Get it on Google Play
Download on the App Store

देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - !

'' .... अरे ! जिन्यांत तर अगदीं अंधार आहे ! अजून आठही वाजले नाहींत, तोंच जिकडे तिकडे अगदीं सामसूम ! ही कोठें बाहेर तर नाहीं गेली ? - छेः ! दाराच्या फटींतून दिव्याचा अंधुक अंधुक उजेड तर दिसत आहे. आणि अशा रात्रीच्या वेळेला ती कशाला उगीच बाहेर - पण हें काय ? कोणाच्या बरें फुटक्या हदयांतून हा रडका हुंदका बाहेर पडला ! - माझें हदय कसें धडधडायला - चला, हळूच वर जाऊन दाराच्या फटींतून, आपल्या फाटत चाललेल्या संसाराचें चित्र पाहूं ! - जिवा, असा मधेंच खचून जाऊं नकोस ! आधीं वर चल ! - पहा ! आपला हा संसार नीट डोळे उघडून पहा ! - दारिद्यानें संतापून जाऊन अगदीं त्रासानें अंगावर फेंकलेलें तें फाटकेंतुटकें लुगडें नेसून माझी बायको कशी हुंदके देऊन रडत आहे ती ! तो पहा ! ढणढण जळणार्‍या त्या घासलेटच्या डबड्याशेजारी, आगपिणीनें खाजवून - बाळ ! नको रे आपल्या चिमुकल्या जिवाला असा नखांनीं ओरबडूंस ! - रक्तानें न्हालेल्या, व मधून मधून आपल्या आईकडे, व दोन - तीन वर्षानीं वडील अशा आंधळ्या बहिणीकडे, केविलवाण्या मुद्रेंनें रडत रडत पाहणार्‍या, माझ्या त्या दोन वर्षाच्या लेंकराकडे पाहिलेंस का ? - काय म्हटलेंस ? माझी गोदी कशानें अशी आंधळी झाली ? दोन अडीच वर्षे झाली, देवीच्या तडाख्यांतून अगदी मरतां मरतां वांचली ! पण बिचारी जिवाऐवजी डोळेच घालवून बसली आहे ! - एकंदरींत, माझें आयुष्य या गरीब बिचार्‍या आत्म्यांचे हाल हाल करण्यांतच चाललें आहे कीं नाहीं ! - ऐकलेंस ? तिघेंही माझ्या या अस्तित्वाच्या लोखंडी चरकांत सांपडून, कशीं रडक्या स्वरानें मोठमोठ्यानें कण्हत आहेत तीं ! - हा ! - आगपिणीनें कुरतडला जाणारा, अहोरात्र अंधारांत तळमळणारा, व माझ्या हदयाचें हें भिकार डबडें मिळाल्यामुळें हा ढणढण जळणारा ! - अरेरे ! असे हे तीन आत्मे देवाला काय बरें म्हणत असतील ? - जिवा ! तुला नाहीं का रे ऐकूं येत ? - अरे ! ते म्हणत आहेत कीं, ' देवा, हा नरक लोक निर्माण झाला ! म्हणूनच आम्ही असे तडफडत आहों बरें ! ' - खरेंच ! माझी बायको लग्नापूर्वी आपल्या श्रीमंत पित्याच्या घरीं, कशी सुखांत आणि आनंदांत होती नाहीं ? पण शेवटी, स्वर्गात हंसणार्‍या व येथें रडविणार्‍या मंगळानें - या आनंदानें चिरकाल हंसूं इच्छिणार्‍या मुक्या प्राण्याचा, आपल्या पापकर्मात चिलबिळणार्‍या या दुरात्म्याशी विवाह - मंगल विवाह ! - लावून दिला ! परमेश्वरा ! तुझी स्वर्गात आनंदानें प्रकाशणारी नक्षत्रें, आह्मां माणसांच्या दृष्टीला, आमच्या मेंदूलाच, रडकी कशीं रे दिसतात ! - बाळांनो ! आपला बाप जन्माला कां आला, म्हणून देवाला विचारीत असेच निरंतर रडत बसा ! - पण मी म्हणतों, या मुलांचें तरी आयुष्य असें दुःखांत कां बरें जावें ? बरोबर ! - कां नाही या मुलांनी तडफडावें ! - अरे ! निष्प्रेमाच्या अत्यंत विषारी जागेमध्ये दारिद्यरसानें अधिकाधिक फोंफावणार्‍या कामवासनेला गोड फळें येतील, का ' कडू जहर ? - नासकीं अशीं फळें येतील ? हां, बरोबर विचारलेंस. मला जर येवढें कळत होतें तर मीं या गरीब बिचारीशीं विवाह करुन तिला अशी दुःखसागरांत कां लोटली ? - पण जिवा ! या घरांत निर्माण झालेल्या दुःखाला मीच कारण आहें असें मी कधी बरें म्हणत नाहीं ? - आतां मी विवाहच कां केला, तर बाबा रे, मीच तुला उलट असें विचारतों कीं, पापकर्मात गटांगळ्या खाणार्‍या प्राण्याला कधीं एकटें मरावेंसें वाटेल का ? - जितके आपल्या मिठींत सांपडतील, तितक्यांना घेऊन तो रसातळाला जाणार ! मग मीच एकटा या जगांत कसा बरें तडफडूं ! देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! !.... ''

६ डिसेंबर १९११

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?