एका हलवायाचें दुकान
'' .... काय कारट्यांची कटकट आहे पाहा ! मरत नाहींत एकदांची ! - हं, काय म्हटलेंत रावसाहेब ! आपल्याला पुष्कळशीं साखरेची चित्रें पाहिजे आहेत ? घ्या; आपल्याला लागतील तितकीं घ्या. छे ! छे ! भावामध्यें आपल्याशीं बिलकूल लबाडी होणार नाही ! अगदीं देवाची शपथ घेऊन सांगतों कीं, माझ्याजवळ फसवाफसवीचा असा व्यवहारच नाही ! - अग ए ! कोठें मरायला गेली आहे कोणाला ठाऊक ! गप बसारे ! काय, काय म्हणालांत आतां आपण ? हीं साखरेंची चित्रें फार चांगलीं साधली आहेत ? अहो, आपणच काय - पण या दुकानावरुन जाणारा प्रत्येक जण असेंच म्हणतो कीं, हीं साखरेचीं केलेलीं पांखरें - झालेंच तर ही माणसेंसुद्धा ! - अगदी हुबेहुब साधली आहेत म्हणून ! - काय ? मीं दिलेले हे पांखरांवरचे रंग कदाचित् विषारी असतील ? छे हो ! भलतेंच एखादें ! हा घ्या, कावळ्याच्या पंखाचा एक तुकडा आहे, खाऊन पहा ! अहो निव्वळ साखर आहे साखर ! फार कशाला ? हीं सगळीं चित्रें जरी आपल्याच सारखीं जिवंत होऊन नाचायला उडायला लागलीं - तरी देखील यांच्यांत असलेल्या साखरेचा कण - एक कणसुद्धां कमी होणार नाहीं ! रावसाहेब, माझें कामच असें गोड आहे ! - अरेच्या ! काय त्रास आहे पाहा ! अरे पोरट्यांनो, तुम्हीं गप बसतां कीं नाहीं ? का या चुलींत घालून तुम्हा सगळ्यांना भाजून काढूं ? तुमची आई कोठें जळाली वाटतें ? - का हो रावसाहेब, असे गप कां बसलांत ? बोला कीं मग किती चित्रें घ्यायचें ठरलें तें ? .... ''
२३ ऑक्टोबर १९११