्ही तर लिहिता. बाबांनी असे नाही करायचे ठरविले, तर देव येऊन का हात धरणार आहे? बाबांनी करार केला, सही केली, या गाईचे खरेदीपत्र केले. देव काही करीत नाही - सारे मानवच करतो, तुम्हीआम्हीच करतो. आई, खाटकाला विकलेल्या गाईचीही दशा एक प्रकारे बरी. तो तिला तिळतिळ मारीत नाही, एकदम मारतो. ती सुटते बिचारी; परंतु तुझी मैना मरेपर्यंत रोज रडणार. स्वतः गळा कापून घेण्याचे धैर्य नाही. दुसरा येऊन गळा कापीत नाही! अरेरे, या मैनेच्या जीवनाची अहोरात्र होळी पेटत राहणार! जणू रोजच हाती सतीचे वाण, रोज चितेवर शयन! आई, तुलाही नाही का ग दया येत? तू तुझ्या हातांनी त्या थंडगार विहिरीत तरी लोट. त्या श्रीमंतीच्या आगीत पिचत पडण्यापेक्षा थंडशी विहिर बरी. आई, ज्या हातांनी भरवलंस, मला परकर नेसवलेस, बांगडया भरल्यास, त्याच तुझ्या हातांनी लोट मला विहिरीत.
आई : मैने, मी त्यांना परोपरीने सांगून पाहिले, परंतु नाही ऐकत. मी तरी काय करू? बायकांनी मुकाटयाने सारे सहन करावे.
मैना : किती दिवस बायका हे सहन करणार? हजारो वर्षे आमची ही हत्या चालली आहे. स्त्रियांचे बलिदान चालले आहे. कोणताही आम्हाला अधिकार नाही. म्हणून बायका म्हणजे गुरेढोरे. आम्हाला मारावे, छळावे, विकावे, भोगावे! आम्हाला मन नाही, मान नाही. आम्हाला कामना नाही, भावना नाही. गुदमरलेल्या आम्ही मैना, गळा दाबलेल्या कोकिळा. आणि हे पुरुष! राक्षस आहेत मेले! सतरांदा पुनःपुन्हा लग्ने करतील. किडे, भोगी किडे, तिरडीवर जायची वेळ आली, तरी पुन्हा नवरदेव होऊ बसतात. निर्लज्ज पशु! काय करावे समजत नाही. भस्म करावे या सर्वांचे वाटते; परंतु शक्ती नाही. पुढचा जन्म तरी आई जगदंबे, चंडी भैरवीचा दे. या रूढींची की जरा
खांडोळी करीन, स्त्रियांचा आत्मा मुक्त करीन, पुरुषांचे डोळे उघडीन; परंतु या जन्मी काय ? आज काय ? आज काय ? आज हे अश्रू. रड मैने रड! पाण्यामध्ये अग्नी असतो, असे वेदांमध्ये वर्णन आहे, परंतु आम्हा स्त्रियांच्या अश्रुत नाही का तेज, नाही का अग्नी ? असेल, खत्रीने असेल, हजारो वर्षे ढाळलेल्या या संचित अश्रूतून प्रचंड शक्ती निर्माण होईल व सर्व प्रकारची बंधने भस्म होतील. ती पहा तेजस्वी ज्वाला, ती पहा, आई, ती पहा ! तो पहा स्त्रियांचा उज्वल भविष्यकाल ! त्या नव भारतीय स्त्रिया रूढी जाळीत आहेत, सत्व सांभाळीत आहेत ! होय, ज्याने त्याने स्वता:च मुक्त झाले पाहिजे. स्त्रियांची स्थिती स्त्रियांनीच सुधारली पाहिजे. पुरुष ती कधीही सुधारणार नाहीत. होईल, स्त्रियांची शक्ती जागी होईल, त्यांचा आत्मा जागा होईल ! हे अश्रू फुकट नाही जाणार, नाही जाणार ! मेलेल्याप्रमाणे पडून राहणा-या स्त्रिया एक दिवस तेजाने उठतील, उठतील.
आई – मैने, काय हे बोलत आहेस ? स्त्रिया मेलेल्या नाहीत. जो सहन करतो, तो थोर. पुरुषांची सारी पापे आपण पोटात घालतो, म्हणूनच आपण मोठ्या. त्यांचे सहस्त्र अपराध विसरून त्यांना क्षमा करतो, त्यांचा छळवाद विसरून त्यांच्यावर पुन्हा प्रेम करतो, यातच आपला मोठेपणा आहे. आपण मेलेल्या नाही. पुरुष मेलेले आहेत. तो दगड आहेत. आपल्या क्षमेने, आपल्या प्रेमाने पुरुषांना आपण जागृत करू, त्यांच्या जीवनात प्रेम निर्मू, स्वारस्य आणू. स्त्रियांचा दिव्य त्यागच पुरुषांना माणसे बनवील.
मैना - आई, दुर्दैवी आहे तुझी मैना.
आई - नको हो रडू.
मायलेकरे बसली होती इतक्यात धोंडभटजी तेथे आले. लेकीपासून आई दूर झाली.
धोंडभटजी – मैने, हे दागिने बेटा घालून बघ बरे नीट होतात की नाही ? का जरा सैलघट्ट करायला हवेत ?
मैना : बाबा, मला दागिने नका घालू, मला विष घाला व मारा. नका हो मला लोटू त्या नरकात. नका खाईत ढकलू, बाबा, करा ना हो कीव. तुमच्या मुलीची तुम्हालाही नाही का दया येत? तुम्ही मला मांडीवर निजवीत असा, आता का मान मुरगळणार? विकण्यासाठी का मला वाढवलेत, मारण्यासाठी का पोसलेत? नका हो निष्ठुर होऊ. मी तुमच्या पाया पडते. नका मारू, त्या आगीत ढकलून नका जाळू -
धोंडभटजी : कोण मारते आहे, कोण आगीत ढकलते आहे? तुला गरिबीचा आग लागू नये, म्हणून तर हे सारे करतो आहे. हे बघ दागिने. हा कमरपट्टा, हे तोडे, या बाकी; घाल गं, तू तरी घाल तिच्या अंगावर. बघतेस काय अशी? झालं काय रडायला तुम्हां मायलेकींना? देवळांचे उंबरठे झिजवलेत, वडाचे - पिंपळाचे पार झिजवलेत, तरी असे स्थळ मिळणार नाही. श्रीमान् कीर्तिमान कुलंदाज, घरंदाज -
मैना : नको मला श्रीमंती. तो गरीब गोपाळ, तो मला द्या. बाबा -
धोंडभटजी : तुझ्या मुलाबाळांनी पुढे भिकारी व्हावे, असे तुझ्या बापाला वाटत नाही. म्हातारी माणसे दूरचे बघतात.
मैना : माझ्या मुलाबाळांची तुम्हांला काळजी आहे - परंतु बाबा, आधी मुलेबाळे तरी व्हायला हवीत ना?
धोंडभटजी : देवांची दया असली म्हणजे होतील. ते का आपल्या हाती आहे? चल आटप. सारे आता ठरले आहे. तुम्हा बायकांना काडीची अक्कल नाही. एक मूळूमुळू रडायचे तेवढे माहीत. इतक्यात बाहेरील ओसरीवरून 'धोंडभटजी' म्हणून कोणी हाक मारली. ते बाहेर गेले. तो तेथे दिवाणजी आले होते.
धोंडभटजी : बसा, असे उभे का?
दिवाणजी : ही दुस-या प्रकारची हि-यांची कुडी आणली आहेत. कोणती आवडतात ते पहा. या पोतपेटया.