हें काय सांगायला हवें !
'' .... हां, आतां बरोबर ! घरचेच तुमच्या बातमीदार ! तेव्हां इतक्यांत तुम्हांला कळलें हें ठीकच ! - छे ! मला अजून वार्तासुद्धां नाहीं ! आपली कुणकुण लागली आहे इतकेंच ! - बाकि आहे काय त्यांत म्हणा ! कळेल, आज नाहीं उद्या ! - कां .... हीं खटपट नाहीं अन् कांही नाहीं ! पत्रंही कोणाला घातलीं नाहींत, किंवा कोणाकडे जोडेही फाडले नाहींत ! - अन् अर्ज तरी काय, खरडायचा म्हणून खरडला इतकेंच ! वांकडयांत असा शिरलोंच नाहीं ! म्हटलें काय होईल तें आपलें सरळ ! - नेहमीचेंच माझें आहे हें ! काम मनापासून करायचें, अन् चोखपणानें वागायचें ! हव्यात कशाला इतर खटपटी आणि लटपटी ! - आतां तुम्ही म्हणाल कीं, हें जमलें कसें ? अहो ! तेंच तर मोठें आश्चर्य आहे ! अर्ज जेव्हां म्हणतात माझा दृष्टीस पडला, तेव्हां .... आपले लोक बाजूलाच राहिले, पण एका युरोपियननें म्हणे हट्टच धरला कीं, ' अमुक एक गृहस्थ माझ्या जोडीला परीक्षक असतील, तरच मीही परीक्षक होईन ! नाहींतर साफ जरुर नाहीं मला युनव्हर्सिटीची ! ' - तेव्हां बोला आतां ! फादर लगबगमननेंच असें म्हटल्यावर ... अन् तें म्हणजे बडं प्रस्थ ! .... कोण पुढें काय बोलणार ! मुकाटयानें सगळे कबूल ! - छेः ! ओळख ना देख ! काळा कां गोरा त्यानें अजून पाहिलंसुद्धां नाहीं मला ! कुठं कांहीं लिहितों सवरतों, तें त्यानें मला वाटतें वाचलेलें ! तेवढयावरुन हें सगळें, बाकी खटपटीचें म्हणून नाव नाहीं ! - हॉ ! हॉ कसें बोललांत ! सरळ आपलें काम करीत असावें, पारख करणारा, आज ना उद्या, भेटतो कोणी तरी जगांत ! - ब .... रें ! कांही नवल विशेष ? - कुशाभाऊ जोशी; कोण बुवा हा ? - ओ ! आय् सी ! आपल्या तो .... नागुअण्णाच्या .... बयडीचा कुशा ? तो का बसणार आहे आमच्या परीक्षेला ? - काय ! इतका मोठा झाला आहे ! अहो परवां ना त्याला पाहिला आपण? धड नाकसुद्धां पुसतां येत नव्हतें ! आणि तो आतां कॉलेजांत का आला आहे ! - काय ! दिवस कसे हां हां म्हणतां जातात पहा ! - हो, तेंही खरेंच आहे ! प्रकृतीमुळें जे नागुअण्णा कोल्हापूरला गेले, ते तेही तिकडेच, आणि कुशाही तिकडेच ! तेव्हां काय मध्यंतरी दिसायचें कारण ? बरें कामाशिवाय आम्ही थोडेच कुठेंख हालतों आहों ! आपलं पुणें, नाहीं तर मुंबई ! बाकी म्हणून .... बरें आहे येऊं आतां ? - वा, वा ! भलतेंच ! त्याची नको काळजी ! कसें झालें तरी आपल्या बयडीचा कुशा ! तेव्हां हें काय सांगायला हवें ? हळूच केव्हांतरी बरं का ? - हळूच केव्हां तरी नंबर वगैरे .... ''
२९ मार्च १९२८