पाण्यांतील बुडबुडे
''..... अग यमे ! इकडे, इकडे ये ! बघ कशी इथं गंमत दिसते आहे ! - ये, या हौदाच्या कांठावर बसूं अन् थोडा वेळ मौज तर पाहूं ! - अबब ! किती तरी बुडबुडे हे ! तोटीचें पाणी हौदांत पडतेंच आहे, नवे बुडबुडे निघत आहेत, जुने फुटत आहेत, सारखा चालला आहे गोंधळ ! - कायग ! इथं आपण बसल्यापासून किती बुडबुडे निघाले असतील, अन् किती फुटले असतील ? शंभर, पांचशें का हजार ? - किती सांग कीं ? - काय, नाहीं सांगतां येत ? हेट् ! फजिती झाली तुझी ! - हः हः हः केवढा बुडबुडा आतां कांठाजवळ येऊन फुटला ग ! चांगला लिंबायेवढा होता कीं ! - पण येवढा मोठा व्हायला किती तरी लहान, निदान तीसचाळीस तरी, एकमेकांत मिसळावें लागले असतील नाहीं ? - गंमतच आहे ! पहिल्यानें कसा अगदी बारीक असतो ! आणि हळूहळू पुढें जायला लागला कीं, येईल त्याला ममतेनें आपल्यांत मिसळूं देतो ! शेवटी तोच बुडबुडा - बरें का यमे ? - रुपयायेवढा, नाहीं तर उगवणार्या सूर्याइतका किंवा चंद्रायेवढासुद्धां मोठा होतो ! - हो, सगळेच मोठे होत आहेत ! आतां तूंच बध कीं, निघाल्यापासून कांठाला येऊन फुटेपर्यत जस्सेच्या तसे - मोठे नाहींत अन् लहान नाहींत - अगदी तिळायेवढाले बारीक किती तरी निघत आहेत अन् फुटत आहेत ! अग, आतांपर्यत लाखों निघाले असतील ! पण त्यांत मोठे होऊन कांठावर शांतपणें डोकें ठेवून फुटलेले किती होते ? एक, नाहीं तर दोन ! संपलें ! - बाकीचे काय ? लडबड लडबड करतात, घाईनें मोठे होतात, अन् फटाफट फुटतात ! - आणि कांहीं तर भारीच वाईट ! एखादा बिचारा कुठें चांगला मोठा व्हायला लागला कीं, त्यांत हे हळूच शिरतात, आणि त्यालाही फोडून टाकतात, अन् आपणही फुटतात ! - पहा, पहा, यमे, आतां नीट पहा अं ! कसा बुडबुडा एकसारखा मिसळत आहे तो ! - अरे वा ! चांगला रुपयायेवढा झाला कीं ! चालला, बघ, कांठाकडे चालला ! मिसळले ! आणखी तीनचार येऊन मिळाले ! ओहो ! कसा खिशांतल्या घड्याळायेवढा झाला आहे ग ? - आला कांठाकडे - अहा ! पाहिलेंस यमे ! - कसा सूर्यानें त्याच्या डोक्यावर हिर्यांचा मुकुट घातला आहे तो ? - आला, टेकला कांठाला येऊन !.... ''
१५ एप्रिल १९१२