असें केल्याशिवाय जगांत भागत नाही !
''.... माझें मोठें भाग्य, यांत कांहीं शंका नाहीं ! नाहींतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गांठ पडायला ! - अहो कशाचे, कशाचे ! आम्ही कसले कवि ! कोठें एका कोपर्यांत लोळत पडलों आहोंत झालें ! नाहीं खरेंच ! परवांची आपली कविता फारच बहारीची होती बोवा ! फारच छान ! एक्सलंट ! अहो आधीं नांव पाहूनच थक्क झालों ! ' माझें आंबट अजीर्ण ! ' वा ! किती सुंदर ! - नाहीं, तें आलें लक्षांत. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून ! पण त्यांतल्या त्यांत या दोन ओळी तर मला फारच आवडल्या ! काय पहा ! - हां बरोबर, - ' अजीर्णामुळें ! जीव कळवळे ! ॥' काय बहार आहे यांत ! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ ! - काय म्हणतां ! इतका खोल अर्थ आहे का ? शाबास ! ' प्रेमभंगामुळें हदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचें अजीर्ण ! ' क्च ! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो ! टेरिबल ! फारच प्रतिमा अफाट ! माझें समजा हो ! - कोणती ? - कोणती बरें माझी कविता आपल्याला अतिशय आवडली ? हां, हां ! ती होय ? गेल्या मस्तकमंजनांतील चहादाणीवरील ! अस्सें ! - हो, ती सुद्धां आहे आत्म्यालाच धरुन ! - बरें आतां रस्त्यांत नको - केव्हां ? उद्यां सकाळी येऊं आपल्या घरीं ? - ठीक आहे - हं : ' अहो रुपम् अहो ध्वनिः ' चाललें आहे जगांत ! म्हणे ' आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली ! ' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची ! इतकी भिकार कविता कीं, मला स्वतःलासुद्धां आवडत नाहीं ! '' माझी चहादाणी ! साखरपाणी ॥ अधण येई सळसळा ! अश्रू येती घळघळा ॥'' हः हः यंवरे कविता ! पण चाललें आहे कीं नाहीं ! भेंडीरमणानें उठावें, बटाटेनंदनाची स्तुति करावी ! बटाटेनंदनानें पुढें यावें, भेंडीरमणाची वाहवा करावी ! मनांत परस्परांना त्यांची कविता मुळींच आवडत नसते ! पण जगांत यानें त्याला शेली म्हणावें, उलट त्यानें याला कीट्स म्हणावें ! चालला आहे सपाटा ! बरें असें केल्याशिवाय जगांत भागत नाहीं ! अहो नाहीं तर, आपली खरीं मतें सांगून जगांत तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे कीं नाही ? रिकामा जिवाला ताप ! जाऊं द्या !.... ''
२२ मे १९१३