अहो, आज गिर्हाईकच आलें नाही !
'' .... काय करावें ! आज दारुलाबी खिशांत पैशे नाहींत ! - काय कोंडाबाई ! अहो कोंडाबाई ! काय तुमचें भांडण तरी काय आहे ? अशा आमच्यावर रागावलांत कां ? - काय म्हटलेंत ? काल तुम्हांला ओझ्याला बोलावलें नाहीं, म्हणून तुम्ही माझ्यावर इतक्या रागावलां ? जाऊं द्या कीं ! उद्यां लागतील तितकीं गिर्हाइकें येतील ! मग सगळ्या गवर्या तुम्हीच मसणांत नेऊन टाका ! मग तर झालें ? अहो, गिर्हाइकें येऊं द्या कीं, मग तुम्हांला पैशेच - पैशे ! - काय त्रास आहे पहा ! अग ए ! कां उगीच गागत आहेस ? गांवांत कोण प्लेग चालला आहे ! - अहो, कोणाचे जीव बी सुचित नाहींत, - आणि ही सटवी मधासधरुन उगीचच भांडत आहे ! - बरें झालें घरांत तेल नाहीं तर ! आणूं कोठून पैशे ? - काय सांगूं कोंडाबाई ! हिच्या रोजच्या या काहारामुळें मला आपल्या जिवाचा अक्शी कंटाळा आला आहे ! - कोण आहे ? दौलतशेट ! या शेटजी, जयगोपाळ, बसा. खरोखर, तुम्हीं तर माझी अगदीं पाठ पुरवली आहे बुवा ! किती पंचवीसच रुपये बाकी राहिली आहे ना ? देऊन टाकीन, - उद्यां संध्याकाळच्या आंत, सगळे पैशे चुकते करतों ! - आतां काय सांगावें ! रामाशपथ, या वेळेला खिशांत एक पैसुद्धं नाहीं ! अहो, आतांपर्यंत मुळी गिर्हाइकच आलें नाहीं ! .... ''
१२ नोव्हेंबर १९११