माझी डायरेक्ट मेथड ही !
''.... शंभरापैकीं पंचवीस मार्क ? - कांहीं जिवाला शरम ! जा ! आतांच्या आतां हें कार्ड घेऊन, दाखव तुझ्या त्या मास्तरला नेऊन ! बेशरम ! शिकवतात का हजामती करतात ? - या ! छान झालें ! ऐन वेळेवर आलांत ! पहा हे आमच्या चिरंजिवांचे प्रताप ! इंग्रजींत सारे पंचवीस मार्क ! - काय पोरखेळ आहे ? - मोठा अगदीं तुमच्या शिफारशीचा मास्तर ! कारण तुम्ही आमचे स्नेही - अन् शिक्षणपद्धतीचे अगदी गड्डे - म्हणून तुम्हाला आम्हीं विचारलें ! - तोंडांत मारायला नव्हते कुणी त्या वेळी माझ्या - दरमहा वीस रुपयेप्रमाणें आज अडीचशें रुपये त्या मास्तरड्यांच्या उरावर घातले त्याचें हें फळ होय ? म्हणे नवीन पद्धति ! विद्वान् कीं नाहीं मोठे ! - काल मॅट्रिक झाला नाहीं, तों आज मास्तरच्या खुर्चीवर जाऊन बसतां, काय येत असतं रे तुम्हांला ? - हीच रड तुमच्या त्या सुपरिटेंडटची ! - आज एम. ए. होतो काय, अन् शाळा चालवतो काय ! इकडे पालक तर विचारायलाच नको ! सगळेच अवलिया ! स्वतःला मुलें किती आहेत याची तरी त्यांना शुद्ध असते कीं नाहीं कुणास ठाऊक ! वर आणखी नवीन नवीन खुळें हीं ! आग लावा त्यांना ! यापेक्षां आमची जुनी पद्धति खरोखरच चांगली ! एवढा मोठा ' दाऊ ' चा धडा अवघड ना ! पण एकदां चांगली गालफडांत देऊन, मास्तरांनी इ - एस - टी लावायला सांगितली कीं काय विशाद आहे पोरटें विसरेल ! पक्की जन्माची आठवण ! तें राहिलें बाजूलाच ! आतां धड ए - एस - टी नाहीं, अन् आय - एन् - जी नाहीं ! कारट्यांना पाठ म्हणून करायला नको मुळीं ! - आज त्या मास्तरकडे पाठवून याला वर्ष होत आलें, अन् खरोखर सांगतों - चेष्टा नाहीं - या टोणग्याला सी - ए - टी कॅट करतां येत नाही ! - तेव्हां नांव काढूं नका तुम्ही अगदीं ! - ' नवीन - नवीन ' म्हणतां तुम्ही हें ! पण सगळें फुकट - ऑल बॉश - आहे ! - तें कांहीं नाहीं ! यापुढे माझी डायरेक्ट मेथड आतां ही - उठतांक्षणींच कांही अपराध न केल्याबद्दल पांच छड्या, अन् निजण्यापूर्वी अपराध केल्याबद्दल पांच छड्या ! रोजचा हा खुराक ! मग पहातों कसा पोरटीं अभ्यास करीत नाहींत !.... ''
३ एप्रिल १९२४